मुख्य सामग्रीवर वगळा

निवडक नरहर कुरुंदकर खंड 1 व्यक्तीवेध

निवडक नरहर कुरुंदकर खंड 1 व्यक्तीवेध (150325)



पुस्तकात चार भाग आहेत. इतिहासाकालीन व्यक्ती, समकालीन व्यक्ती, स्वतःविषयी यावर कुरुंदकर यांनी लिहिलेले लेख आहेत. 

कुरुंदकर यांच्याविषयी इतर संपादक मंडळींनी लिहिलेले चार लेख आहेत. 

सर्व लेखातील भाषा आणि विचार आपल्या आकलनशक्तीचा आवाका वाढवतात. आज लोकसत्ताचे संपादक असलेले गिरीश कुबेर यांनी त्यांच्या इयत्ता आठवीच्या उन्हाळी सुट्टीत 30 दिवसात 32 पुस्तके वाचून त्याच्या नोंदी ठेवल्या होत्या आणि त्यातील शेवटचं पुस्तक 'जागर' होतं. त्या वयात आपण काय करत होतो? म्हणून सांस्कृतिक भांडवल खूप महत्वाचं असतं हे पटत, यापासून बहुतांश बहुजन समाज अजूनही कोसो दूर आहे. असो 

पुस्तक वाचन आपल्या विचाराच्या कक्षा रुंदावत. हे संग्रही असावे असं पुस्तक आहे.

💡 सॉक्रेटिस चा मृत्यू 

सॉक्रेटिसचे विचार पटत नाहीत, तो तरुणांना बिघडवतो असं म्हणून अथेन्स मध्ये त्याच्यावर खटला भरण्यात आला. त्याने गुन्हा मान्य करून दंड भरावा किंवा अथेन्स नगरी सोडून कायमचे दूर निघून जावे किंवा मृत्यूला सामोरे जावे असे त्याच्यासमोर पर्याय देण्यात आले.

सॉक्रेटिस ने हेमॉलक या विषाचा प्याला जवळ करून मृत्युदंड स्वीकारला.

अथेन्स चे नागरिक नीतिमान होते असं म्हणावं लागेल त्यांनी सॉक्रेटिसला पर्याय दिला होता जो की येशू ख्रिस्ताला ही मिळाला नव्हता. त्यांनी विचारांची उपेक्षा नाही केली. विचारांनी हदरणार अथेन्स हे समाजमन जिवंत असण्याचं लक्षण होतं.

💡लोकहीतवादी 

गोपाळ हरी देशमुख यांनी 1848 ते 1850 या काळात शतपत्रे लिहिली. भारत धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक दृष्ट्या मागास आहे म्हणून गुलाम आहे हा विचार मांडून त्यांनी समाजसुधारणा व्हावी, धर्म चिकिस्या व्हावी असा विचार मांडला.

भारतासाठी ब्रिटिशांप्रमाणे पार्लमेंट असावी हा विचार सर्वप्रथम त्यांनी मांडला.

वैयक्तिक आयुष्यात ते कर्मठ आणि सनातनी होते. समाज सुधारणेच्या विषयी लेख लिहिण्या पलीकडे प्रत्यक्ष कृती त्यांनी काहीही केली नाही. वा जे समाज सुधारक होते त्यांच्या पाठीशी उभे राहिले नाहीत.

नरहर कुरुंदकर म्हणतात लोकहीतवादी आरंभबिंदू होते, आरंभ बिंदू कधीच निर्दोष व परिपक्व नसतो. हा त्या आरंभबिंदूचा दोष नाही.

( सर्व चिकित्सेचा आरंभ व गाभा धर्माची चिकित्सा हा आहे._ कार्ल मार्क्स )

💡सावरकर 

सावरकर यांची भलामन करणारा लेख कुरुंदकरांनी लिहिला आहे. यात बरीच अतिशयोक्ती आहे. असो 
कुरुंदकरांचे निधन 10 फेब्रुवारी 1982 रोजी झालं आणि सावरकरांविषयीचे कागदपत्र 1987 साली उजेडात आले.
( माझ्या माहितीप्रमाणे )
त्यामुळे या लेखाला मर्यादा असणारच पण केलेली अतिशयोक्ती खटकते.

💡कर्मवीर भाऊराव पाटील 

महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज यांनी सुरु केलेल्या कार्याचा वटवृक्ष करण्याचं काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलं.

1919 साली रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून बहुजनांच्या पोरांच्या उद्धाराचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी सुरु केलं. 1945 पर्यंत त्यांनी 400 शाळा स्थापन केल्या होत्या.

एखादा विचार मनात येऊन त्यानुसार सातत्यपूर्ण कृती करणं, अडचणी, संकट यांनी हतबल न होता त्या ध्येयवदाला चिकटून राहून कृती करत राहणं हे सर्व अचंबित करत.

हाती घेतलेल्या कार्याला संस्थात्मक, संघटनात्मक स्वरूप देऊन ते वृद्धिंगत होतं राहील अशी व्यवस्था निर्माण करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ती कर्मवीर भाऊराव पाटील यांना साधली. त्यामुळे बहुजनांची कुळे उद्धारली.

कर्मवीरांच्या कार्याचे स्मरण करून, त्यांच्या ऋणात राहून सामाजिक बांधिलकी साठी आपणही कृतिप्रवण व्हायला पाहिजे.

💡सर्वपल्ली राधाकृष्णन 

सर्वपल्ली राधाकृष्णन हे तत्त्वज्ञ होते. तत्त्वज्ञ हा शिक्षक असतोच. रशियामध्ये राजदूत म्हणून काम केल्यानंतर त्यांना भारताचे राष्ट्रपती पद मिळाले.

कुरुंदकरांनी म्हटले की यांचे नैतिक वजन खूप मोठं होतं मी याच्याशी सहमत नाही. 

सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी जदुनाथ सिन्हा यांच्या Indian Psychology of Perception, Vol I & Vol II या थिसिस मधून काही भाग चोरला होता. आणि त्यांच्या इंडियन philosophy या पुस्तकात मूळ लेखकाचा संदर्भ न देता समावेश केला.

या संदर्भात कोर्टकचेरीही झाली. जदुनाथ सिन्हा यांच्यावर दबाव आणून प्रकरण कोर्ट बाहेर मिटवण्यात आलं. हा घटनाक्रम 1923 ते 1933 या कालावधीतील आहे. अधिक माहितीसाठी पुढील आर्टिकल वाचावे.

(https://www.roundtableindia.co.in/dr-sarvepalli-radhakrishnan-the-teacher-who-plagiarised-his-student-s-thesis/)

ही गोष्ट नरहर कुरुंदकर यांना माहीत नव्हती का? 
सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याकडे नैतिकता होती असं म्हणणं अतिशयोक्ती पूर्ण होईल.

यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून का साजरा केला जातो हा ही एक मोठा प्रश्न आहे?
यांनी किती शाळा सुरु केल्या ? 
बहुजन दिन दलित दुबळे यांच्या शिक्षणासाठी यांनी काय केलं?
शिक्षण क्षेत्रात त्यांनी असा कोणता नवा विचार दिला आहे आणि त्यानुसार कृती केली आहे ?
महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांचं कार्य खूप व्यापक होतं, शिक्षक दिन ठरवताना याचा विचार झाला नसेल का? 
का कार्यापेक्षा जात वर्ण हा घटक अधिक वरचढ ठरला का ?

💡खान अब्दुल गफारखान 

स्वातंत्रपूर्व भारतातील वायव्य सरहद प्रांत (सध्या पाकिस्तान ) येथील लोकनेते खान अब्दुल गफारखान महात्मा गांधीजी मुळे प्रभावित झाले. शस्त्र त्यागून त्यानीं अहिंसा तत्वचा स्वीकार केला. त्यांना सरहद गांधी म्हणून ओळखले जाते.

1969 साली गांधी जन्मशताब्दी निमित्त त्यांना भारतात आमंत्रीत केलं होतं.

सरहद गांधी यांची पाकिस्तान मध्ये सामील होण्याची इच्छा नव्हती. पण 1947 साली वायव्य सरहद प्रांतात झालेल्या सार्वमतात 89,242 मतदारांनी पाकिस्तानाच्या बाजूने कौल दिला, तर 2,874 मतदारांनी भारताच्या बाजूने कौल दिला होता.

गफारखानांचे म्हणणे असे की मतदान पाकिस्तान, भारत, की पख्तुनिस्तान या मुद्यावर घेतले जायला हवे होते. ही गोष्ट अगदीच अशक्य अशी होती; कारण असेच मतदान बंगालमध्ये घेतले असते तर ते स्वतंत्र बंगालच्या बाजूने गेले असते, पाकिस्तानच्या बाजूने गेले नसते. एकेका संस्थानाच्या समोर हा पर्याय ठेवला असता तर काय घडले असते याचे चित्र आजही उघड आहे. एकेक संस्थानिक ज्या प्रचंड मतांनी निवडून येतो ती मते पाहिली तर जनमताचा कौल कसा गेला असता हे सांगणे कठीण नाही. प्रत्येकाला स्वतंत्र राहण्याचा पर्याय मोकळा, शिल्लक राहिला असता व तो पर्याय मान्य केला असता तर पाकिस्तानचेच नाही तर हिंदुस्थानचेसुद्धा शेकडो तुकडे उडाले असते, हे बाल्कनायझेशन कुणी मान्य करणार नव्हते. ते कुणाच्याच हिताचे नव्हते. अशा अवस्थेत आपला विश्वासघात झाला, हे वाटल्यास गफारखानांनी म्हणावे. पण, आमच्या नेत्यांनी पठाणांचा विश्वासघात केला अशी समजूत आपण करून घेण्याचे काही कारण नाही. पख्तुनिस्तानची मागणी गफारखानांनीच १९३० नंतर सोडून दिली होती व अखंड भारतात राहणे पत्करले होते, १६ वर्षांनंतर कालचक्र उलट फिरवणे गफारखानांनाही शक्य नव्हते.

आज रोजी (मार्च 2025 )पाकिस्तानच्या या प्रांतात स्वतंत्र राष्ट्रासाठी हिंसाचार सुरु आहे. मागील आठवड्यात तिथे प्रवासी ट्रेन चे अपहरण करून सामान्य नागरिक बंधक केले होते.

_सिद्धेश्वर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...