होय व्यसनमुक्ती शक्य आहे - महेंद्र कानेटकर (251125)
शारीरिक, मानसिक स्वास्थ्याला घातक असणाऱ्या बाबींच सातत्यपूर्ण सेवन वा आचरण करणं म्हणजे व्यसन....
दारू तंबाखू सिगारेट अफू गांजा इत्यादीच सेवन व्यसनाधीन व्यक्ती करतो.
(मठातील कर्मकांड - आचरण )
सुरुवातीला मजा म्हणून घेतलेली चव नंतर निव्वळ सजा बनून जाते.
वाईट परिस्थिती, अडचणी या प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य भाग आहेत. त्यांना प्रतिसाद तीन प्रकारे देता येतो.
1)निर्धाराने सामना करणे.
2)पळून जाणे.
3)हतबल होणे.
हतबल झालेली माणसं स्वतःला दोष देत व्यसनाधीन होतात. एका व्यसनाधीन व्यक्तीमुळे त्याच्या संपर्कातील 20 जणांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो.
टेन्शन हतबलता स्टेटस या सबबीखाली नशेचा आधार घेतला जातो.एकदा नशा केली की त्या अनुभवाचे न्यूरॉन्स आपल्या मेंदूमध्ये निर्माण होतात. शरीराला सवय होऊ लागल्याने कोटा वाढत जातो. माणूस दुष्टचक्रत अडकण्याची शक्यता वाढते. म्हणून त्या अनुभवाचे न्यूरॉन्स आपल्या मेंदूवर निर्माण होऊच देऊ नका.
( दारू बियर याचा पहिला ग्लास घेतल्यानंतर साधारण दहा वर्षांनी माणूस व्यसनाधीन होण्याची शक्यता असते.)
होय व्यसनमुक्ती शक्य आहे, या पुस्तकात दोन भाग आहेत. पहिल्या भागात व्यसनाचे प्रकार, त्यामुळे शरीरावर, कुटुंबावर होणारे परिणाम सविस्तर सांगितले आहेत. दुसऱ्या भागात व्यसनमुक्तीसाठी काय केलं पाहिजे याबद्दल सांगितल आहे.
व्यसन हा आजार आहे. तो इच्छाशक्ती, उपचार याने पूर्ण बरा करता येतो हा विश्वास, उमेद हे अनुभव कथन देतं.
भरभरून जगण्यासाठी इतरांच्या अनुभवातून, चुकातून शिकलं पाहिजे. त्याच त्या चुकांचीं पुनरावृत्ती आपल्याकडून आपल्या प्रियजनांकडून होऊ नये यासाठी हे पुस्तकं वाचलं पाहिजे कारण जीवन अमूल्य आहे.
💡 पुस्तकातील उतारे
👉🏻व्यसन एक आजार आहे, हे मान्य केलं की त्याचे टप्पे निश्चित करावे लागतात. व्यसनाची अगदी पहिली पायरी म्हणजे प्रयोगशीलता. या पायरीवर दारू, गांजा, बीअर यांचा परिचय होतो. उत्सुकतेपोटी, समारंभात, जत्रेत व्यसनाचा वापर केला जातो. यात प्रामुख्याने मजा घेणं अपेक्षित असतं. अगदी दारुबद्दल बोलायचं तर कधीतरी पार्टीत, मित्रांसोबत 'कंपनी' म्हणून दारू प्यायला सुरुवात होते. क्वचित काहीजण पहिल्यांदा दारू घेतल्यावर व्यसनी होतात. पण त्यासाठी साधारणपणे किमान दहा वर्ष किंवा अधिक काळही जाऊ शकतो. ह्याच्या पुढच्या टप्प्यात मित्रांबरोबर पिणं, फार थकवा आला असेल किंवा तणाव असेल तर पिणं चालू होतं. हळूहळू ती सवय बनायला लागते. पण त्यासाठी आवश्यक असणाऱ्या दारूचं प्रमाण वाढू लागतं. त्याला सर्वसामान्य भाषेत 'कोटा' वाढणं असं म्हणतात. त्याचं प्रमुख कारण म्हणजे शरीराची दारू सहन करण्याची क्षमता वाढू लागते.
👉🏻महत्त्वाचा टप्पा म्हणजे 'हा आजार आहे आणि तो माझ्या कुटुंबातील व्यक्तीला झाला आहे,' या कटू सत्याचा मनोमनी नव्हे काया-वाचा-मनाने स्वीकार करणं, व्यसनमुक्तीच्या प्रवासातला हा सर्वाधिक अवघड टप्पा आहे. हा टप्पा ओलांडला तर पुढची बाट सुकर असते.
👉🏻संपूर्ण जगाचा विचार केला तर तोंडाच्या कॅन्सरचं प्रमाण भारतात सर्वाधिक आहे. याचं कारण तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ खाणारे सर्वाधिक लोक भारतात आहेत. जबड्याचा कॅन्सर, अन्ननलिकेचा कॅन्सर, जिभेचा कॅन्सर फक्त तंबाखूने होतो. माणसाला हमखास मृत्यूकडे नेणारे हे आजार तंबाखूनिर्मित आहेत.
मग याला विष म्हणायचं की तंबाखू तुम्हीच ठरवा!
👉🏻व्यसन बंद करायचा निर्णय आणि अंमलबजावणी यात जेवढी दिरंगाई जास्त, तेवढी व्यसन सुटण्याची शक्यता कमी असते.
👉🏻व्यसन सोडण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते ती वेळ! आता, इथे, या क्षणी हे तीन शब्द सर्वात महत्त्वाचे. हे पक्कं लक्षात ठेवावं लागतं. तरच ती कृती प्रत्यक्षात येते.
👉🏻मी या व्यसनाचा गुलाम असून माझं स्वातंत्र्य मला परत मिळवायचं आहे', अशी दुर्दम्य इच्छा असेल तर अशक्य काहीच नाही. अगदी व्यसनमुक्तीही !
👉🏻 व्यसनी माणसाचे महत्त्वाचे लक्षण - वस्तुस्थिती नाकारणे
👉🏻यकृत म्हणजे काळीज हा जगातला सर्वांत मोठा आणि सर्वांत जास्त रसायनं तयार करणारा कारखानाच आहे. हा चोवीस तास सतत चालू असतो. दारूमुळे या कारखान्यातल्या पेशींचं काम वाढतं. पेशींचं काम वाढल्यामुळे तिथे मेद जमा होतो. म्हणजेच लिव्हरचा आकार मोठा होतो. त्याला सूज येते. एखाद्या माणसाने लिव्हर मोठी झाली असतानाच दारू पिणं संपूर्णपणे थांबवलं तर ही सूज कमी होऊ शकते. यकृताचा आकार काही कालावधीनंतर पूर्वीसारखा होतो. पण एखाद्याने बंदच नाही केली तर? सुजलेली लिव्हर आकुंचन पावू लागते. लिव्हरच्या पेशी मरायला लागतात. शरीरातील इतर भागांतील पेशी जशा भरून येतात तशा त्या भरून येत नाहीत, याच अवस्थेला लिव्हर सिहॉसिस म्हणतात.
डॉ. मार्क गोल्ड हे अमेरिकेतील अध्यक्षांचे व्यसनमुक्तीविषयक सल्लागार होते. ते त्यांच्या पुस्तकात म्हणतात- "मला कोणताही दारुडा दाखवा, मी त्याला यकृताचा आजार झाल्याचं दाखवून देईन ! दारुमुळे यकृताचं तीन प्रकारे नुकसान होतं. एक म्हणजे सुजलेली लिव्हर, दुसरं, दारुने झालेला हेपाटायटीस (कावीळ). तिसरं, लिव्हर सिहॉसिस. काही वर्षांपूर्वी हे वाढत जाणारे टप्पे आहेत, असं मानलं जात असे. परंतु आताचं संशोधन असं सांगतं की हेपाटायटीस न होतासुद्धा माणसाला लिव्हर सिन्हॉसिस होऊ शकतो. या आजारांचं प्रमाण विस्मयकारक आहे. दारूपिणाऱ्याला किंवा अतिरिक्त मद्यपान करणाऱ्याला १०० टक्के वेळा लिव्हरला सूज आलेली असते. त्यांच्यापैकी ३० ते ३५ टक्के लोकांना अल्कोहोलिक हेपाटायटीस होतो. त्यातील २० टक्के लोकांना लिव्हर सि-हॉसिस होतो. सर्वांत चांगली गोष्ट अशी आहे की माणसाने जर दारू पूर्णपणे बंद केली तर लिव्हरची सूज उतरते आणि अल्कोहोलिक हेपाटायटीसपासून माणूस बरा होतो. थोडक्यात लिव्हरचे आजार निश्चितपणे बरे होऊ शकतात. त्याकरता फक्त दारू बंद करायला हवी आणि बंद झालेली दारू बंदच ठेवायला हवी. इतकंच पुरेसं आहे.
👉🏻 व्यसनी माणसं मानसिक व्याधींनी त्रस्त असतात. नैतिक अध:पतन होणे हा देखील व्यसनाच्या परिणामांचा एक अविभाज्य भाग आहे.
👉🏻दारू माणसाला स्वतःचं शिक्षण, स्वतःची पत, स्वतःचं हित सारं काही विसरायला लावते. मद्यपीला फक्त दारू आणि दारूच दिसते.
👉🏻हा आजार 'कायमचा' आहे, असं म्हटलं जातं. म्हणजे एखादा माणूस व्यसनांच्या चक्रात अडकतो तो अडकतोच. त्याच्या शरीरात जे बदल घडून येतात ते कायमचे. त्याच्या मनात दारुबद्दल जे आकर्षण आहे ते कायमचं. दारूबद्दल त्याच्या मनात जी आसक्ती असेल ती कायमची. दारुचा पहिला घोट पोटात गेला की थांबता येत नाही तेही कायमचं. म्हणून असं म्हणतात की दारुच्या पहिल्या घातक घोटापासून कायमचं दूर राहायला हवं. 'आता मी बरा आहे, थोडीशी पिऊन बघतो,' असा स्वतःशी विचार करणंही घातकच.
👉🏻कोणताही लांब पल्ल्याचा निश्चय मनावर ओझं आणणारा असतो. मी कायम चांगला वागीन, मी कायम दुसऱ्याचं भलं करीन अशी बांधिलकी सहजासहजी झेपणारी नसते. याउलट या सगळ्या गोष्टी फक्त आजच्या दिवस करायच्या आहेत, असं म्हटलं तर ते करायला सोपं आणि मनावर दडपण न आणणारं ठरतं. व्यसनी व्यक्तीला त्याचा फायदाच होतो. हा कळत-नकळत होणारा फायदा म्हणजेच व्यसनातून मुक्तता.
👉🏻
जे टाळणे अशक्य
दे शक्ती ते सहाया
जे शक्य साध्य आहे
निर्धार दे कराया ।।
मज काय शक्य आहे
आहे अशक्य काय
माझे मला कळाया
दे बुद्धी देवराया ।।
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा