रंगात रंगालो मी - चित्तरंजन कोल्हटकर
शास्त्रीय संगीत ऐकणारा एक विशिष्ट वर्ग असतो तसंच नाटक पाहयला जाणारा ही एक विशिष्ट वर्ग असतो. या वर्गाला सावरकरांचं,संघाचं आकर्षण असतं. बोलायला, लेखणी चालवायला हा वर्ग खूप हुशार असतो. हा वर्ग संधी मिळेल तिथे संघी विचारांचं, नेत्यांच उदात्तीकारण करतो. हे अनुभवकथन ही याला अपवाद नाही.असो...
चित्तरंजन कोल्हटकर यांना वडिलांकडून नाटकाचा वारसा मिळाला. बालपणापासूनच ते नाटक चित्रपट यामध्ये कामं करू लागले. वडील चिंतामण कोल्हटकर यांची दीनानाथ मंगेशकर यांच्या बरोबर बळवंत संगीत कंपनी मध्ये भागीदारी होती. ही कंपनी नाटक काढायची. काळ बदलला. बोलपट, मूकपट आले. नाटक मागे पडू लागले. चिंतामण यांनी नाटक कंपनी बंद करून सिनेमा निर्मिती सुरू केली. आयुष्याची जमापुंजी लावली पण अपयश आले. देणेकरी दारापर्यंत आले. फरार व्हावं लागल. आर्थिक मानसिकरित्या कुटुंबाची कंपनीचीं वाताहत झाली. आठ नऊ वर्षाचा चित्तरंजन हे सर्व पाहत होता अनुभवत होता.
आपल्या मुलांनी नाट्य व्यवसायात न येता इतर काहीतरी करावं अशी चिंतामणराव यांची इच्छा होती, पण मुलगा चित्तरंजन याच्यावर कळत नकळत कलेचे संस्कार झाले होते. तो नाट्य आणि सिनेमा क्षेत्रात आला. पैसा आणि नाव कमावलं. 60-65 वर्षे कलेच्या क्षेत्रात कामं केलं. यासंबंधीचे अनुभव पुस्तकात आहेत. नाटकाची आवड असणाऱ्या, त्याच्याशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींनी हे अनुभव जरूर वाचावे.
चित्तरंजन कोल्हटकर यांची काही नाटके -
अश्रूंचीं झाली फुले, देवमाणूस, मुद्राराक्षस, रायगडचा राजबंदी.....
💡मनातलं
सामान्य माणूस चित्रपट पाहायला कधीतरी थेटरला जातो.पण नाटक पाहायला जात नाही असा माझा अनुभव आहे. सिनेमाचा ट्रेलर येतो तसं नाटकाचा ट्रेलर पाहण्यात आल्यावर यात फरक पडेल का?
घरी लग्नकार्य असेल किंवा इतर कोणता कार्यक्रम असेल तर किती धावपळ होते. नाट्य निर्माते, अभिनेते ही धावपळ कायमच करतात. किती ताण येत असेल त्यांना?
तिकीट विक्री होईल का नाही?
प्रेक्षक प्रतिसाद देतील की नाही?
सर्व नाट्यकर्मी वेळेत येतील की नाही?
आपलं नाटक चालेल की नाही?
वेळी अवेळी जेवण, रात्रीचे उशिरापर्यंत चालणारे प्रयोग, तालीमी करून आवाज बसणार नाही याची काळजी घेणे, तेलकट वा थंड न खाणे. नाट्य कलाकार आणि निर्माते यांचीं जिद्द, हुरहुन्नरी वृत्ती मला अचंबित करते.
नुकताचं मी The kiran mane show पाहिला. निर्माता त्याची कलाकृती सादर करतो. त्याचे कष्ट, धाडस याची जाणीव झाली. प्रत्यक्ष डोळ्यांसमोर कलाकाराला अभिनय करताना पाहणं, संगीत, लाईट याचा अनुभव घेणं..... अद्भुत आंनद देणारं होतं. सिनेमा पाहण्यात ही मजा नाही.
नाटक पाहायला जात राहिलं पाहिजे.
_सिद्धेश्वर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा