एक झाड दोन पक्षी - विश्राम बेडेकर
माणूस हा विचार करू शकणारा प्राणी आहे. मोह मत्सर वासना उदात्त भावना यांचा उद्रेक कमी जास्त प्रमाणात होतं राहणाऱ्या, झालेल्या चुकातून न शिकणाऱ्या माणसाचं आत्मकथन म्हणजे एक झाड दोन पक्षी
“एक झाड – दोन पक्षी” हे शीर्षकच सूचक आहे. एकच झाड, पण त्यावर बसलेले दोन पक्षी
जणू एकाच व्यक्तीत वसलेली दोन मने.
एक मन समाजात वावरणारं, जबाबदार, समजूतदार.
दुसरं मन अंतर्मुख, प्रश्न विचारणारं, असमाधानी.
हे आत्मचरित्र म्हणजे घटनांची यादी नाही,
तर लेखकाच्या आत चाललेल्या संघर्षाचा प्रामाणिक लेखाजोखा आहे. अनुभव घेणारा तो आणि चिंतन करणारा तो यांच्यातील संवादातून विश्राम बेडेकर यांचा जीवनकाल उलगडत जातो.
रणांगण कादंबरीचे लेखक म्हणून विश्राम बेडेकर माहित झाले होते. त्या कादंबरीतील हार्टा हे पात्र, तिने लिहिलेली शेवटची तीन पत्र आजही मनात रुतून आहेत, तेव्हाच "एक झाड दोन पक्षी" हे आत्मचरित्र विकत घेतलेलं.
ऑगस्ट 1906 मध्ये विश्राम बेडेकर यांचा जन्म झाला. बालपणापासूनच त्यांनी शिक्षणाला, इंग्रजी भाषेला, अवांतर वाचनाला, पाठांतर, वक्तृत्व याला महत्व दिल, त्यावर त्यांनी भरपूर काम केलं. जन्मताच मिळालेल्या सांस्कृतिक वारशाचा त्यांना खूप फायदा झाला. BA, MA होऊन त्यांनी वकिलीची परीक्षा पास केली.
आपल्या मुलाने मोठा वकील होऊन घराचं दारिद्र्य दूर करावं, आपल्याला घोडा गाडीतून फिरवावं अशी त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती. पण.....
घरच्यांनी त्यांच्या मनाविरुद्ध विवाह करून दिल्याने ते नाराज झाले, घराबाहेर राहू लागले.
मूर्ख लोक नको तिथे धडपडतात (हे त्यांचेच शब्द) या म्हणी प्रमाणे विश्राम बेडेकर बलवंत नाटक कंपनीच्या सहवासात आले. पुढे ही कंपनी चित्रपट व्यवसायात आली आणि बेडेकरांच्या आयुष्याने कायमचे वळण घेतले. त्यांनी निर्माण केलेल्या नाटक, चित्रपट याचे विस्तृत अनुभव यात दिले आहेत.
व्ही शांताराम, भालजी पेंढारकर, बाबूजी पेंढारकर, हरी मोटे, दीनानाथ, प्रभात स्टुडिओ आणि एकूणच त्याकाळची चित्रपट सृष्टी त्यातील माणसं, त्यांचं विक्षिप्त वागणं हे अनुभव माणसांविषयी, जीवनाविषयी आपली समज वाढवत.
बेडेकर शिष्यवृत्ती घेऊन इंग्लंडला सिनेमॅटोग्राफी अभ्यासासाठी गेले होते. लंडनला पोहोचण्यास सहा महिने उशीर झाला, 6 महिने कोर्स केला. पुरेशी उपस्थिती नसल्याने परीक्षेला बसू दिले नाही. युद्धाची धामधुमी, आर्थिक तारांबळ यामुळे आणखी एक वर्ष थांबणे शक्य नव्हतं. इटलीहून परतीच्या बोटीने भारताकडे निघाले. परतीच्या प्रवासातील अनुभव रणांगण च्या निर्मितीस कारण ठरले.
बेडेकरांनी त्यांच्या आईचा, वडिलांचा, पहिल्या पत्नीचा, मुलाचा, बाळुताईंचा, स्वतःचा असा कित्येकांचा अपेक्षाभंग केला. त्यांच्या वाट्याला ही अपेक्षाभंगाचं दुःख आलं, त्यातून आर्थिक, मानसिक ओढाताण झाली. या सर्वांचा प्रांजळ लेखाजोखा या आत्मचारित्रात आहे.
💡बेडेकरांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट
रामशास्त्री, चूल आणि मुल, अमर भूपाळी, शेजारी, विनोबा भावे माहितीपट
💡बेडेकरांच्या अनुभवाच मला वाटलेलं सार
👉🏻माणसं चुकांमुळे शहाणी होतं नाहीत.
👉🏻ऐनक्षणी कच खाऊन उदार होतात.
👉🏻कायद्याला दुय्यम ठरवून गृहीतके धरून वागतात आणि मग ठेस लागते.
👉🏻माणसं ही तुकड्या तुकड्यानी मोठी असतात.
👉🏻प्रत्येक जण एकदुसऱ्याला वापरून घेत असतो.
👉🏻यश पैसा आला म्हणून निव्वळ मस्तीत राहू नका.
जीवनाच्या चक्रीवादळात सापडून एका माणसाच्या मनाची जी उलाघाल झाली त्याची ही हकीकत.... एकवेळ वाचून, समजून घ्यावी त्याने आपलं शहाणपण वाढेल.
_सिद्धेश्वर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा