काबुलीवल्याची बंगाली बायको - सुश्मिता बॅनर्जी (अनुवाद -मृणालिनी गडकरी )
हि संघर्षकथा सत्य घटना असून 1988 ते 1995 या काळात घडली आहे.
लेखिका सुश्मिता बॅनर्जी एका अफगाण तरुणाच्या प्रेमात पडल्या, जाबाज त्याचं नाव. भारतात दोघांनी विवाह केला. वर्षभर सासरला म्हणजे अफगाणिस्तान ला राहण्यासाठी म्हणून त्या जातात (1989 )आणि पुढील 7-8 वर्षे तिथे अडकून पडतात.
घराला आर्थिक स्थैर्य मिळावं म्हणून अफगाण पुरुष कुटुंब सोडून पाच पाच वर्षे सलग दुरस्थ देशी राहायचे, जाबाज सुद्धा प्रिय पत्नी सुश्मिता ला सोडून जातो.
सासरच्या लोकांकडून तिचा छळ, उपासमार होते. काही हि करून पुन्हा भारतात परतायचं हे तिचं जीवनध्येय होतं. ती भारतात परत कशी येते या संघर्षाची हि कहाणी आहे.
अफगाण लोकांची जीवनशैली, राहणीमान, समजव्यवस्था, तालीबन ची सत्ता कशी प्रस्थापित झाली, त्यामुळं काय बदललं याबद्दल त्या माहिती देतात.
तीन अपयशी प्रयत्नानंतर 1995 साली पुन्हा अफगाण भूमीवर पाय न ठेवण्याचा निश्चय करून त्या भारतात परतण्यात यशस्वी होतात.
पुस्तक संपवून त्यांच्याविषयी अधिक जाणून घ्यावं म्हणून गुगल केलं असता समजलं की
4 सप्टेंबर 2013 रोजी तालीबान्यांनी त्यांना घरातून बाहेर फरफटत नेलं आणि 20 गोळ्या घालून त्यांची हत्या केली.(7 सप्टेंबर ला त्या भारतात परतणार होत्या.)
पूर्वीचा भयानक अनुभव गाठीशी असताना त्या कोणाच्या, कशाच्या ओढीने पुन्हा अफगाणिस्तान ला गेल्या या प्रश्नाने मी अस्वस्थ झालोय..... काय कारण असेल त्यांनी परत जाण्याचं?
त्यांनी दिराच्या मुलीला दत्तक घेतलं होतं. त्या चार वर्षाच्या मुलीला भारतात घेऊन येणं त्यांना शक्य झालं नाही. तिच्या ओढीने त्या पुन्हा अफगाणिस्तान ला गेल्या असतील का?
_सिद्धेश्वर
https://youtu.be/XPuqnj2ckgE?si=1v4z1PqmwQrri2_1
पुस्तकातील उतारे
👉🏻‘लग्न हे जीवनाचं एक अंग आहे. त्याचं जर सोंग केलं तर नाश ठरलेलाच.’
👉🏻माझी जाऊ मला ‘आगलनावे’ म्हणून हाक मारायची. माझ्या नवऱ्याला ती ‘आगल’ म्हणायची. आगल म्हणजे दादा. नावे म्हणजे नवी नवरी. आगलची नवी नवरी ती आगलनावे.
👉🏻इथं बाई म्हणजे शय्यासोबतीण‚ स्वयंपाकीण आणि मुलं पैदा करणारं मशीन. थ्री इन वन.
👉🏻कोणत्याही देशातला माणूस ‘आम्ही परिपूर्ण आहोत. आमच्याकडे हत्या‚ लूटमार‚ गुंडगिरी नाही किंवा नागरिकांच्या जिवाला धोका नाही’‚ असं म्हणू शकत नाही.
👉🏻अजू करणे म्हणजे शुद्ध होणे. एका मोठ्या मगमध्ये पाणी घेऊन तीन गुळण्या करतात. असं तीन वेळा करतात. मग हात-पाय धुतात. हाच ‘अजू’.
👉🏻इथं लोणी काढल्यावर खाली राहिलेल्या पाण्याला ‘क्रुबे’ म्हणतात. दह्याला म्हणतात ‘मस्तिया’. गव्हाची वाळलेली ताटं म्हणजे ‘प्रोरोरा’. ‘प्रोरोरा’ जनावरांचा ‘ओच् खोराक’. ओच् खोराक म्हणजे कडबा. ‘शाओताला’ आणि ‘रिस्का’ हा ‘लान्दा खोराक’ म्हणजे हिरवा चारा.
👉🏻धर्मांधता‚ जात नावाचा सनातनी दुष्टपणा ह्यांना मी अजिबात मानत नाही.
👉🏻नास्तिक नाही. वास्तववादी आहे. देवावर माझा विश्वास आहे. मी माणसांवर प्रेम करते. माणसाला माणसाबद्दल वाटणारं प्रेम म्हणजे धर्म असं मी मानते. जन्मल्यानंतर आपली जबाबदारी पार पाडणं म्हणजे धर्म.
👉🏻गुलबुद्दीन हिकमतयार ह्यांच्याकडे. ते ह्या देशात मुस्लिम शासन कायम करण्यासाठी ७९ पासून क्रुसेड करताहेत म्हणे! गुलबुद्दीनांनी यादवी युद्ध केलं नसतं तर ह्या देशात तालिबानचा प्रवेश झाला असता? सगळंच विलक्षण! अद्भुत! अभूतपूर्व! ह्या कट्टर मुसलमानांची धर्मपरायणता पाहून मी अवाकच झाले आणि लोकांच्या वागण्यातला विरोधाभासही हसू आणणाराच नाही का? त्या देशातल्या नागरिकांनी नजीबुल्लांच्या अटकेचा दिवस हा ‘उत्सवाचा दिवस’ म्हणून घोषित केला होता व स्वतंत्र देशाचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलं होतं. आज तेच लोक नजीबुल्लांच्या सुटकेसाठी अल्लासमोर डोकं टेकत होते. त्यांना आता नजीब आणि त्यांची कारकीर्द चांगली वाटत होती.
👉🏻इथं पाण्याला ‘उबू’ म्हणतात. सकाळला ‘गिस’‚ दुपारला ‘गरमा’‚ ‘मकाम’ म्हणजे रात्र’ आणि ‘मास्पीन’ म्हणजे संध्याकाळ.
👉🏻१९८८ मध्ये मी इथं आले तेव्हा ‘आपण वर्षासाठी जातोय’‚ असं जाँबाजनं मला सांगितलं होतं. आता सात वर्षं उलटली होती. पण त्याचं ‘एक वर्ष’ काही संपत नव्हतं.
👉🏻देव‚ अल्ला‚ ईश्वर‚ गॉड सगळे एकच नाहीत का? माणसानंच आपल्या स्वार्थासाठी त्याला वेगवेगळी नावं दिलीत. त्याचे भाग पाडलेत. चंद्र एकच आहे पण कोणी त्याला चंद्र म्हणतं‚ कोणी मून म्हणतं तर कोणी चाँद. इथल्या भाषेत चंद्राला ‘स्पांगी’ म्हणतात. तसंच देवाच्या नावांचं. माणूस मूळ गोष्ट विसरला आणि निरनिराळ्या नावाखाली त्यानं जात‚ धर्म ह्यांच्यात स्वत:लाच वाटून घेतलं. एकाच आईची लेकरं पण कोणी आर्य तर कोणी अनार्य. रक्त तर एकच ना? अशा नालायक मुलांना पृथ्वीचा प्रकाश दाखवला म्हणून तो ईश्वर लाजला असावा. त्यानं तोंड लपवलं असाव.
👉🏻इथं निरोपाला ‘खोदापामानी’ म्हणतात.
👉🏻खरी गोष्ट अशी आहे की जन्मापासून घरातून आणि आजूबाजूच्या वातावरणातून माणसाच्या मनावर जे बिंबवलं जातं ते पुसलं जाणं शक्य नसतं. प्रयत्न करूनही ते पुसलं जात नाही. जात व धर्म ह्यांच्या परिघातच माणसाला राहावं लागतं.
👉🏻बराच विचार केल्यावर मी अशा निर्णयाला येऊन पोचले की जेव्हा इथल्या स्त्रियांना वैवाहिक जीवनाची ओळख होते‚ प्रीत म्हणजे काय हे कळायला लागतं तेव्हाच नेमके त्यांना देशात एकटं ठेवून त्यांचे पती परदेशात निघून जातात. पतिसहवासात न्हाऊन निघायच्या काळातच त्यांना विरह सहन करावा लागतो. बरं‚ हे पुरुष जातात ते थोड्याथोडक्या दिवसांसाठी नाही तर पाच पाच वर्षंसुद्धा ते देशाकडे फिरकत नाहीत. काहीजणी आपल्या भावनांना आवर घालू शकतात‚ इच्छा दाबून ठेवू शकतात‚ पण बऱ्याचजणींना हे जमत नाही.
👉🏻तालिबानचं फाजील धर्मवेड‚ कडक शरीयत‚ मूलतत्त्ववाद्यांची ढोंगबाजी‚ कुराणाच्या नावावर सामान्यांवर होणारे अत्याचार हे सर्व पायदळी तुडवून मी निघाले.
👉🏻‘एरियाना अफगाण’च्या विमानांना सीट नंबर नसतात. जागा असेल तिथं बसायचं.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा