मुख्य सामग्रीवर वगळा

जन गण मन - मानव कांबळे

जन गण मन - मानव कांबळे (180126)


जोपर्यंत आपल्यामध्ये आत्मविश्वास आहे, आपल्या बुद्धीवर आपले नियंत्रण आहे, निर्णय घेण्याची आपली क्षमता प्रखर आहे, दुसऱ्याची दुःखे समजावून घेण्याची समज आहे, तोपर्यंत शरीराचा कुठलाही अवयव निकामी असलेली कुठलीही व्यक्ती अपंग नसते, यावर माझा ठाम विश्वास आहे.
                   _ मानव कांबळे


माझी बायको, माझे कुटुंब या पलीकडे जाऊन विचार करणारे, त्यानुसार कृती करणारे, थोडक्यात लष्कराच्या भाकऱ्या भाजणारे काही दुर्मिळ व्यक्ती असतात. आपला प्रपंच सांभाळून, प्रसंगी दुर्लक्ष करून अनोळखी व्यक्तींसाठी, समूहासाठी खस्ता खाणारे, वेळ, पैसा खर्च करणारे अशी संवेदनशील माणसं तयार कशी होतात?
मनात हा प्रश्न यायचं कारण म्हणजे नुकतेच जनगणमन हे मानव कांबळे लिखित आत्मचरित्र वाचलं.

💡मानव कांबळे यांची पहिली भेट

शिव फुले शाहू आंबेडकर या विचाराने प्रेरित झालेल्या मानव कांबळे यांनी पिंपरीत निर्भय बनो सभा आयोजित केली होती. मी आणि एक परिचित त्या सभेला गेलो होतो. सिन्नर घटनेच्या पार्श्वभूमीवर अशी जाहीर सभा आयोजित करणं धाडसाचं होतं. हे धाडस मानव कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पेलेलं. मानव कांबळे हा माणूस झंझावात आहे याची जाणीव झाली.

💡मानव कांबळे हे कृतीवीर असल्याचा मला आलेला पाहिला अनुभव

काही काळ मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करत होतो. आमचं कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर होतं. व्हील चेअर वर असणारे मानव कांबळे पहिल्या मजल्यावर कसे येणार असा प्रश्न मला होता? पण ते आले,मार्गदर्शन केलं आणि जाताना आमच्या आयोजक मित्राच्या हातात पैशाचे बंडल दिलं.ते घेत नव्हते तर दटावून घ्यायला लावले.
( ते पाच ते सहा हजार रुपये असावेत.)
आपल्या उत्पन्नाचा विसावा भाग सामाजिक कार्यासाठी खर्च करावा ही बाबासाहेबांची शिकवण आहे.  

💡जन गण मन विषयी 

चाळीस-पन्नास वर्षे सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याचे अनुभव या पुस्तकात आहेत. प्रस्थापित कुटुंब व्यवस्थेत जन्माला येऊन, धडधाकट माणसाला शक्य होणार नाही किंवा जमत नाही,सुचत नाही असं कार्य कर्तृत्व मानव कांबळे यांनी करून दाखवलं, करतायेत. सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक नक्की वाचले पाहिजे. शारीरिक अपंगत्व असणाऱ्या व्यक्तीने मानव कांबळे या व्यक्तीमत्वाशी परिचय करून घेतल्यास उभ्या आयुष्यात न्यूनगंड येणारं नाही.

💡थोडक्यात परिचय

👉🏻13 फेब्रुवारी 1972 वयाच्या 13 व्या वर्षी रेल्वे अपघातात पाय गेले. वडिलांनी लढण्याची प्रेरणा दिली. त्यामुळे हतबल होऊन शोक करत बसले नाहीत.

👉🏻 स्वावलंबी व्हायचं म्हणून आम्रपाली वाचनालय सुरू केलं. वाचकांना पुस्तक सुचवायचे म्हणून स्वतः भरपूर अवांतर वाचन केलं. वाचनाने माणूस चांगल्या अर्थाने बिघडतो असं म्हणतात. अन्यायाची चीड, संवेदनशीलता, शिव फुले शाहू आंबेडकर विचार आणि वक्तृत्व यात आम्रपाली वाचनालयचा मोठा वाटा असावा.

👉🏻 वडिलांच्या अकाली निधनानंतर मानव कांबळे यांनी कालनिर्णय, राख्या, फटाके विकणे यासारखे व्यवसाय केले. त्यांचा व्यवसायिक, सामाजिक पिंड आहे. प्रत्येक संधीचं व हाती घेतलेल्या कामाचं त्यांनी सोनं केलं आणि आर्थिक, वैचारिक प्रगती साधली.

👉🏻नामदेव ढसाळ यांच्या भाषणाने ते प्रभावित झाले होते. अवांतर वाचनाने वैचारिक बैठक पक्की झाली होती. फत्तेचंद कॉलेजमध्ये त्यांनी पहिला संप यशस्वी केला. नंतर कॉलेज जीवनात विद्यार्थी प्रतिनिधित्व केले.

👉🏻भाडेकरू चें प्रश्न, झोपडपट्टी वासियांचे घराचे प्रश्न, सेझ प्रकल्प याविषयी त्यांनी दिलेले लढे, दोन वेळा लढवलेली विधानसभा, जनता पक्षाचं निरपेक्ष काम, माण गावात महात्मा फुले अपंग प्रशिक्षण केंद्र सुरु करणं, स्पोर्ट्स क्लब सुरु करणं, शारीरिक अपंग व्यक्तींनी स्वावलंबी व्हावं यासाठी केलेलं कार्य याविषयी चे विस्तृत अनुभव पुस्तकात आहेत.
व्यवस्थेविषयी, सामाजिक कार्याविषयी आपलं आकलन वाढवणारे हे अनुभव नक्की वाचावेत.

💡मानव कांबळे यांनी कार्यकर्त्यांना दिलेला सल्ला

👉🏻 समाजाचे काम करताना सार्वजनिक आयुष्यात शील पवित्र ठेवले पाहिजे, ते असेल तर जगातली कुठलीही शक्ती तुमचा पराभव करू शकत नाही.
👉🏻 शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा.
👉🏻 तुमच्या कुठल्याही वैयक्तिक स्वार्थासाठी तुम्ही कोणाकडेही मदतीची याचना करू नका, तुम्हाला तुमच्या सामर्थ्यावर जेवढे करणे शक्य असेल तेवढेच करा एवढे केले तर तुम्हाला कोणाच्याही दबावाखाली यायचे कारण नाही.

सामाजिक काम करण्याआधी स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं गरजेचं आहे याची जाणीव मानव कांबळे करून देतात.

💡मानव भाऊनां न आवडणाऱ्या गोष्टी 
👉🏻खोटं बोलणं 
👉🏻 एखाद्याच्या पाठीमागे त्याच्याबद्दल टीकाटिपण्णी करण.
👉🏻कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाण.

💡पुस्तकातील काही उतारे 

👉🏻अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो. आपल्या न्याय्य हक्कांसाठी भांडणे हा सर्वसामान्यांचा अधिकारच आहे. मागून जे मिळत नाही ते हिसकावून घ्यायची तयारी ठेवली पाहिजे.

👉🏻माणसाचं आयुष्य क्षणभंगुर असतं हे खऱ्या अथनि त्या दिवशी जाणवलं. हे जग निरंतर आहे पण स्वतःच वेगळं जग निर्माण करण्याची धमक असणारी माणसं हे सर्व जागेवरच सोडून जात असतात हेही जाणवलं. त्या अग्नीमध्ये जळून राख होणाऱ्या माझ्या बापाच्या देहाकडे पहात मी मनोमन ठरवलं की, जी स्वप्न पापांनी माझ्यासाठी बघितली होती, मी ती पूर्ण करणार. मी स्वतःच्या पायावर उभं रहावं असं त्यांना सतत वाटायचं, माझ्या शारीरिक अवस्थेमुळे त्यांना असं वाटायचं की यानं स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी झालं पाहिजे. कुणावरही अवलंबून राहता कामा नये. मी पापांना मनोमन असं वचन दिलं की, मी तुमचा शब्द पडू देणार नाही. मी माझं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व या समाजात निर्माण करीन. संकटात असलेल्यांना मदत करीन, ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्या अन्यायाला वाचा फोडेन. तुम्ही ज्या स्वाभिमानाने जगलात आणि आम्हाला जगायला शिकवलं त्याचप्रमाणे स्वाभिमानाने जगेन, कुणासमोर झुकणार नाही, नमणार नाही. तुमच्या नावाला बट्टा लागेल असे कृत्य आणि वक्तव्य चुकूनही करणार नाही. माझा बाप माझ्यासाठी आदर्श होता, आहे आणि मरेपर्यंत राहील.

👉🏻कुठल्याही गर्दीचे एक मानसशास्त्र असते. जोपर्यंत पर्याय मिळत नाही, तोपर्यंत भित्रे लोक मान खाली घालून अन्याय सहन करत असतात. पण त्यांच्या बाजूने कोणीतरी तेवढ्याच ताकदीने लढणारे जर कोणी त्यांना दिसले तर ते त्या नव्या नेतृत्वाच्या बाजूने उभे राहतात आणि अगोदर ज्यांनी त्यांच्यावर अन्याय केलेला असतो. त्यांचा पुरता हिशोब करण्यासाठी ते तयार होतात.

👉🏻'भुकेलेली माणसंच क्रांती करू शकतात.

👉🏻जर माझ्या आयुष्याची अखेर आली असेल आणि कोणी मला म्ङणाले की दारू प्यायल्यावर तुझे आयुष्य वाचू शकते, तर अशा वेळी मी मरणं पत्करेन पण दारूला स्पर्श करणार नाही.

👉🏻माझ्या आई-वडिलांनी माझ्यावर केलेला हा एक खूप मोठा संस्कार आहे, तो म्हणजे आयुष्यात ज्या-ज्या लोकांनी तुम्हाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कळत-नकळत मदत केलेली आहे, त्यांचे योगदान कधीही विसरता कामा नये आणि ज्या-ज्या वेळेस संधी मिळेल, त्या-त्या वेळेस ते जाहीरपणे मान्य करण्यातच माणसाचे मोठेपण लपलेले असते. या जाणीवा जर माणसाने आपल्या मनात कायम जपल्या तर तुम्हाला त्या कायम जमिनीवर ठेवायला उपयोगी ठरतात. तुमच्या मनात तुम्ही खूप यशस्वी झालात, तुमच्याकडे कितीही पैसा आला, तुम्हाला कितीही प्रसिद्धी मिळाली तरी तुमच्यामध्ये त्या सर्वांचा कधीही अहंकार निर्माण होत नाही.

👉🏻"तुम्हाला जर तुमचे व्यक्तिमत्त्व घडवायचे असेल तर एकदा तुम्हाला काय आणि कुठल्या विचाराने काम करायचे ते निश्चित करा. त्याप्रमाणे नेतृत्वाची निवड करा, संघटनेची निवड करा आणि त्या संस्था-संघटनांची नियमावली, उद्दिष्टे आणि कार्यप्रणाली अभ्यास करून अवगत करून घ्या आणि आपली निष्ठा आणि विचार पक्का करून सातत्यपूर्ण प्रामाणिकपणे कामात स्वतःला झोकून द्या, तुमचे ध्येय तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही.

👉🏻राजकारणामध्ये तुम्हाला कायम वर्चस्व टिकवून ठेवायचे असेल तर तुम्हाला रस्त्यावरच्या लढाया सातत्याने कराव्या लागतात. समाजातील मूलभूत समस्यांसाठी सतत आवाज उठवावा लागतो.

👉🏻आंदोलनात किती लोक सहभागी होतात हे महत्त्वाचे नसते, तर लोकांचे प्रश्न समजावून घेऊन त्यांना वाचा फोडणे आणि शासनदरबारी त्याची दखल घ्यायला लावणे हे अधिक महत्त्वाचे असते.

👉🏻 माणसाच्या आयुष्यात पैशांपेक्षा प्रामाणिक लोकसंग्रह असणे हे महत्त्वाचे आहे.

👉🏻भाईंनी त्यांच्या मार्गदर्शनात एक मोलाचा सल्ला दिला होता. तो सल्ला पाळण्याचा मी अजूनही कसोशीने प्रयत्न करतो. ते म्हणाले होते, "एक तर मराठी माणूस व्यवसाय करत नाही, आणि केलाच तर येईल ते जमा, जाईल तो खर्च, शिल्लक राहिले तर नफा नाही तर तोटा अशा पद्धतीने तो व्यवसाय करतो, त्यामुळे व्यवसायातील यशस्वीतेची शक्यता खूप कमी असते, मानव. तू असे करू नकोस, व्यवसायाकडे पूर्णवेळ लक्ष देऊन तो कायम नफ्यात कसा राहील याकडे लक्ष दे." हा त्यांचा सल्ला मला पुढील आयुष्यात खूप उपयोगी पडला आहे.

👉🏻आर्थिकदृष्ट्या परावलंबी असणारा कार्यकर्ता हा पुढे जाऊन लाचार बनतो, आणि तो मग चळवळीलाही लाचार बनवतो.

👉🏻हा अनेक आंदोलनांमध्ये आलेला अनुभव आहे की, ज्या लोकांची कामे होतात ते लोक उरलेल्या लोकांसाठी कधीच मैदानात उतरत नाहीत. हा मनुष्य स्वभावच आहे. काम झालेल्या लोकांची मानसिकताच अशी असते की, 'अगर अपना काम है बनता तो भाड में जाये जनता'. अनेक सामाजिक, कामगार आंदोलनांमधला हा सार्वत्रिक अनुभव आहे.

👉🏻आपल्याकडे जे आहे, त्याचा माज करायचा नाही आणि दुसऱ्याकडे जे आपल्यापेक्षा जास्त आहे, त्याची 'असूया' बाळगायची नाही हे साधे आणि सोपे समाधानी आयुष्याचे सुत्र आहे.

👉🏻माणसाच्या आयुष्यात जास्तीत जास्त वाईट काय तर त्याचा मृत्यू असं समजले जातं. त्या मृत्यूचंच भय आम्ही धुडकावून लावल्यामुळे याच्या आधीही काही वेळा आणि नंतरच्याही काळात कोणीही आम्हाला मॅनेज करू शकले नाही.

👉🏻आमची प्राथमिकता ही समाजातील सर्वात उपेक्षित घटक आहे. शेतकरी कष्टकरी दलित आदिवासी समाज हा अगोदरच साधनांच्या अभावामुळे त्रस्त झालेला असतो. त्यांना संघटित करून लढणे हे खूप मोठे आव्हान असते. त्यामुळे म्हणावे असे यश या राजकारणाला मिळत नाही हे या ठिकाणी मान्य करावेच लागेल.

👉🏻बऱ्याचदा काय होते, की सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असतांना राजकीय भूमिका घेतली तर लोकांना ते आवडत नाही. सामाजिक कार्यकर्त्याने राजकारणात प्रत्यक्ष सहभाग घेऊच नये अशी सर्वसाधारणतः समाजाची भूमिका असते. मला आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांना हा सिद्धांत मान्य नाही. समाजकारण आणि राजकारण हे दोन वेगवेगळे घटक आहेत ही गोष्ट आम्हाला मान्य नाही. उलट पक्षी समाजात प्रभावीपणे काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष राजकारणातही उतरले पाहिजे व राजकारणाला योग्य दिशा दाखविली पाहिजे, असा आमचा प्रयत्न असतो.

👉🏻डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात की ज्या कार्यकर्त्यांचे 'शील' निष्कलंक असते त्याच्या कामाला स्वीकारल्याशिवाय कुणालाही पर्याय रहात नाही. आपण विचाराने पक्के असलो, कामात प्रामाणिक असलो आणि आपल्या प्रयत्नात सातत्य असले तर तुम्ही तुमच्या इच्छित ध्येयापर्यंत आज नाही तर उद्या पोहचताच. माझा या विचारावर ठाम विश्वास आहे.

👉🏻सत्ताधारी पक्ष आणि भांडवलशाही जेव्हा एकत्रित येते तेव्हा ती हुकूमशाहीकडे प्रवास करायला लागते आणि त्या व्यवस्थेमध्ये सर्वात जास्त नुकसान हे समाजातील शेवटच्या वर्गाचे होत असते. त्यांचा आवाज होऊन लढणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या वाढली पाहिजे. काम अवघड आहे पण ते करावेच लागणार आहे.

👉🏻मी एक विचार पक्का मानतो तो म्हणजे आयुष्य आहे तर संकटे येणार, परिस्थितीनुसार अनेक आव्हाने उभी राहणार पण तुमचा तुमच्यावर विश्वास असेल, त्या संकटांवर मात करण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करण्याची तुमची तयारी असेल, तुमचा परिवार आणि सहकारी तुमच्याबरोबर असतील, तर त्या सर्वावर तुम्हाला यशस्वीपणे मात करता येते. संत रविदास म्हणतात, 'मन चंगा तो कटोती में गंगा।' मन स्वच्छ ठेवा, मजबूत ठेवा, लाथ मारीन तिथं पाणी काढीन अशी मानसिकता ठेवा, सगळ्या अडचणींना आणि आव्हानांना सहजपणे पार करत तुम्हाला यश मिळवता येते.

👉🏻राजकीय स्वार्थासाठी तडजोड करणे म्हणजे कुठल्यातरी राजकीय पक्षाची किंवा नेत्यांची लाचारी पत्करणे, त्याची गुलामी करणे, त्याच्या कुठल्याही गोष्टीचे समर्थन करणे, मग ती गोष्ट समाजाच्या हिताच्या विरुद्ध असली तरीसुद्धा बाबासाहेब म्हणतात, 'लाचार होऊन शेळी बनून अनेक वर्षे जगण्यापेक्षा वाघ होऊन एक दिवस जगा' स्वतःच्या विचारांशी प्रतारणा करू नका. जनावरामध्ये आणि माणसामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. तो म्हणजे जनावराला विचार करण्याची शक्ती नसते पण माणसाला विचार करता येतो. चांगल्या-वाईटातला फरक समजावून घेता येतो. माणसाला बुद्धी आहे आणि त्या बुद्धीचा वापर कसा करायचा याचाही निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते. या क्षमतेचा वापर जर आपल्याला करता आला नाही तर मग आपल्यामध्ये आणि जनावरामध्ये काय अंतर राहणार? जे समाजाच्या विरोधात आहे, जे विषमतेचा पुरस्कार करते, ज्यामुळे लोकांच्या दारिद्र्यात वाढ करते, जे सामान्य माणसाला शिक्षण घेण्यापासून परावृत्त करते, ज्याच्यामुळे सामान्य माणसांच्या मूलभूत आणि घटनात्मक अधिकारांवर आक्रमण होते, त्याला जमेल तसा वैयक्तिक असो वा सामूहिकपणे असो, आपल्या शक्तीनुसार विरोध करणे म्हणजेच माणूस म्हणून जगणे असे मी समजतो त्यामुळेच माझ्या आयुष्याची दिशा ठरलेली आहे आणि ती निश्चित आहे. तिच्यापासून फारकत घेणे म्हणजे जिवंत असताना मृतावस्थेमध्ये जगणे असते, असे मी समजतो. समाजातील वाईट प्रथा, परंपरा व गोष्टी यांना विरोध करत असताना अधिक स्पष्टपणे व्यक्त व्हावे लागते. अनेक प्रस्थापितांची नाराजी त्यामुळे ओढवून घ्यावी लागते. त्याचे परिणाम या व्यावहारिक जमान्यात आपल्या विरुद्ध जाणारच असतात. पण तरीही आपण न डगमगता पुढे जायचे असते हेच तर या महापुरुषांनी आपल्याला शिकविले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे की, "तुम्ही तुमच्या आयुष्यात जर तुमचे चारित्र्य हे सर्वोच्च ठिकाणी ठेवले तर कितीही मोठ्या शक्तीबरोबर तुम्ही लढू शकता आणि त्यात विजयीसुद्धा होऊ शकता."

तुम्ही किती शिकलात, तुम्ही किती संपत्ती मिळवलीत यापेक्षा तुमचे शील कसे आहे यावर तुमची किंमत होत असते. वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यामध्ये हे तत्त्व ज्याला सांभाळता आले त्याला जगातली कुठलीही शक्ती खरेदी करू शकत नाही.

👉🏻अन्यायकारी व्यवस्थेच्या विरुद्ध आपण बोलले पाहिजे, व्यक्त झाले पाहिजे. त्यासाठी जे लढे उभे राहतील त्यामध्ये यथायोग्य सहभाग यामुळे आमच्यातला आत्मविश्वास वाढला होता.

👉🏻"मी कोणी विचारवंत नाही, मी एक कार्यकर्ता आहे. सध्या समाजाला विचारवंतांची नाही तर कार्यकर्त्यांची गरज आहे. ते पुढे म्हणाले होते, "विचारवंत म्हणजे अशी व्यक्ती की जी दररोज सकाळी उठल्यानंतर आज दिवसभरात काय करायचे आहे, ते ठरविते, दुपारपर्यंत ते झाले नाही, तर दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ते करण्याचा विचार करते आणि रात्री झोपतांना आज दिवसभारत ते काम झाले नाही म्हणून तेच काम उद्या करायचा विचार करून झोपी जाते, समाजाला अशा विचारवंतांची अजिबात गरज नाही तर, कुठल्याही परिस्थितीत आपण ठरविलेले काम पूर्ण करण्यासाठी आपला प्रत्येक क्षण त्यासाठी खर्च करणाऱ्या कार्यकर्त्याची गरज आहे."

👉🏻जो मॅनेज होऊ शकतो. त्यालाच मॅनेज करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असतो. जो स्वतःची किंमत करून घ्यायला तयार असतो, त्याची किंमत ठरविण्याची हिम्मत विरोधक करत असतात. ज्याला स्वतःबद्दल आत्मविश्वास नसतो, तोच दुसऱ्यांच्या धमक्यांना घाबरत असतो.

👉🏻अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवतांना कशाचीही पर्वा करायची नाही, ही त्यांनी दिलेली शिकवण, अरे ला कारे म्हणता आले पाहिजे, उगाच कोणाच्या अंगावर जायचे नाही आणि जर कोणी तुमच्या अंगावर आले तर त्याला सोडायचे नाही, त्यासाठी लागेल ती किंमत मोजायला लागली तरी हरकत नाही, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की, तुम्ही कुठलीही चूक करायची नाही, हे मी माझ्या वडिलांकडून शिकलो होतो.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...