मुंबई दिनांक - अरुण साधू
मुंबई दिनांक ही कादंबरी 70 च्या दशकात आली. त्या दशकातील मुंबईचे राजकीय आणि सामाजिक वास्तव ज्या परखडपणे यात मांडले आहे, ते आजही तितकेच प्रभावी वाटते.
ही कादंबरी एका पूर्ण दिवसाच्या (24 तासांच्या) कालखंडात घडते. नावाप्रमाणेच ही एका दिवसाची 'डायरी' किंवा 'दिनांक' आहे. यात मुख्यत्वे पत्रकारिता, राजकारण आणि नोकरशाही यांचे साटेलोटे दाखवले आहे.
सत्तेसाठी चाललेली खेळी, मुख्यमंत्री आणि त्यांचे प्रतिस्पर्धी यांच्यातील संघर्ष आणि प्रशासकीय यंत्रणेचा वापर कसा केला जातो, याचे चित्रण यात आहे.
बातमी कशी 'बनावटी' असू शकते किंवा एखाद्या बातमीचा वापर करून कसे राजकारण केले जाते, याचे दर्शन अरुण साधू यांनी स्वतः पत्रकार असल्यामुळे अत्यंत बारकाईने घडवले आहे.
💡अय्यर
अय्यर वेस्टर्न स्टार या वृत्तपत्रात मुख्य संपादक आहे. जाहिरातदार, मालक यांच्या अपेक्षा पूर्ण करून तो वैतागलेला आहे. पत्रकारितेशी प्रतारणा करण्याचा त्याचा स्वभाव नाही. त्यासाठी किंमत चुकवण्याची त्याची तयारी आहे. मुंबईवर महाराष्ट्र वर त्याचे जीवापाड प्रेम आहे. कुटुंब नसल्याने बाहेरख्याली करण्यात अय्यर सरस आहे. त्याच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या सॅली ला भेटायला जाण अखेरपर्यंत त्याच्याकडून होतं नाही. तिच्या मृत्यूनतंर आलेली अपराधी भावना घालवण्यासाठी फरास रोड वर जातो, निर्हेतुक पैसे वाटतो.
अय्यर चांगला माणूस असतो पण मुंबई शहरात नकळत यंत्रवत होतो.
💡किशोर वझे
किशोर वझे मंत्रालयात लेखनिक आहे. आपल्या रूपाचा, पगाराचा त्याच्यात न्यूनगंड आहे. नीला बद्दल त्याच्या मनात कोमल भावना आहेत. तिच्या वडिलांच्या आजारपणात त्याने आपली संपूर्ण बचत खर्च केलीत. गावाकडे आई-वडिलांना तो कित्येक वर्षात भेटलेला नाही. भाऊ जयंतच्या प्रगती बद्दल त्याच्या मनात आदर आहे.
गाव सोडून मुंबईत स्थायिक व्हावं लागणाऱ्या सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व किशोर वझे करतो. या माणसाच्या दैनंदिन जीवनात कोणताही चमत्कार होत नसतो. गोड शेवट फक्त सिनेमात होतो प्रत्यक्ष जीवन खरतड आहे हे सांगणारा किशोर वझे..
💡दयानंद पानिटकर
दयानंद पानिटकर पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईला आला. गिरणी कामगार झाला.त्याच्यातील चमक पाहून युनियन लीडर कास्टाने त्याला मॅट्रिक होण्यास सांगितले. तो रात्र शाळेत जाऊ लागला. काही कारणाने दयानंद चे शिक्षण आणि गिरणी सुटते. तो पेट्रोल पंप वर काम करू लागतो. तिथला मालक "मेथा" त्याला सोन्याच्या तस्करीत आणतो. दयानंद लग्न करतो, त्याची आर्थिक भरभराट होते. पत्नी सुनंदा,मुलगी जया यांच्या विचाराने तो तस्करी सोडण्याचा विचार करतो. कोकणातील गावाला जाऊन दुकान टाकण्याचा त्याचा विचार असतो पण......
काही व्यवसायात एकदा प्रवेश केला तर सुटका नसते. तुमची इच्छा नसेल, कंटाळा आला तरी भूतकाळ पाठ सोडत नाही. जगलेला भूतकाळ, कर्म त्याची किंमत वसुल करतेच.
मुंबई त दोन नंबरचा धंदा करणाऱ्यांच प्रतिनिधित्व दयानंद पानिटकर करतो.
💡सेबेशियन डि कास्टा
सेबेशियन डि कास्टा मूळचा गोव्याचा, परिस्थिती त्याला बालवयातच मुंबईला घेऊन येते. जगण्याच्या संघर्षात तो गिरनी कामगार होतो. गिरणी गेट वरील संपात बोलण्याची संधी मिळते आणि तो चमकतो, कामगार नेता होतो. संघटनेचे नेते कामगारांचे हीत न पाहता प्रस्थापित भांडवलदारांचे हित पाहतात असं म्हणून स्वतःची वेगळी कामगार संघटना काढतो. आणि नकळत तोही तेच करू लागतो. त्याचा मित्र रघु त्याला तो बुर्ज्वा झाल्याचं जाणवून देतो. पण डि कास्टा ला त्याचाच मध्यम मार्ग रास्त वाटतो.
स्मगलिंग मध्ये गुंतलेल्या बड्या नेत्या- अधिकाऱ्यांची फाईल डि कास्टा ने जमवली आहे. त्यसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेण्यास तो गेला आहे. ज्या व्यवस्थेशी लढता लढता तो मोठा झाला, त्याच नावं झालं त्याचं व्यवस्थेला तो शरण जातो.
डि कास्टा त्याच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माणसांचा वस्तू सारखा वापर करतोय. त्यालाही हे जाणवतंय पण सत्य स्वीकारण्याची तयारी नाही.
💡 जयाजीराव लक्ष्मण शिंदे
तीन भावात पाऊण एकर शेती असलेला हा भणंग माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. शिक्षण, वक्तृत्व,वकिली,विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक शिंदेना विधिमंडळात घेऊन गेली.
मुख्यमंत्री विचार कसा करतो? काम कसं आणि किती करतो? याचा अफलातून वर्णन यात आहे. एखाद्या विरोधकाची, कामगार नेत्याची,मंत्रिमंडळातील सहकाऱ्याची माहिती काढण्याचे कल्पनातीत मार्ग मुख्यमंत्र्याकडे असतात. शिंदेंचा धोरणीपणा, विचार करण्याची पद्धत धुरंदर राजकारणी कसा असतो हे दाखवते. कामगार नेता डी कास्टा याला दिलेला प्रस्ताव मास्टरस्ट्रोक होता.....
पदानी मोठी असणारी माणसं भावनांवर ताबा ठेवायला शिकलेली असतात.
जयाजीराव शिंदे मुंबईतील सत्ता धिशांचं प्रतिनिधित्व करतो. सत्तेच्या राजकारणात स्वतःचे स्थान टिकवून ठेवण्यासाठी चाललेली त्यांची धडपड यात दिसते. प्रामाणिक कामं करण्याची इच्छा असूनही बऱ्याचदा नाईलाज होतो. स्वकीय गोत्यात आणतात, ते निस्तारताना व्यवस्थेला मनाप्रमाणे वापराव लागतं.
मुंबई ही माणसांची नाही,
तर सत्तेची, पैशाची आणि भयाची राजधानी आहे. हे सांगणारी, अखेरच्या पानापर्यंत उत्कंठा वर्धक असणारी, शेवट वाचकांवर सोपवणारी ही कादंबरी वाचनीय आहे.
_सिद्धेश्वर
प्रकाशक - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
किंमत -200/-
पाने -268
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा