लढे अंधश्रध्येचे - डॉ नरेंद्र दाभोळकर
1)चमत्कारातून संतती
भावनागर ची पार्वती माँ, ज्या स्त्रियांना मुलं होत नाही त्यांच्या पोटावरून हात फिरवते. किरकोळ औषधे, पथ्य देते. मग मुल होतं,असा यांचा दावा.
यामुळे कित्येक स्त्रियांच आर्थिक, शारीरिक, मानसिक शोषण झालं.आवश्यक शास्त्रीय उपचारापासून त्या दूर राहिल्या. अनिस ने या बाबत प्रबोधन करण्यासाठी प्रयत्न केले, पण पोलीस तक्रार दाखल करू शकले नाहीत.कारण फसवणूक झाली असं मान्य करणार कोणीच पुढं आलं नाही.
2) चष्मा घालवण्याचा दावा
पन्हाळा तालुक्यातील कुशिरा गाव, गुरव बंधूंनी दावा केला स्वप्नात आपल्याला साक्षात्कार झालाय. डोळ्याची कोणतीही समस्या दूर करण्याचे जडीबुटी मिळाली आहे.
झालं,मोफत, परिणामकारक उपचार मिळणार म्हणून हजारो लोकांचा लोंढा त्यांच्याकडे येऊ लागला. फक्त नारळ द्यायचा, स्वइच्छेने काही देणगी द्यायची.
त्यांच्यासारखा धंदा इतरही जिल्ह्यातून गावातून मांडला जाऊ लागला.
रोग बरं करणाऱ्या औषधाला जिल्हा औषध व अन्न प्रशासनाची मान्यता आहे का? त्या औषधचं पृथकरण केल्याचा अहवाल आहे का?हे कोणी तपासलं नाही.काहीतरी थातूरमातूर औषध देऊन रोग बरा करण्याचा दावा करणे हा The drug and magic remedies act 1954 अंतर्गत गुन्हा आहे.
जिल्हा पोलीस प्रशासनाची मदत घेऊन हा प्रकार थांबला, तोपर्यंत वेळ, श्रम, पैसा खर्च झालेला. गरजू रुग्ण शास्त्रीय उपचारापासून दुरावले गेले.
3)व्यसनमुक्ती करणारे शेषराव महाराज
तासभर प्रवचन देणार, व्यसनाचे तोटे सांगून मी स्वतः कसा बाहेर आलो हे सांगणार , व्यसनमुक्तीची शपथ घ्या आणि यापुढे दारू घेतली तर तुम्हाला नाग दिसेल, दर पंधरा दिवसांनी भेट द्या. हा फॉर्म्युला शेषराव महाराज द्यायचे.
हतबल झालेले कुटुंबीय हेही करून पाहू, करून पाहिल्यावर काही तोटा तर नाही ना या भावनेने उपचारासाठी यायचे.
दारू पिणारा माणूस मनाने कमकुवत झालेला असतो, दारू सोडायचे पण जमत नाहीये म्हणजे स्वतःवरचा नियंत्रण गमावले असा माणूसच व्यसनमुक्ती साठी प्रयत्न करून महाराजाकडे येतो.
महाराज तासभर प्रवचन करून दारू पिल्यास नाग दिसेल अशी भीती त्याच्या अबोध मनात घालतो. आणि या माणसाला खरोखर नाग दिसू लागतो, झालं बाबाचा चमत्कार सिद्ध होतो.
कोणताही भ्रम हा अहितकरक असतो.
अशा बोगस उपयांमुळे व्यसनमुक्ती कडे पाहण्याचा शास्त्रीय दृष्टिकोन विकसित होणार नाही.व्यसनमुक्ती हास्यास्पद ठरते.
4) जागृत डुंगेश्वराचा प्रकोप
सिंधुदुर्ग मधील हे जागृत देवस्थान असून नवसाला पावतो. येथील झाडांची फांदी तोडून नेल्यास, याठिकाणी रात्री गेल्यास, तेथील घंटा चोरल्यास देवाचा प्रकोप होऊन तीन महिन्यात तुमच्यावर आपत्ती येते अशी कांडी होती. अनिसला आव्हान मिळाल्यावर त्यांनी ते स्वीकारल.
देवभोम, अंदुरले येथील देवाला आवाज सहन होत नाही, अनिस ने तिथे ढोल वाजवून दाखवला.
(प्रत्यक्षात देवस्थानच्या शेजारी एका पुजाऱ्याची शेती होती, रोड झाल्यास शेतजमिनीचा काही भाग त्यात जाईल, असं होऊ नये म्हणून ही कांडी त्यांनी सोडली होती.)
आव्हान स्वीकारताना समितीने ज्या अटी शर्ती मांडल्या,कागदावर लिहून घेतल्या ते खूप महत्वाचं आहे. भावनेच्या आवेगात येऊन आव्हान न स्वीकारता प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकले पाहिजे हे समजलं.
5) शनी शिंगणापूर चा कोपीष्ट शनिदेव
नगर जिल्ह्यातील हे देवस्थान गुलशन कुमार च्या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आले, शिर्डी ला आले की भाविक इकडेही येऊ लागले. देवाला भीती, चमत्काराचे वलयं दिल्याने भाविक व धंदा वाढतो. हे मॉडेल कायम राहावे यासाठी चिकित्सेला विरोध केला जातो.
अमुक तमुक केलं की देवाचा कोप होतो, स्त्री पुरुष विषमता (चौथऱ्यावर स्त्रियांना जाऊ न देणे ) या दोन बाबींमुळे अनिस ने शनी शिंगणापूर चा विषय हाती घेतलेला.त्या लढ्याचा वृत्तांत या अनुभवात आहे.
👉🏽अभिषेक करताना एकावेळी अर्धा किलो गोडेतेल शनीच्या माथ्यावर ओतले जाते. रोज दोन हजार अभिषेक होतात असे गृहीत धरले तर एक हजार किलो गोडेतेल येथे ओतले जाते. ओतले गेलेले तेल खाण्यायोग्य नसल्याने वाया जाते. आजच्या दराने एक हजार किलो गोडेतेलाचे 60 हजार रुपये म्हणजे महिन्याला 18 लाख रु. तेलात जातात. देशातील 40 टक्के जनता दारिद्रय़ रेषेखाली जिणे जगते आणि कुपोषणाने लक्षावधी बालके दरवर्षी मरण पावतात, याची कोणतीही खंत अगर दाद शनिदेव अगर त्यांच्या भक्ताकडे नसते.
👉🏽ज्या नगर जिल्ह्यात संत ज्ञानेश्वरांनी ‘समता वर्तावी ।’ असा आदेश देणारी ज्ञानेश्वरी प्रगट केली व विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ।। असा भागवत धर्म स्थापन केला, त्याच नगर जिल्ह्यात स्त्रियांना देवाच्या दरबारात दुय्यम स्थान देऊन अवमानीत केले जावे ही शोकांतिका आहे धर्माची-मानवतेची!
👉🏽देवाच्या भीतीने चोरी होत नाही ही चांगली गोष्ट घडते. त्याला अंधश्रद्धा म्हणून विरोध का? एखादा चोर भूताच्या भीतीने रात्रीची चोरी करत नसेल तर भूत नसते हे त्याला कशाला सांगायचे?
👉🏽शनिशिंगणापूर हे देवस्थान गेल्या वर्षात अफाट वाढले आहे. व्यापारी व सर्व अनुषंगिक लोकांचे हितसंबंध त्यामध्ये तयार झाले आहेत. दैवी चमत्काराची खुले आम चिकित्सा करणे म्हणजे त्या चमत्काराला संपुष्टात आणणे. देवस्थानचे अद्भुत वलय लयाला जाणे असे खरेच घडले तर सगळी आर्थिक आवक थांबणार.
👉🏽अंधश्रद्धा निर्मूलन की धर्मश्रद्धा निर्मूलन शनिशिंगणापूर प्रकरणी मुख्य आरोप होता की देवाच्या भीतीने काही चांगले घडत असेल तर अंधश्रद्धा म्हणून त्याला विरोध कशाला करता?
👉🏽शनी शिंगणापूर आंदोलनावर एक बाजू
1)खरे तर जीवन ‘आहे, हे असे आहे’, या पद्धतीने स्वीकारले, तर कुठलीच अडचण येत नाही. मग गूढ क्षेत्रही त्यात समावू शकते. पण माणसाचे त्याने भागत नाही. तो सर्व जीवनाची (जे मुळातच विसंगतिपूर्ण आहे.) संगतवार मांडणी करू इच्छितो. त्यातूनच देव, धर्म, अध्यात्म यांचा जन्म होतो. त्याचा लौकिक जीवनातील समाजधारणेसाठीही उपयोग होतो. येथून गुंतागुंतीला सुरुवात होते!
2)सदा सत्य वदावे, अहिंसा पाळावी, सहिष्णुता असावी, हे सर्वांच्या सुखासाठी आवश्यक असल्याने सहजभावाने, विवेकनिष्ठेने सत्यवचनी असणे, हिंसा टाळणे शक्य आहे. परंतु खोटे बोलणे हे पाप आहे, हिंसा करणे हे देवाच्या मर्जीविरुद्ध आहे, चोरी करणे अधर्म आहे, असे मानूनही अनेकजण त्यापासून परावृत्त होत असतील. या दोन्ही मार्गांनी शेवटी इष्ट तत्त्व साध्य होत असते. यात तरतमभावाने तुलना करण्यासारखे काही नाही. केवळ विवेकनिष्ठ निर्णयप्रक्रियाच इष्ट आहे, असे कसे ठरविता येईल?
3)गूढाची तर्कदुष्ट संगती लावून अधम कृत्यास प्रवृत्त करणाऱ्यांचे निर्दालन करणे, एवढीच ‘अंनिस’ची भूमिका असणे योग्य आहे. सर्व गूढांची उकल आम्ही करतो. सृष्टीतील सारी रहस्ये उलगडून दाखवितो, असा दावा अयोग्य आहे.
4)पुरोगामी धर्मकल्पना काय असेल, याचा शोध धार्मिक प्रेरणा नसलेल्यांनी का घ्यावा, हाच खरा प्रश्न आहे. धर्म ही अपरिवर्तनीय बाब आहे, असे मूठभर सनातनवाद्यांना व पुरोगाम्यांनाच केवळ वाटते. वस्तुत: इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर धर्मकल्पनेत बदल झालेला दिसतो. परंतु हा बदल धार्मिक प्रेरणा असलेल्या व्यक्तींनी केलेल्या बंडातून झालेला आहे.
5)ख्रिश्चन धर्मात बाजारीकरण माजले, तेव्हा मार्टीन ल्यूथरने प्रोटेस्टंट पंथाचे निशाण फडकवले. हेच हिंदू धर्मात जैन, बौद्ध, लिंगायत, महानुभाव, सार्वजनिक सत्यधर्म, ब्राह्मोसमाज आदी विविध धर्मपंथांच्या उदय-विकास वाटचालीतून दाखविता येईल.
6)धर्मचिकित्सा वा धर्मसुधारणा ही घटना दुरुस्तीप्रमाणे विधेयक मांडून होत नाही. ती संचयित परिणामाने होणारी घटना आहे. त्या घटना जीवनाच्या अनेक क्षेत्रांत होत असतात. माणसाचे कुठलेच क्षेत्र स्वायत्त वा स्वतंत्र नाही. सारे परस्परावलंबी आहे. आपण मात्र जीवनाची कप्पेबंद रचना गृहीत धरून एकेका टप्प्यावर अभ्यासपूर्वक दुरुस्त्या करून परिपूर्ण जीवनाची रचना करू इच्छितो! वास्तवात असे होत नाही.
7)राखीव जागांविरुद्ध होणारी आंदोलने ही बेकारीच्या रेटय़ातून निर्माण झालेली असतात, ती जातीय वर्चस्वाच्या स्थापनेची आंदोलने नसतात. (याचा अर्थ ती योग्य असतात, असे मात्र नाही!)
8)अंधश्रद्धा व धर्म यांची क्षेत्रेच वेगवेगळी आहेत. काही ठिकाणी ती एकच वाटली, तरी वस्तुत: ती तशी नाहीत, हे स्पष्ट करता येऊ शकेल. पण त्याऐवजी आपण ती एक असणेच अपरिहार्य आहे, असे ठरवून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी धर्मश्रद्धा निर्मूलनाचीच चळवळ हाती घेतो!
9)‘मर्यादित भूमिकेत अमर्याद काम’, ही कुठल्याही संघटनेची धारणा असायला हवी. त्याऐवजी पुरोगामी संघटना नेहमीच उलट वर्तणूक करीत आल्या आहेत. हे कधी तरी थांबायला हवे.”
👉🏽अनिस ची बाजू
1)धर्म जेव्हा कर्मकांडे रूढी-रिवाज पातळीवर उतरतो, तेव्हा त्याचे विकृतीकरण होऊ लागते आणि तो वादविवादाला कारण ठरतो.
2)धार्मिक दहशतवाद समजून घेऊ इच्छिणाऱ्याने ‘शनिमाहात्म्य’ वाचून काढावे आणि समाजाची उभारणी या तत्त्वावर करायची का, हे ठरवावे.
3)स्त्रीच्या दर्शनाने स्वामी महाराजांना विटाळ होत असेल आणि धर्मश्रद्धा अशा अधर्मी धर्मपंडितांना धडा शिकवण्याच्या आड येत असेल, तर अंधश्रद्धा निर्मूलनाबरोबर धर्मश्रद्धा निर्मूलन चळवळ उभारणे अटळ आहे. चळवळीने लगेच काही परिवर्तन होईल असे नाही. पण चळवळींच्या संचयित परिणामाने धर्मसुधारणा घडू शकेल.
4)खरे तर कोणत्याही देवास भक्तिभावाने वाहिलेले पाणीदेखील पुरते. परंतु शनिदेवास तेलाबरोबरच काळी बाहुली, शनियंत्र, नारळ, हार वाहिल्यास पीडा दूर होते या कल्पनेने फसवणूक केली जाते.
5)नीती भीतीमधून येणे अंतिमत: श्रेयस्कर नाही.
6)मानवाची सर्व प्रगती भीतीवर आधारित सदाचाराने नव्हे तर ज्ञानाचा विचार, वापर, प्रवाह व त्यातून निर्माण झालेली सारासार विवेकबुद्धी यांतून झाली आहे हे विसरून चालणार नाही. विज्ञान, निर्भयता, नीती हे अंनिसचे ब्रीद आहे. भीतीवर आधारलेल्या नीतीस अंनिसचा विरोध आहे. विवेकाचा वापर निर्भयतेने करून जे सत्य समोर येईल त्यावर आधारित नीती अंनिसला अधिक श्रेयस्कर आहे.
7)दैवी चमत्कार व स्त्री-पुरुष विषमता हा धर्मश्रद्धेचा भाग नाहीत हे तर भारतीय संविधानाने व संतांनी आणि समाजसुधारकांनी अधोरेखितच केले आहे.
👉🏽स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘ज्या शुद्ध हिंदू धर्माचा मी पुरस्कार करतो तो चमत्कारावर आधारित नाही. चमत्कार व गूढ गोष्टींच्या मागे लागू नका. चमत्कार हे सत्यप्राप्तीच्या मार्गातील सर्वांत मोठे अडथळे आहेत. चमत्काराचे वेड आपल्याला खुळे व दुबळे बनवीत असते
संपादकांनी जे म्हणणं मांडले त्या क्रमांकानुसार त्याचा मला सुचलेला प्रतिवाद
1) जीवन आहे तसं स्वीकारलं तर अडचण येत नाही हे खरं आहे, पण मग माणसांची, समाजाची प्रगती कशी होणार?
कोपर्निकस गॅलिलिओ न्यूटन यांनी जीवन आहे तसेच स्वीकारलं असतं तर विज्ञानाचं काय झालं असतं? त्याहून महत्त्वाचं सत्य काय ते माहित असताना शांत बसून राहिल्यास त्यांची कुचंबणा झाली असती किंवा ते वेडे झाले असते. म्हणून जीवन विसंगती पूर्ण असलं तरी मानवाने तर्काच्या आधारे संगती लावण्याचा प्रयत्न कायमच केला पाहिजे. आणि प्रश्न उरणारच आहेत म्हणून प्रश्नांची सोडवणूक न करता जेसे थे वादी भूमिका घेणे चूक आहे.
2) देव शिक्षा करतो म्हणून चांगलं वागणं यात भीती आली. भीतीमुळे नीतीवान झालेला माणूस कमकुवत असतो कारण त्याला बाहेरून कोणाचातरी दट्ट्या लागतो. देव शिक्षा करतो ही भावना दृढ झाल्यास, प्रार्थना,अभिषेक केल्यास देव इच्छित फळ देईल ही भावनाही दृढ होते.
म्हणून देवाच्या भीतीचा नितिवान होण्यासाठी उपयोग होत असेल तरी ती भीती नाकारली पाहिजे.
3) सृष्टीतील सर्व रहस्यांची उकल आम्ही करतो हा दावा अनिसने केलेला नाही.
अनिस ने न केलेला दावा कल्पून त्यांना पूर्वग्रह दूषित मनाने झोडपण्याचे काम संपादक ने केले आहे.
4) पुरोगामी धर्म कल्पना काय असेल याचा शोध धार्मिक प्रेरणा नसलेल्यांनी का घ्यावा?(संपादक )
उत्तर - समजा मला धार्मिक प्रेरणा नाहीये, पण धर्माच्या नावाखाली जी दुकानदारी चालू आहे त्यावर मी बोलायचं की नाही बोलायचं? निश्चित बोललं पाहिजे, शोषण होणाऱ्यांच अज्ञान दूर केलं पाहिजे.
हिंदू धर्माची चाल रित म्हणून सती प्रथा होती, ती लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी बंद केली.संपादक महाशय यांच्याप्रमाणे धोरण ठेवलं असतं तर आणखी काही वर्षे विधवा चितेवर जळत राहिल्या असत्या.
7) अंधश्रद्धा व धर्म यांचे क्षेत्र वेगळे आहेत.(संपादक )
👉🏽 संपादक महाशय म्हणतात ते एकवेळ मान्य करू या. मग
धर्माच्या नावावर स्त्री आणि पुरुष यांमध्ये भेद होत असेल तर काय करायचं?
धर्माच्या नावावर जातीभेद होत असेल तर काय करायचं?
धर्माच्या नवावर आर्थिक शारीरिक मानसिक शोषण होत असेल तर काय करायचं?
म्हणून विधायक श्रद्धा सोडून इतर श्रद्धा असतील मग त्या धर्मामध्ये येत असतील तरीही जाणीव होणाऱ्यांनी त्यात हस्तक्षेप करावा असं मला वाटतं.
धर्मश्रद्धा आणि मानवी नीती मूल्य यात संघर्ष झाला तर धर्मश्रद्धा चा त्याग केला पाहिजे.
उदा. शबरीमाला मंदिर, केरळ महिलांना प्रवेश नाही. आता आतापर्यँत शनी मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश नव्हता.
आजही मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश नाही.
देवाला लिंगभेद कसा मान्य होईल, आणि होत असेल तर मग उद्या जातीभेद, धर्मभेद ही मान्य होईल का?
त्यामुळे मानवी मूल्य नकरण्याऱ्या श्रद्धा धर्माच्या अंतर्गत येत असल्या तरीही त्याचा प्रतिवाद केला पाहिजे त्या नष्ट व्हाव्यात यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
( विधायक श्रद्धा - शारीरिक, मानसिक, आर्थिक शोषण करत नाही.)
9) मर्यादित भूमिकेत अमर्याद काम ही कुठल्याही संघटनेची धारणा असायला हवी.(संपादक)
👉🏽 कायद्याच्या चौकटीत राहून एखादी संघटना काम करत असेल तर त्यांना मर्यादेत राहून काम करा हे सांगणं हेच लोकशाही तत्त्वांच्या मर्यादे बाहेरच आहे. संघटनेची मर्यादा ठरवण्याचा अधिकार संपादक महाशाय यांना कोणी दिला? कायद्याचं राज्य आहे असल्यास कायदा त्याच काम करेल.
8) धर्मश्रद्धा आणि मानवी नीती मूल्य यात संघर्ष झाला तर धर्मश्रद्धा चा त्याग केला पाहिजे.
उदा. शबरीमाला मंदिर, केरळ महिलांना प्रवेश नाही. आता आतापर्यँत शनी मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश नव्हता.
आजही मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश नाही.
देवाला लिंगभेद कसा मान्य होईल, आणि होत असेल तर मग उद्या जातीभेद, धर्मभेद ही मान्य होईल का?
त्यामुळे मानवी मूल्य नकरण्याऱ्या श्रद्धा धर्माच्या अंतर्गत येत असल्या तरीही त्याचा प्रतिवाद केला पाहिजे त्या नष्ट व्हाव्यात यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा