धर्म
दहशतवादाचे मूळ धर्मात आहे. धार्मिक श्रद्धेत आहे. धर्माच्या नावे भावनिक आवाहन केले की, धार्मिकांची सारासार विचारशक्ती लुप्त होते. धर्मोन्माद चढलेल्या अशा श्रद्धाळूची झुंड धोकादायक असते; अविचारी कृत्ये करते, असे वारंवार दिसून आले आहे.
धर्मांमुळे माणसामाणसांत भेदाच्या भिंती निर्माण झाल्या आहेत. आम्ही आणि ते असे तट पडले आहेत. प्रत्येकाला आपलाच धर्म श्रेष्ठ वाटणे स्वाभाविक आहे. जगातल्या आजच्या समस्या अन्य धर्मीयांमुळे निर्माण झाल्या आहेत. जगातील सर्व लोकांनी आमचा सर्वश्रेष्ठ, महान पवित्र धर्म स्वीकारला की, विश्वशांती निर्माण होईल, सर्वत्र आबादी आबाद होईल असे प्रत्येक धार्मिकाला वाटते.
परंपरा, धर्मग्रंथ, श्रद्धा, भावना यावर धर्माचा डोलारा उभा असतो. त्यामुळे आपल्या धर्माचे तेवढे उत्कृष्ट, इतर धर्मांचे निष्कृष्ट अशी दृढ भावना प्रत्येक धार्मिक व्यक्तीच्या मनात असते. सर्व धर्म चांगले असा समभाव वरवर दिसत असला तरी वास्तव परिस्थिती काय ते सर्वजण जाणतात.
खोटे बोलू नये, कुणाची फसवणूक करू नये, कुणाला दुखवू नये, चोरी- लूटमारी करू नये, कुणावर अन्याय जबरदस्ती करू नये असे सर्वच धर्म सांगतात. पण जेव्हा दोन धार्मिक गटांमध्ये (समजा हिंदू-मुस्लिम) दंगल पेटते तेव्हा काय होते ते आठवा.
वरील सर्व धार्मिक उपदेश दोन्ही गट विसरतात. अन्य धर्मीयांच्या दुकानांतील माल लुटणे, त्यांच्या स्त्रियांवर अत्याचार करणे हेच धार्मिक कृत्य आहे, हीच धर्माची आज्ञा आहे, हेच देवाला आवडणारे असे दोन्ही धर्मीयांना वाटते. अशा गोष्टी अनैतिक आहेत, असे करण्यात काही चूक आहे, असे त्यांच्या मनातसुद्धा येत नाही. असे वाटते ते केवळ धार्मिक उन्माद चढलेल्या दंगलखोरांनाच नव्हे, तर दंगलीत प्रत्यक्ष सक्रिय सहभागी नसलेल्या सर्वच धार्मिक श्रद्धाळूना असेच वाटते. दोन्ही धर्मांतील लोक आपापल्या गटातील दंगलखोरांच्या हिंसक कृत्यांचे, अनैतिक अत्याचारांचे समर्थन करतात. परधर्मीयांची घरे जाळणाऱ्यांना आणि त्यांच्या स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना ते शूरवीर म्हणून गौरवतात. त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळतात असा अनुभव दिसतो.
म्हणून सर्वधर्मसमभाव ही संकल्पना फोल आहे. असा समभाव सर्वबैच अशक्य आहे. एखाद्या हिंदूने एका मुसलमानाला वाचवले किंवा एखाद्या मुसलमानान दंगलीच्या वेळी एका हिंदू स्त्रीला संरक्षण दिले अशा एकदोन घटना घडत असतील; पण त्या अपवादात्मक.
म्हणून सर्वधर्म अभाव हवा. सर्व धर्म नष्ट होतील, सगळ्यांचा 'मानवता' हा एकच धर्म असेल तरच जगात शांतता, सुरक्षितता नांदू शकेल. नाहीतर धर्मांधांच्या हल्ल्याची तलवार कायमची टांगती राहील.
मानवता हाच खरा धर्म
_प्रा य ना वालावलकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा