आजीवन ऐशो आरामाची आखणी - डब्ल्यू समरसेट मॉम (अनुवाद - विलास साळुंखे )
विल्सन बँकेत कामाला असतो. पत्नीच्या निर्णयानंतर त्याला बांधून ठेवेल असे कोणतेही पाश राहत नाहीत. पूर्वी कधीतरी कॅपरी बेटाचे सौंदर्य पाहून तो प्रभावित झाला होता.
वयाच्या 35 व्या वर्षी तो निर्णय घेतो सर्व सोडून कॅपरी बेटावर कायमचा स्थानिक होण्याचा. निसर्ग सौंदर्य पहायचं, पोहायचं,वाचन करायचं... मनाप्रमाणे जगायचं.
पुढील पंचवीस वर्षे पैसे पुरतील इतकी तो तजवीज करून ठेवतो आणि मग पुरेपूर जीवन उपभोगल्यानंतर साठव्या वर्षी आत्महत्या करायची असं त्याचं नियोजन असतं.
25 वर्ष तो त्याच्या मनाप्रमाणे जगतो, पण साठाव्या वर्षी त्याचा निर्धार ढळतो. त्यानंतर पुढील 6 वर्षे तो जगतो, ती एक शोकांतिका ठरते .(जगाच्या दृष्टीने )
कथेतील काही उतारे
👉🏻मोकळा वेळ मिळणं हा माणसाला मिळू शकणारा एक अमूल्य असा ठेवा आहे आणि लोक इतके मूर्ख असतात, त्यांना कळत नाही तो कायम जपला पाहिजे; इतकंच नाही तो मिळवणं हेच त्यांचं ध्येय असलं पाहिजे. कामकाज करणं? लोक कामासाठी काम करतात. त्यांच्या मेंदूला हे कळत नाही की, कामकाज करण्याचं फक्त एकच प्रयोजन असू शकतं ते म्हणजे आराम-स्वस्थता-मोकळा वेळ मिळवणं.
👉🏻सर्व गोष्टींचा त्याग करून सुखी जीवन जगण्यासाठी मिळणारा सर्व प्रकारचा आनंद आणि आराम मिळवून देणारं पुरेसं उत्पन्न माझ्याकडे नसणं, हे अगदी मूर्खपणाचं ठरलं असतं. मला माझी स्वत:ची जागा हवी होती, माझी काळजी घेणारा एक नोकर तसेच तंबाखू, खायला चांगलंचुंगलं अन्न, अधेमधे वाचण्यासाठी पुस्तकं आणि ऐनवेळी अचानक निर्माण होणाऱ्या आणीबाणीच्या खर्चासाठी पुरेसे पैसे हवे होते. मला नेमकी किती रक्कम हवी होती याचा मला नीटसा अंदाज आलेला होता. माझ्या लक्षात आलं की, पंचवीस वर्षे आरामात जगता येईल एवढी रक्कम माझ्याकडे होती.
👉🏻लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तरी त्याला राग येत नसे. त्याला लोकांचा सहवास आवडायचा, परंतु त्यांच्या जास्त जवळ न जाता तो दूरच राहायचा. जरी तो काटकसरीने राहायचा, तरी स्वतःच्या सुखसोई आणि आरामाची सोयही करायचा. तो कोणाचेही कधीही एक पैसा देणे लागत नव्हता.
👉🏻मला वाटतं, त्याने निर्धारपूर्वक असं ठरविलं होतं की, त्याच्या जीवनातील वैयक्तिक स्वातंत्र्यावर आणि सुखावर कोणत्याही कारणामुळे कधीही विपरीत परिणाम होता कामा नये. त्याच्या मनात रुजलेली सर्वश्रेष्ठ लालसा ही फक्त येथील निसर्गसौंदर्यासाठीच होती आणि आयुष्यातील साध्या, सरळ, नैसर्गिक गोष्टीतील आनंद सहजपणे मिळविण्याकडेच त्याचा कल होता. एका अर्थी तुम्ही असंही म्हणू शकला असता की, त्याचं जगणं हे निखालस स्वार्थी होतं. होय, ते तसं होतं, त्याचा कोणालाही काहीही उपयोग नव्हता, परंतु याउलट हेही खरं होतं की, त्याने कधी इतर कोणाला त्रासही दिला नव्हता.
👉🏻मी फक्त हाच विचार करीत होतो की, आजपासून दहा वर्षांनी - एखाद्या अचानक आलेल्या आजारामुळे त्याच्या आयुष्याची दोरी त्याआधीच तुटली नसली तर आवडणारे हे जग सोडून जाण्यासाठी त्याने जाणीवपूर्वक स्वत:ला कसं संपविलं असतं? माझ्या मनात येऊन गेलं, मृत्यूबद्दलचा हा विचारच, जो त्याच्या मनातनं कधीही दूर गेला नसणार, त्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण उत्साहाने जगण्यासाठी त्याला सतत बळ देत असणार!
👉🏻पंचवीस वर्षं अत्यंत सुखानंदात घालविल्यावर त्याची प्रकृती आणि नैसर्गिक गुणविशेष जरा कमजोर झाले असू शकतील. त्याचा स्वभाव, त्याची मानसिक शक्ती क्षीण होण्याची शक्यता त्याने गृहीत धरली नसावी. माणसाची इच्छाशक्ती आणि काम करण्यासाठी लागणारी ईर्षा आणि ऊर्जा - यांचा वापर करण्यासाठी जीवनात काहीतरी अडचणी व अडथळे येण्याची गरज असते. जर इच्छाशक्तीला काहीही विरोध झाला नाही, हवे ते मिळविण्यासाठी काही प्रयत्नच करण्याची गरज पडली नसेल कारण आपले ईप्सित जवळ म्हणजे हात पसरताच आपल्याला मिळू शकले तर माणसाची इच्छाशक्तीच दुबळी होऊन जाते. जर तुम्ही कायमच सपाटीवर चालत राहिलात तर चढाव चढण्यासाठी लागणारी स्नायूंची ताकद कमजोर होऊन जाते. ही निरीक्षणे क्षुल्लक वाटतील; पण ती खरी आहेत. प्रदीर्घ काळाच्या सुखानंदासाठी व आरामदायी आयुष्यासाठी त्याने केलेल्या तयारीमुळे त्याच्याकडील पैसे संपल्यानंतर स्वत:चा स्वहस्ते शेवट करण्यासाठी लागणारा निर्धार त्याच्याकडे उरला नव्हता.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा