नदिष्ट - मनोज बोरगावकर
"तत्वमासी श्वेतकेतू"_ जे तत्व माझ्यात आहे तेच या सृष्टीच्या चराचरात सामावलं आहे, 'नदिष्ट' पुस्तक वाचल्यानंतर मन या जाणीवेने मौन होते.
संथ वाहणारी नदी, तिचा निर्मनुष्य काठ, झाडांची दाट गर्दी, अधिमधी दूर मंदिरात वाजणारी घंटा, आकाशात विहार करणारा पक्षांचा थवा आणि नदीच्या निर्मळ पाण्यात वेळेच भान हरपून मनसोक्त डुंबणारा मी, असं स्वप्न प्रत्यक्षात साकार व्हावं अशी इच्छा 'नदिष्ट ' मुळे होते.
आईच विस्तारित गर्भ म्हणजे नदी, आई निर्वतल्यावर नदीच्या डोहात आईची उब शोधणारे, निर्वाणीचा काळ जवळ आलाय हे उमजून नदीच्या तिरावर बसून गहिवरणारे दादाराव......
विचारांच्या तंद्रित हरवण्यासाठी एकांत शोधत गोदाकाठी आलेली सगुणा.....
सर्व बंध तोडून नि्रिछ झालेला भिकाजीं.....
मासे पकडणारा बामनवाड भोई....
रेल्वे रुळावर निनावी मेलेली सकीनाबी....
कालुभैय्या.... आणि लेखक हे सर्वजण न दिसणाऱ्या बंधाने नदीशी, एकमेकांशी, जगाशी जोडले गेले आहेत.
नदी वाहत असते कधी संथपणे, कधी उग्रपणे, आपण काठावर उभे राहून क्षण दोन क्षण त्या पाण्याचा सहवास अनुभवतो. पुन्हा काठावर येतो, नदी आपली तिच्या वेगाने वाहत असते.
आपलं आयुष्यही नदीप्रमाणे वाहतय, वाहतं पाणी जसं परत फिरून कधी येणार नाही तसंच जीवनात येणाऱ्या माणसांचही आहे.
पूर्वग्रह न बाळगता वागता यायला हवं कारण सगळंच क्षणभंगूर आहे.
पुस्तकात ऐके ठिकाणी सगुणा, भिकाजीं लेखकाचा कायमचा निरोप घेतात, आपण आयुष्यात पुन्हा कधीही भेटणार नाही याची जाणीव त्यांना असते. त्या क्षणी आपलाही कंठ दाटून येतो, हृदयात कालवाकालव होते.
पण....
तरीही हे तिघे भाग्यवान, यांना निरोपाचं बोलणं तरी करता आलं.
(लाईफ ऑफ पाय मधील पायला एकाएकी आईवडिलांचा निरोप घ्यावा लागतो, त्याला एकच खंत जन्मभर सतावत असते. तो म्हणतो "I suppose, in the end, the whole of life becomes an act of letting go. But what always hurts the most is not taking a moment to say goodbye. I was never able to thank my father for all I learnt from him. To tell him, without his lessons... I would have never survived.")
पुस्तक वाचल्यानंतर आपण काहीतरी खूप वेगाने गमावतोय असं वाटत राहतं, ते काय असेल बरं?
दररोज नदीवर जाणाऱ्या संवेदनशील मनाचं, त्याच्या आठवणीचं, अनुभवाचं हे पुस्तक प्रत्येकाने वाचावं आपल्या प्रियजनांना भेट द्यावं.
_सिद्धेश्वर (300624)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा