शेतकरी जेव्हा जागा होतो- अभिमन्यू सूर्यवंशी (190925)
माणसाची जात उन्नत व्हावी म्हणून जगातील बरीच माणसं स्वतःहून धडपड करत असतात. अशी धडपड करा असं त्यांना कुणी सांगत नसतं. माणसाच्या उन्नतीचं काम करण्याचं त्यांचं त्यांनीच ठरवलेलं असतं आणि त्या त्या कामासाठी ते न थकता झटत असतात. घरादाराचं, कुटुंबातील माणसांच्या सुखदुःखाचंही त्यांना भान राहत नाही. त्यातीलच एक "पुंजाबाबा गोवर्धने"
भात उत्पादक शेतकऱ्यांना रास्त भाव मिळावा यासाठी पुंजाबाबा गोवर्धने यांनी दिलेल्या लढ्याची कहाणी या पुस्तकात आहे.
1948 सालची गोष्ट, इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्याला भाताच्या पिकाला एकरी 318 खर्च येत होता, तरीही हा तांदूळ साडेआठ रुपये प्रति मण या लेव्ही भावानेच मिळावा असा सरकारचा आग्रह होता, यातून शेतकऱ्याला एकरी 121 रुपये तोटा होत होता.
शेतकऱ्यांनी सरकार शिवाय धान्य कोणालाही विकू नये असा आदेश होता.
या अन्यायाविरुद्ध पुंजाबाबा गोवर्धने यांनी लोकांना संघटित करून लढा उभारला. हद्दपार होऊनही लढा यशस्वी केला.
लढ्यात कोणत्या अडचणी आल्या?
नेतृत्वाने त्यावर मात कशी केली?
सरकारी दमणयंत्रणा कशी काम करते?
लढा यशस्वी का झाला?
जाणून घेण्यासाठी हे पुस्तकं वाचलं पाहिजे.
💡 आंदोलन मोडण्यासाठी सरकार काय करतं?
👉🏻 आंदोलनकर्ते बदनाम करणे .
👉🏻 नेतृत्वात फूट पाडणे.
👉🏻 मुख्य नेत्यांना हद्दपार करणे.
( म्हणून पर्यायी रणनीती आधीच ठरवून ठेवावी.)
👉🏻 जमावबंदी लागू करणे.
👉🏻 अफवा पसरवणे.
👉🏻 नेत्यांना लालूच दाखवणे.
💡 पुंजाबाबा गोवर्धने
(03 ऑगस्ट 1890 ते 09 ऑगस्ट 1971)
सत्यशोधक समाजाचे अधिवेशन, प्रत्यक्ष शाहू महाराज यांना पाहणे आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे
"काही ध्येय आदर्श ठेवून कामाला लाग, वेळ घालवू नकोस" हे शब्द यामुळे पुंजाबाबा गोवर्धने सामाजिक काम करण्याच्या उर्मिने झपाटून गेले. सत्यशोधक जलसा स्थापन करून गावोगाव भटकंती करून समाजप्रबोधनाचे काम करू लागले. हुंडाबंदी, जातीभेद - अंधश्रद्धा निर्मूलन हे त्यांचे विषय होते. पंधरा दिवसातून एक तरी जलसा चा कार्यक्रम करायचा असा त्यांचा नियम होता.
सावकारांच्या पिळवणूकीविरुद्ध त्यांनी जनमानस तयार केले. अज्ञानामुळे आदिवासी बांधवांचे शोषण होत आहे हे ओळखून शाळा सुरु व्हव्यात यासाठी प्रयत्न केले. इगतपुरी तालुका दुष्काळमुक्त व्हावा, उद्योगधंदे यावेत यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
1957 ला संयुक्त महाराष्ट्र समितीकडून ते विधानसभेत पोहचले. निधी कमतरतेमुळे आपल्या भागाचा विकास होण्यासाठी कित्येक पंचवार्षिक योजना वाट पहावी लागणारे हे त्यांना जाणवलं होत. पुढील विधानसभेला निवडून येण्याची पूर्ण खात्री असताना देखील त्यांनी तिकीट नाकारलं.
वयाच्या 80 व्या वर्षी ते अनंतात विलीन झाले.
स्वतःचे कुटुंब , मनासिक - शारीरिक स्वास्थ, तडजोडीतून मिळू शकतील असे लाभ, आर्थिक उन्नती या प्रलोभनानां बळी न पडण्याची प्रेरणा व्यक्तीत कुठून येत असेल बरं......?
_सिद्धेश्वर
💡 पुस्तकातून
👉🏻 कोणत्याही विचाराचा एक काळ आला की त्या विचाराचे प्रवर्तक त्याकरता स्वतःला झोकून देणारे असे अनेक विचारवंत, शिलेदार आणि पाईक जागोजाग जमा होऊ लागतात.
👉🏻 कोणत्याही जनआंदोलनाचे प्रणेते एकापेक्षा अधिक असतात पण ते सगळे एकाच वेळी अवतारतात असं नाही.
👉🏻हजारो वर्षांपासून एक वर्ग- ज्याला अस्पृश्य म्हटलं जातं, त्या वर्गातील माणसं पशुपक्ष्यांपेक्षाही हलकं जिणं जगत आहेत. त्यांचा उद्धार कसा करायचा हा माझा चिंतेचा विषय आहे. शिक्षण दिल्याशिवाय या समाजाला आत्मभान येणार नाही. आत्मसन्मानासाठी तो संघर्ष करणार नाही, स्वावलंबी होणार नाही, समर्थ होणार नाही. आमच्या बऱ्याच बांधवांना वाटतं, अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे. पण ती कशी नष्ट होणार? त्यांना या वर्गाबद्दल करुणा वाटते. पण ज्या करुणेचं कृतीत रूपांतर होत नाही ती करुणा वांझ असते. म्हणून दुःखी अस्पृश्यांच्या मुक्तीसाठी आम्ही उभं राहिले पाहिजे. आमचा खरा पुरुषार्थ त्यातच आहे.
👉🏻फकिरासारखा साधा वेश. 'गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला' हे ध्रुवपद ठरलेलं. ते सांगू लागले,
"भुकेले आहेत त्यांना भाकरी द्या, तहानलेल्यांना पाणी द्या. गरिबांना वस्त्र द्या, बेघरांना आसरा द्या. मुलामुलींना शिकवा. स्पृश्य-अस्पृश्य हा भेद पाळू नका. प्राण्यांना अभय द्या. अंधश्रद्धा बाळगू नका. माणूस मेला की की संपला. तेरावा, दशक्रिया, पिंडदान ही कर्मकांडं करण्यापेक्षा माणसावर प्रेम करा."
👉🏻शेती तर सारं गाव करतं, पण ती स्वतः साठी. समाजात अज्ञानाचं, अंधश्रद्धेचं, वाईट रूढी-परंपरांचं तण वाढलं आहे ते मात्र कुणी काढत नाही.
👉🏻ईश्वर एक आहे, मनुष्यप्राणी त्याची लेकरं आहेत, परमेश्वर आणि भक्त यात भटजींची-दलालांची गरज नाही, मनुष्य जातीने नव्हे तर स्वतःच्या गुणाने मोठा ठरतो.
👉🏻आपण नुसतं महात्मा फुले आणि शाहूंचं नाव घेऊन उपेगाचं नाही, प्रत्यक्षात काही तरी केलं पाहिजे.
👉🏻आपलं काम आपण चालू ठेवायचं आणि ते कोणत्याही परिस्थितीत थांबवायचं नाही, एवढा निश्चय त्याने आणि त्याच्या साथीदारांनी केला होता. कधी ना कधी पहाट होईल या गोष्टीवर विश्वास ठेवून तो वाटचाल करत राहिला.
👉🏻"शेतकरी म्हणजे तोच, की जो आपल्या कुटुंबाच्या व आश्रितांच्या पोषणाला, शिक्षणाला आणि योग्य त्या सुखसोयींना आवश्यक इतकीच आणि आप्तांकडून व आश्रितांकडून वाहवेल इतकीच जमीन बाळगतो आणि ती आपण स्वतः आपल्या आप्तांच्या आणि आश्रितांच्या श्रमाने खरोखर वाहतो. असं न करता जमीन धारण करतात ते भांडवलदार होत." त्यांच्या मते जमीन कसणारा कुणबी हाच शेताचा खरा हक्कदार.
👉🏻एक वेळ राजकीय क्रांती सोपी आहे, पण समाज परिवर्तनाची क्रांती सोपी नाही. ही प्रक्रिया फार मंदगतीने होणारी असली तरी समाजाचा तोल सावरण्यासाठी त्याचा उपयोग होतोच होतो.उपयोग होतोच होतो. तुमच्यासारखी माणसं या समाज परिवर्तनाच्या इमारतीच्या, पायातील दगड आहेत. इमारतीच्या सौंदर्याकडे, वैभवाकडे सगळे बघतात; पण त्याच्या पायातील दगड दिसत नसले तरी त्यांचं महत्त्व तसूभरही कमी लेखता येत नाही.
👉🏻"शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने उत्पादन काढायचं आणि सरकारने मात्र हा माल लेव्ही दराने आणि तोही सक्तीने खरेदी करावयाचा, हा जुलमी कारभार आहे हे खरं आहे. पण यासाठी विनंती अर्जाने सरकारला जाग येणार नाही. यासाठी लोकांनी रस्त्यावर आल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही. त्यासाठी लोकांच्या मनात आग निर्माण झाली पाहिजे.
👉🏻"सरकार सत्तेच्या जोरावर दंडेली करत आहे, शेतकऱ्यांच्या जिवाशी खेळत आहे. पण आम्ही हिंसा करणार नाही. हिंसा न करताही आंदोलन यशस्वी करता येते हे महात्मा गांधीनी जगाला दाखवून दिलं आहे. आंदोलनात आपण याच अहिंसेच्या मार्गाने जायला हवं, पण त्यासाठी आपली एकजूट पक्की पाहिजे. आपली एकजूट असेल तर कुणीही आपल्याला वाकवू शकणार नाही."
👉🏻 कुठलेही आंदोलन एकाएकी उभ राहत नसतं. त्यासाठी नेत्यावर विश्वास लागतो. नेत्याला ही सत्याच्या कसोटीवर उतराव लागतं, अनेक अग्नी दिव्यातून जावं लागतं.
👉🏻त्यांच्या मनात भीती नावाची गोष्ट नव्हतीच जणू. त्यांना एवढी प्रेरणा, एवढी शक्ती कुठून मिळत होती, एवढं आत्मबल त्यांनी कधी कुठून मिळवलं होतं हे गरीब खेडूतांनाही कळत नव्हतं. सत्यावर निष्ठा ही पुंजाबाबांची शक्ती होती. मी जे करतो ते सत्याला धरून आहे ना? मग मागे वळायचं नाही, घाबरायचं नाही, शरण जायचं नाही, असा त्यांचा निर्धार होता.
👉🏻 ज्या लोकांना असा वेडा विश्वास असतो की ते जगही बदलू शकतात तेच जग बदलतात.
Good
उत्तर द्याहटवाGood
उत्तर द्याहटवा