साद सागराची -पुरुषोत्तम गोखले
ॲलिस्टर मॅक्लीन,आनंत सामंत यांच्या पुस्तकांमुळे समुद्र सफरीच आकर्षण निर्माण झालं. साद सागराची या शीर्षकाने पुस्तकाची साद घातली.
पुरुषोत्तम गोपाळ गोखले यांनी भारतीय नौदलात दहा वर्षे काम केलं.(1942-1952) त्यानंतर खाजगी शिपिंग कंपनीत काम करून 10 जून 1970 रोजी वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्त झाले. त्यांना सेवेत आलेले अनुभव या 125 पानात मांडले आहेत.
संरक्षण दलाच्या सेवेत जाण्याचा ध्यास गोखलेंनी घेतला होता. त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले आणि ध्येय साध्य केलं. पोलीस सेवेत असणाऱ्या भावाची त्यांना मदत झाली.( सांस्कृतिक भांडवल असणं खूप महत्त्वाचं असतं.)
दुसरे महायुद्ध, नागरिकांचे बंड,भारताची फाळणी हे विषय येतात. गोखलेनीं हिंदू मुस्लिम ऐक्याचा कैवार घेतला आहे पण त्याचवेळी विनायक सावरकर यांचा उदो उदो उदोही केलाय. हा विरोधाभास आहे. जहाजावरील नोकरीमुळे त्यांना तत्कालीन राजकीय घडामोडींचा अभ्यास करता आला नसावा. असो
नाविक दलात काम करणाऱ्याचे जीवन कसं असू शकतं याची कल्पना या अनुभव कथनातून येते. कौटुंबिक सुखाची तिलांजली द्यावी लागते. नवीन प्रदेश,नवीन माणसं भेटतात. पण कधीतरी यातील फोलपणा जाणवून घराची, आपल्या माणसांची ओढ वाटत असेल ना?
कोलंबस,सिंदबाद, वास्को-द-गामा, मार्को पोलो यांनी लग्न केले असेल का असा प्रश्न मनात येतो?
स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करायचा झाल्यास त्याग करावाच लागतो.
जन्मलो, संघर्ष केला, नोकरी मिळवली,लग्न केलं, सेवानिवृत्त होऊन एक दिवशी मरून गेलो. अशा प्रकारची चरित्र आत्मचरित्र अनुभव कथन नको वाटतात.
ज्या निर्णयामुळे आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली, अशा निर्णया मागची प्रेरणा, त्याचे परिणाम, वा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन याच आकलन होणार असल्यास अनुभव कथन वाचणे म्हणजे वेळ सत्कारणी लागण.
सामान्य नोकरदार माणसाकडे असे सांगण्यासारखं काय असतं? मुलं, त्यांचे शिक्षण, बायकोच्या गरजा, घर, एक चार चाकी यातच त्याच्या जीवनाची इतिश्री होऊन जाते. याच चाकोरीत जीवन घालवलेल असताना, वा सेवेत असताना ज्यांची हयात वरिष्ठांशी जुळवून घेण्यात, संस्थेच हित न पाहता स्वहित पाहण्यात गेलेली असते त्यांनी अनुभव कथन लिहिण्याच धाडस करून वाचकांचा छळ करू नये.
_सिद्धेश्वर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा