इच्छामरण - सौ संगीता भारत लोटे (140425)
ईश्वरी भिसे यांच्या मृत्यूने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल चुकीच्या कारणामुळे प्रकाश झोतात आलं. चुकीचे निदान आणि उपचार यामुळे शासकीय सेवेत असणाऱ्या डॉक्टर भारत लोटे यांच्याही मृत्यू ला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जबाबदार आहे असा दावा त्यांच्या पत्नी संगीता लोटे यांनी केला. याविषयी त्यांनी " इच्छामरण एक सत्यकथा " हे पुस्तक लिहिलं.
हे पुस्तक 286 पानांचं आहे. त्यातील पहिली 209 पान त्यांच्या बालपणीच्या आठवणी, विवाह, प्रेम, कौटुंबिक जीवन व अडचणी याचं वर्णन आहे.(नाही वाचली तरी चालतील.) संगीता लोटे या नॅशनल लेवलच्या खो खो खेळाडू होत्या, कमी वयात झालेलं लग्न आणि प्रापंचिक जबाबदाऱ्या यात एक खेळाडू संपून गेला.
बालपणीच्या रम्य आठवणी, अडचणी, संघर्षातून केलेली प्रगती हे शंभरातील 99 जणांना सांगावसं वाटतं.(पण लिहिण्याची हातोटी ठराविक जणांकडे असते त्यामुळे वाचक बचावतात.)
डॉ भारत लोटे यांचं अचानक पोटं दुखू लागलं, तीन दिवसानंतर ही त्रास कमी न झाल्याने सोनोग्राफी केली, तिथल्या डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार सिटीस्कॅन केला. सिटीस्कॅन मध्ये स्वादुपिंडावर काळा डाग दिसला.
दीनानाथ मंगेशकर मधील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्जरी करणे आवश्यक होते.अन्यथा कॅन्सर होऊ शकतो. त्यांनी सर्व व्यवस्थित होईल याची 200% खात्री दिली. सर्जरी करून त्यांनी अर्ध स्वादुपिंड कापून काढलं. या ऑपरेशनला 12 तास लागले कारण स्वादुपिंड बिळबिळीत झालं होतं,टाके घालता येत नव्हते असं डॉक्टरांचं म्हणणं पडलं.
आतली जखम हीलिंग होतं नाही म्हणून तीन दिवसांनी पुन्हा सर्जरी करण्यात आली. ऑपरेशन रि ओपन करून पूर्ण स्वादुपिंड काढण्यात आलं.
( सुरुवातीला ऑपरेशन झाले तेव्हाच स्वादुपिंड बुळबुळीत असल्याने ते जुळले जात नव्हते तेव्हाच ते पूर्ण काढलं असतं तर पुढचे सगळे प्रॉब्लेम आलेच नसते असं पेशंटच्या पत्नीचे म्हणणं आहे.
पेशंट ला आयुष्यभर इन्सुलिन घ्यायला लागू नये या विचारातून डॉक्टर ने आधी पूर्ण स्वदुपिंड काढले नसावे.)
हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना चौदाव्या दिवशी पेशंटला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या, 'तो' डॉक्टर बाहेर गेला होता म्हणून असिस्टंट डॉक्टरने पूर्वीच झालेल ऑपरेशन पुन्हा रिओओपन केलं, (3 वेळा)आतड्याला छिद्र झाल आहे असं सांगण्यात आलं.
(डॉक्टरचं नाव वैयक्तिक रित्या मेसेज करून विचारू शकता.)
त्यानंतर ही पेशंटला उलट झाल्या, एकदा उलटी केल्यानंतर त्यातून प्लास्टिकची छोटी रिंग बाहेर पडली, पेशंटच्या पत्नीचे म्हणणं आहे डॉक्टरने हलगर्जीपणा केलेला आहे तर ICU तील डॉक्टरांचे म्हणणं आहे की ती रिंग पॉटमध्ये आधीच असेल.
डॉ भारत लोटे 29/03/2017 रोजी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाले, 19/07/2017 रोजी त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आले आणि प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार रुग्णालयाने अक्षम्य हलगर्जीपणा केला आहे, चुकीची ट्रीटमेंट दिली आहे. ( याबाबत हॉस्पिटलचे म्हणणं काय हे अप्रकाशित आहे.)
( संगीता लोटे यांनी सेकंड ओपिनियन घेतलं होतं, कोणत्याही सर्जरीची अजिबात आवश्यकता नाही असं त्यांना सांगण्यात आलं होतं. पण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरने भीती घातली, कॅन्सर होण्याची शक्यता वर्तवली आणि सर्जरी 200% यशस्वी होईल अशी हमी दिली. त्यामुळे सर्जरी करण्याला परवानगी देण्यात आली. )
पैशाचा प्रॉब्लेम असल्यामुळे सौ संगीता भारत लोटे यांनी स्वतःला विकण्याचीही तयारी दाखवली होती, शिवाय मुलगा प्रतीक याला स्वतःची किडनी विकण्याची परवानगी दिली होती. ( शासकीय सेवेत वैद्यकीय अधिकारी म्हणून पंचवीस वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबियांची ही स्थिती असेल तर कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या, कुठलेही विमा कवच नसलेल्या अभागी जीवांच काय होतं असेल? )
💡 बऱ्याचदा माणूस हतबल झाला की त्याचा विवेक हरवतो आणि तो करून पाहिला काय हरकत आहे? असं म्हणून कर्मकांड करतो, याला अपवाद संगीता लोटे ताई व इतर प्रियजण सुद्धा नाहीत.
त्यांनी
1)संतोषी मातेचे कडक उपास केले, मातेकडे जाऊन आर्जवं केली.
2) स्वामी समर्थ मठात जाऊन तासंतास करुणा भाकली. बरे झाल्यानंतर मठात सेवा देऊ असेही नवस बोलले.
3) अमावस्येला रात्री बारा वाजता पिंपळाच्या झाडाखाली जाऊन दिवे लावले.
4) भटजीच्या सांगण्यानुसार गव्हाच्या पिठाचे दिवे करून त्यात तूप घालून अमावस्येला रात्री बारा वाजता पिंपळाच्या झाडाखाली ते दिवे लावले.
5) देव पाण्यात ठेवले.
6)मिठ मोहरी उतरून नजर काढली.
7)अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मठात अन्नदानासाठी 50 हजार रुपये द्या आणि मला पावती दाखवा असा पेशंटने आग्रह धरला.
ट्रीटमेंटच्या खर्चामुळे आपले कुटुंबीय हतबल झाले आहेत याची त्यांना कल्पना नव्हती.
( दवाखान्याचा दररोजचा खर्च 40 ते 50 हजार रुपये होता.)
(29/03/2017 - 19/07/2017 - 112 दिवस पेशंट ऍडमिट होता.)
पूर्वी कधी त्यांनी पाच हजार रुपये देणगी मठाला दिली होती, तीच पावती एडिट करून 50 हजार रुपये देणगी मठाला दिली असं त्यांना दाखवण्यात आलं.
पेशंटला आर्थिक स्थितीचा अंदाज आल्यानंतर त्यांनी इच्छा मरण मागितले. मग शासकीय स्तरावरून मदतीची हालचाल झाली. तोपर्यंत फार उशीर झाला होता.
" इच्छा मरण एक सत्यकथा " हे पुस्तक वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवत.(संतोष घोंगडे यांनी केलेलं मुखपृष्ट लाजवाब आहे.)
(महाराष्ट्र शासनाचा "डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार" हा आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, रुग्णालये आणि स्वयंसेवी संस्थांना दिला जातो. हा पुरस्कार डॉ भारत लोटे यांना राजापूर तालुक्यातील ओणी PHC साठी मिळाला होता.)
👉🏻 दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे पाच लाख रुपये देणे बाकी होतं त्यामुळे ते डेड बॉडी देत नव्हते. मंत्रालयातील अधिकारी ओम प्रकाश शेटे यांनी फोन केल्यामुळे नातेवाईकांच्या ताब्यात बॉडी देण्यात आली.
मंगेशकर रुग्णालयाने राहिलेल्या पैशांसाठी फोन केला असता 5 लाख काय 50 लाख देऊ तुम्ही आमचा माणूस द्या असं नातेवाईक म्हणाले.( दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला त्यांचे पैसे मिळाले नसावेत. )
तनिषा भिसे यांच्यासाठीही मंत्रालयातून फोन आला होता पण दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाने हालचाल केली नाही.... वरील किस्सा माहित झाल्याने केवळ त्या प्रशासनाला दोष द्यावा वाटतं नाही. ही व्यवस्था जबाबदार आहे आणि अशा व्यवस्थेला निर्माण करण्यात मतदान न करणारे, जात धर्म स्वार्थ पाहुन, पैसे दारू घेऊन मतदान करणारे जबाबदार आहेत.
तूर्तास इतकंच...
मंगेशकर कुटुंबीय, धनूभाऊ केळकर आणि दीनानाथ मंगेशकर यांच्या अनितिमान वर्तुणुकीविषयी पुन्हा कधीतरी.....
_सिद्धेश्वर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा