मुख्य सामग्रीवर वगळा

डॉ आनंदिबाई जोशी प्रवास एका ध्यासाचा - नंदिनी पटवर्धन

डॉ आनंदिबाई जोशी प्रवास एका ध्यासाचा - नंदिनी पटवर्धन (091124)



गणपतराव जोशी यांची कन्या यमुना... यांचे पूर्वज पेशवे काळापासून कल्याण ला मोठे जमीनदार होते. घरातच शाळा होती. देवाची माफी मागून त्यांनी मुलगी यमुनेला शाळेत बसणं अनिवार्य केलं.
(सर्व धर्मांनी स्त्रियांना पारतंत्र्यात ढकलले तरी तुरुंगातील कैद्यांनी बेड्यांवरच प्रेम करू लागावे तसे स्त्रिया धर्मावर प्रेम करतात.(©jk)
त्याकाळी स्त्री शिक्षण हे पाप समजलं जायचं.मुलींना शिक्षण दिल्यास घरावर आपत्ती येईल असा ग्रह होता.अशाकाळात महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरु केलेली.)

गोपाळराव जोशी हे पोस्टात कामाला होते. 25 व्या वर्षी ते विधुर झाले. ते राहायला गणपतरावं जोशी यांच्या वाड्यात आले.

यमुना (9 वर्षाची )दिसायला काहीशी डावी, सावळी असल्याने तिचा विवाह वीस वर्षांनी मोठया गोपाळराव यांच्याशी लावण्यात आला. लग्नानंतर यमुनेच नाव आनंदी करण्यात आलं.
वयाच्या तेराव्या वर्षी आनंदीबाई यांचं पहिलं बाळंतपण झालं. झालेला मुलगा दहा दिवसातच निर्वतला. त्या काळात असं काही झालं की पाप, पूर्व संचित याला दोष दिला जायचा, पण गोपाळराव आणि आनंदीबाई यांना पक्क माहीत होतं की वैद्यकीय सोयी सुविधा नसल्याने आपल्या मुलाचे निधन झालं आहे.
आणि मग काय दोघांच्या मनात एक ठिणगी प्रज्वलित झाली " आनंदीबाई ने डॉक्टर व्हावं "

त्या काळात 
मुलीनं शिकण...
डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणं...
कोणीही नातेवाईक पाठीशी नसताना, पुरेसे पैसे व माहिती नसताना, भविष्याची कोणतीही शाश्वती नसताना, समाज बांधवाकडून धर्म बहिषकृत होण्याची भीती असताना डॉक्टर होण्यासाठी साता समुद्रापार अमेरिकेत जाण हे मोठं धाडस होतं. आनंदिबाई ने ते केलं.

यामुळे आनंदिबाईला वाळीत टाकतील अशी भीती त्यांच्या आईला वाटायची.

7 एप्रिल 1883 रोजी अमेरिकेला जाणाऱ्या बोटीत आनंदीबाई बसल्या. 4 जून 1883 ला बोट न्यूयॉर्कच्या गोदीत आली.(58 दिवस )
अखेर आनंदीचे अमेरिकेत आगमन झाले. तिने मायभूमीपासून अमेरिकेपर्यंतचे अंतर, तसेच सामाजिक-धार्मिक अडथळे आणि आर्थिक आव्हानं या सर्वांचे उंबरठे ओलांडले. आपल्या आयुष्यातल्या एका नव्या अध्यायात प्रवेश करायला ती सज्ज झाली.
पुरेश्या पैशाची तरतूद न झाल्याने आनंदी बाई एकट्याच अमेरिकेस गेल्या होत्या. (गोपाळराव यांची जाण्याची इच्छा होती.)
तिथे थिओडेशिया कारपेंटर यांनी तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळलं.

प्रवेश घेणारी विद्यार्थिनी वयाने २० ते ३० दरम्यान हवी ही अट असूनही १८ वर्षांच्या आनंदीला अपवाद म्हणून शिष्यवृत्ती मंजूर झाली. ​पेनसिल्व्हेनियाच्या ‘विमेन्स मेडिकल कॉलेज’ने ६०० डॉलर्सची शिष्यवृत्ती तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी आनंदीला मंजूर केली. ​तिच्या शिक्षणासाठी आर्थिक तरतूद करण्याचा जो सर्वात मोठा प्रश्न होता, तो अशा पद्धतीने सुटला. आणि सरतेशेवटी ज्यासाठी आनंदी जवळजवळ जन्मभर धडपडत होती, ते आपलं विहित शिक्षण घेण्यास सज्ज झाली.

तिथल्या थंड हवामानानुसार आहार व पेहराव करणं अपेक्षित होतं. आनंदीबाईच्या शाकाहाराचा आग्रहामुळे त्यांची खाण्याची आबाळ होऊ लागली. पेहरावत केलेल्या बदलामुळे गोपाळरावांनी पत्राद्वारे आनंदिबाई वर बरेच तोंडसूख घेतले, पुढे हा शिरस्ताच झाला.
आनंदीबाई च्या भावाने त्यांना पत्र लिहून कळवले की “मिसेस सौ. आनंदीबाई जोशी, हिंदुस्थान ही तुझी मातृभूमी आहे. तू केलंस ते योग्य केलं नाहीस.”
(“स्त्रियांवर येणार्‍या मर्यादा मुख्यत: समाजाकडून येतात. तिच्या स्त्रीत्वाच्या गौणत्वामुळे किंवा न्यूनतेमुळे नाहीत.”)

या सर्वामुळे आनंदी खचून जाऊ लागली. 

तरीही तिने 1886 साली एम डी हि पदवी घेतली.
शाकाहारी राहण्याच्या हट्टमुळे आनंदिबाई यांना सतत उपास घडे. पौष्टिक आहारा अभावी त्यांचे शरीर कृष झाले.हाडाचा सांगाडा आणि त्वचा इतकंच त्यांच्या शरीरात राहिलं होतं. भारताच्या उष्ण हवामानत तब्बेत सुधारेल या आशेने 9 ऑक्टोबर 1886 रोजी आनंदिबाई व गोपाळराव यांनी भरतात येण्यासाठी अमेरिका सोडली. 16 नोव्हेंबर 1886 रोजी ते मुंबईला पोहोचले. आजारपणामुळे आनंदीबाई ना प्रवासात बराच त्रास झाला.

राजश्री शाहू महाराजांच्या कोल्हापूर संस्थानातील हॉस्पिटलमध्ये इंटरशिप पूर्ण करणे व पुढे तिथेच काम करणे असं त्यांचं नियोजन होतं. पण......

त्यांना पैशाची चन चन होती. गोपाळरावांच्या विक्षिप्त वागण्याचा मानसिक त्रास हि होतं होता. त्यांनी मिळवलेले यशच दुर्दैवाने दोघांच्या आड आले होते.
आनंदीच्या सर्व लक्षणांकडे पाहता त्यांना क्षय झाल्याच निदान झालं होतं.
26 फेब्रुवारी 1887 रोजी आनंदीबाई यांचं निधन झालं." मला शक्य होतं तेवढं मी केलं " हे त्यांचे शेवटचे शब्द होते.
( आनंदीबाई गेल्या तेव्हा त्यांचा 22 वा वाढदिवस केवळ एक महिन्यावर आलेला होता.)

हिंदुस्थानी स्त्रिया घर, कुटुंब यांच्या संकुचित कक्षेच्या बाहेर जाऊन शिकू शकतात, यशस्वी होऊ शकतात, विचार करू शकतात आणि समाजाला उपयोगी कार्य करू शकतात हेच आनंदीबाईंच्या यशाने सिद्ध झाले.

पोशाख,आहार यासंबंधी असलेली बंधनं आनंदीबाईंनी फेटाळली असती तर कदाचित त्यांच्या प्राकृतिवर झालेला विपरीत परिणाम टाळता आला असता. कदाचित त्यांचा ध्येयमार्ग अधिक सुकर झाला असता.

_सिद्धेश्वर 


💡पुस्तकातील उतारे 
सनातन धर्माच्या तत्कालीन ठेकेदारांनी आनंदिबाईंना काही प्रश्न विचारले 

१. तू अमेरिकेस का जाणार आहे?

👉🏻“हिंदुस्थानात शिक्षणाचे मार्ग नाहीत असं मी म्हणत नाही, परंतु त्यात फार मोठ्या अडचणी आहेत. मद्रासला एक कॉलेज आहे. प्रत्येक प्रेसिडेन्सीमध्ये ‘सुतिकाशास्त्राचे’ अभ्यासक्रम आहेत. पण तिथे जे शिक्षण दिलं जातं ते सदोष आणि अपुरं आहे. जे शिक्षक तिथे शिकवतात ते रुढीप्रिय आहेत. आणि काही प्रमाणात मत्सरी, हेवा करणारे असे आहेत. मला त्यांच्यातील दोष दाखवायचे नाहीत. पण पुरुषांचे हे वैशिष्ट्यच आहे. जोपर्यंत या पुरुषांच्या जागी सुशिक्षित स्त्रियांचा वर्ग येत नाही तोपर्यंत ही सर्व गैरसोय आम्हा स्त्रियांना सहन करावी लागेल.” ​

त्याहून मोठा प्रश्न होता तो म्हणजे तिचा मुंबई आणि कलकत्त्याला जो छळ झाला होता त्याचा. तशा छळातून तिची हिंदुस्थानातील कुठल्याही भागात सुटका नव्हती. तिने या प्रश्नाच्या उत्तराचा समारोप या पद्धतीने केला... “मी या अप्रिय गोष्टी तुमच्या पुुढे अशासाठी ठेवत आहे की त्यामुळे संबंधित व्यक्ती यात सुधारणा करतील आणि ज्यांनी या गोष्टींची कधी कल्पनाही केली नसेल त्यांना समजेल की मी केवळ क्षणिक लहर किंवा विक्षिप्तपणा म्हणून अमेरिकेस जात नाहीये.”

२. हिंदुस्थानातच शिक्षण घेण्याचे मार्ग उपलब्ध नाहीत का?
👉🏻परदेशात जाण्याने आपल्या आकलनाच्या कक्षा रुंदावतात. आपलं ज्ञान परिपूर्ण करता येतं किंवा गमावलेल्या विद्या पुन्हा मिळवता येतात. प्रत्येकाने त्याला जे योग्य वाटतं तेच केलं पाहिजे. प्रत्येकजण दुसर्‍याचं देणं लागतो. त्याची परतफेड कशी करता येईल या दृष्टीने त्याचे प्रयत्न राहिले पाहिजेत.

३. मी एकटीच (अमेरिकेला) का जातेय?
👉🏻ती एकटीच अमेरिकेस का जात आहे याचे उत्तर अत्यंत सोपे आणि छोटेसे होते. ती दोघं जाण्याइतके पैसे त्यांच्याजवळ नव्हते.

 ​४. परत आल्यानंतर मला जातीबाह्य ठरवण्यात येईल का?
👉🏻“मी हिंदू म्हणून इथून जाईन आणि हिंदू म्हणूनच परत येईन. माझ्या गरजा मी वाढवणार नाही, तर माझ्या वाडवडिलांसारख्याच सरळ आणि साध्या ठेवीन, जशा आज आहेत. माझे देशबांधव मला ज्ञातीबाह्य ठरवणार असतील तर ते आत्ताच का बरे करत नाहीत? त्यांना तसं करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे.”

 ​५. जर दुर्दैवाने काही बरंवाईट झालं, काही घोर प्रसंग आला, अपयश आलं तर मी काय करीन?
👉🏻अपयशाच्या भीतीने कर्तव्य न करणं हे कधीही योग्य नाही. आपण प्रयत्न हा केलाच पाहिजे. मग जय मिळो वा पराजय. 
माणसांचे तीन वर्ग आहेत. जे अपयशाच्या भीतीने प्रयत्नच करत नाहीत ते सर्वात हीन आहेत. त्यानंतर येतात ते प्रयत्न सुरू करतात पण त्यात आलेल्या अडथळ्यांनी नाउमेद होतात असे लोक. परंतु जे सुरू करतात आणि चिकाटीने अपयशाला, अडथळ्यांना तोंड देतात तेच अंतिमत: विजयी ठरतात. अडथळे जितके जास्त तितकी हिंमत जास्त. एकदा एखादी गोष्ट सुरू केली की त्यापासून मागे फिरायचे नाही.”

💡 आनंदिबाईंना ख्रिश्चन समुदायाचा पाठिंबा का मिळाला?

👉🏻“ब्राह्मण जात आपल्यातील लोकांना समुद्रलंघन करण्यास, ब्राह्मणेतर माणसाने शिजवलेले अन्न खाण्यास अथवा अब्राह्मण व्यक्तीने स्पर्श केलेले पाणी पिण्यास मज्जाव करते, आणि जर या नियमांचे उल्लंघन केले तर त्याच्यावर बहिष्कार टाकला जातो अथवा जबर शिक्षा केली जाते. असं असताना मिसेस जोशींनी विलक्षण धैर्याने ठामपणे जे पाऊल उचलले आहे त्यामुळे जगभरातील ख्रिश्चन समुदायने त्यांना मदत केली.


👉🏻स्त्रियांचं पुरुषांवर अवलंबून असणं हेच स्त्रियांच्या सर्व समस्यांचे मूळ आहे.

👉🏻“जिला ज्ञान हवे असते ती व्यक्ती कोणत्याही प्रकारे पूर्वग्रहदूषित किंवा पक्षपाती नसावी. तिने सगळीकडून ज्ञानप्राप्ती करावी. कदाचित हे ज्ञान तिला ज्ञानाच्या एकाच शाखेत किंवा एकाच विचारसरणीत मिळणार नाही.

👉🏻आनंदी धैर्यवान झाली होती. ‘जग हे अनेक हालअपेष्टांनी आणि दुःखाने भरलेले आहे’ हे समजण्याइतकी परिपक्वता तिच्यात आता आली होती.

👉🏻‘जे आपल्याला मारू शकत नाही, ते आपल्याला सामर्थ्य देतं.’

👉🏻आनंदीची अमेरिकेस जाण्याची योजना दांडेकरांपर्यंत पोहोचली. त्यांना हे अजिबात रुचले नाही. समुद्रगमन, स्त्रीने शिक्षण घेणे आणि पती सोबत नसताना प्रवास करणे किंवा परदेशात राहणे यासारख्या अनेक ज्ञातिबाह्य गोष्टी त्यांच्या दृष्टीने विरोध करण्यायोग्य होत्या.

👉🏻“उद्याचा दिवस एका नव्या वर्षाची सुरुवात आहे. जे संघर्ष करीत आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष प्रयत्नांची पराकाष्ठा अन् लवकर प्रगती प्राप्त करून देणारे ठरो आणि आपणही त्यातलेच एक असू अशी प्रार्थना!”

👉🏻“माझा आता विश्वास बसलाय की स्त्रीने आणि पुरुषाने स्वयंपूर्ण असावे. कोणीच कोणावर आपल्या निर्वाहासाठी किंवा इतर गरजांसाठी अवलंबून नसावे. तर आणि नक्की तरच कौटुंबिक वादविवाद थांबतील आणि सामाजिक अवहेलना थांबेल.”

👉🏻हिंदुस्थानातून येणारी सारीच पत्रं आनंददायी नसत. आनंदी अमेरिकेहून परत आल्यावर तिला ब्राह्मण समाज स्वीकारणार नाही, ही काळजी तिच्या आईला वाटत आहे असा उल्लेख गोपाळरावांच्या एका पत्रात होता.

👉🏻“मला मी किती तास अभ्यास करते असं नाही सांगता येणार, पण झोप, व्याख्यानं, स्वयंपाक करणं, जेवणं आणि पत्रलेखन करणं या व्यतिरिक्त प्रत्येक क्षण मी अभ्यासच करत असते.”

👉🏻‘प्रीती हेच सर्वांचे बंधन आहे. हेच सर्व धर्मांचे गूढ आहे. हेच जगातले बंधुत्व.’ असा तिने निष्कर्ष काढला.

👉🏻‘प्रत्येक क्षणी एक मूर्ख जन्म घेत असतो’

👉🏻मी दररोज १५ ते १६ तास काम करते. माझ्या अभ्यासाने कधी नव्हे इतका आनंद मला होतो.”

👉🏻गोधडीचे आनंदीच्या आयुष्याशी खूप साधर्म्य होते. तिच्या अनेक मैत्रिणींनी आपापले कापडाचे तुकडे तिला पाठवले, ज्यात त्यांनी स्वतःच्या कल्पकतेने कलाकुसर केलेली होती. रिड्स क्रीकमधल्या वास्तव्यात तिने ते सर्व तुकडे जोडून स्वतःची 'चित्रविचित्र गोधडी' तयार केली. तिची ती गोधडी तिला अनेक अमेरिकनांकडून मिळालेल्या प्रेमाचे प्रतीक बनली. त्यात प्रमाणबद्धता, संगती नसूनही ती मानवतेने परिपूर्ण होती.

आज ती गोधडी पुण्याच्या राजा केळकर संग्रहालयात पहावयास मिळते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...