मुख्य सामग्रीवर वगळा

झेन अँड द आर्ट ऑफ मोटरसायकल मेंटेनन्स - रॉबर्ट एम पिरसीग (अनुवाद - सरोज देशपांडे )

पहिलं वाचन 

निवेदक त्याच्या लहान मुला बरोबर मोटारसायकलवर फिरायला निघाला आहे. एका टप्प्यापर्यंत जॉन सिल्विया हे दांपत्य बरोबर आहे. या कादंबरीत त्यांचा आपापसात झालेला किमान संवाद, थोडंसं निसर्ग वर्णन आहे. निवेदक स्वतःशी करत असलेला संवाद, भूतकाळातला फीड्रस, त्याचे विचार हा कादंबरीचा मुख्य विषय आहे .
कोणतंही काम, किती शुल्लक का वाटेना दर्जा सांभाळून केलं पाहिजे. याने फरक पडतो. काय फरक पडतो? दर्जा म्हणजे काय? यासाठी कादंबरी अवधान ठेवून दोनदा वाचावी लागेल.( मी पुन्हा वाचणार आहे.)
ज्यावेळी आपण काम करताना दर्जा सांभाळतो, तेव्हा आपण तन्मय, एकाग्र झालेलो असतो. हीच आहे झेन अवस्था, बुद्ध अवस्था.
दर्जा सांभाळून काम केल्याने वस्तू आणि आपण हा द्वैत भाव नाहीसा होतो, आपण नम्र होतो, माणसांकडे माणूस म्हणून पाहू लागतो. ही कादंबरी आपल्या दैनंदिन कामाकडे पर्यायाने आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देते. मला आवडली.

दुसरं वाचन 

आपल्याला आवडलेलं पुस्तक आपल्या परिचितांनी ही वाचलं पाहिजे अशी प्रबळ इच्छा होते. आपल्या पुस्तकाची प्रत सुस्थितीत परत मिळेल का याची धाकधूक असतानाही आपण पुस्तक उधार देतो. काहीशा अशाच भावनेतून सरोज देशपांडे यांनी झेन अँड द आर्ट ऑफ मोटरसायकल मेन्टेनन्स या पुस्तकाचे संक्षिप्तकरण करून मराठी अनुवाद केला आहे. फास्ट फूडच्या जमान्यात गंभीर, डोक्याला ताण देणार वाचलं जाईल की नाही ही शंका असल्याने मूळ पुस्तकाचे संक्षिप्तीकरण केले आहे. (आशयाला हानी न पोहोचवता.) अनुवाद उत्तम झाला आहे. पुस्तकात मांडलेल्या फिलॉसॉफीने वाचक हरखून जातो, मूळ पुस्तक वाचण्याची जिज्ञासा जागृत होते.


एक -
निवेदक व त्याचा अकरा वर्षाचा मुलगा क्रिस मोटरसायकल वरून फिरायला निघाले आहेत. त्यांना कुठे पोहोचण्याची घाई नाही. आड वळणाच्या वाटेने जाण्यास पसंती आहे. नागमोडी वळणे, आकाश, निसर्ग याचा आनंद घेत प्रवास करतायेत. पोहोचण्याची घाई नाही, छान वाटणं महत्त्वाचं आहे. जॉन सिल्विया हे दाम्पत्य त्यांच्याबरोबर आहे. यांचा आपापसातील संवाद अत्यंत माफक आहे. निवेदक स्वतःच्या मनाशी जास्त बोलतोय. थोडफार निसर्ग वर्णन करतोय. हे वाचताना पूर्ण अवधान ठेवावं लागतं, मग निवेदकाशी आपण एकरूप होऊ लागतो. याने वाचक वेगळ्या ट्रान्समध्ये जातो.
निवेदकाच्या मते आपल्या मोटरबाईक ची दुरुस्ती आपण स्वतः केली पाहिजे. यावरून जॉन आणि निवेदकात मतभेद असतात. बियरच्या बॉटलमुळे मतभेद निवळण्यास मदत होत असते.

दोन -
निवेदक प्रेअरी प्रदेशातून जात आहे.(जुलै) प्रवास खडतर आहे. प्रवास जितका खडतर तितका गंतव्य स्थानी पोहोचण्याचा आनंद जास्त.
तीन वर्षांपूर्वीची आठवण निवेदकाच्या मनात येते. क्रिस आठ वर्षाचा असताना ते अशाच सफरीवर गेले होते. भर पावसात त्यांची बाईक बंद पडली. त्यावेळी निवेदकाचा दृष्टिकोन जॉन सारखाच असतो. तंत्र विज्ञानाबद्दल पूर्ण उदासीनता.
निवेदक गाडी गॅरेजला नेतो पण तेथील तंत्रज्ञ कामाबद्दल बेफिकिर असतात. निवेदकला त्यांचं काम पटत नाही. 
का पटत नाही? निवेदकाची काय अपेक्षा असते?..... यासाठी पुढे वाचा.

तीन -
पुढील संवाद निवेदक आणि जॉन यांच्यात होतो.
क्रीस त्याच्या वडिलांना विचारतो.
"तुम्ही भुतांवर विश्वास ठेवता?"
नाही, कारण त्यामध्ये द्रव्य नसतं, ऊर्जा नसते. त्यामुळे शास्त्रीयतेच्या कसोटी प्रमाणे त्यांना खरं अस्तित्व नसतं. त्यांचं अस्तित्व फक्त लोकांच्या मनामध्ये असत. 
शास्त्रीय नियमांनाही ऊर्जा नसते, त्यांच्यातही द्रव्य नसतं म्हणून ते सुद्धा फक्त लोकांच्या मनातच अस्तित्वात असतात.
आपण पूर्णपणे शास्त्रीय दृष्टी ठेवली पाहिजे. त्यामुळे भूतांवर काय, शास्त्रीय नियमांवर काय विश्वास ठेवू नये. मग विश्वास ठेवण्याजोगं काही उरत नाही. पण तेही शास्त्रशुद्धच आहे.
पदार्थ विज्ञानाचे किंवा तर्कशास्त्राचे नियम.... अंक प्रणाली.....बीजगणिताचं आदेशक्रियेचं तत्व ही सगळी भूतच आहेत. आपला त्यांच्यावर इतका विश्वास असतो की ती खरीच वाटू लागतात.
न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधून काढला, पण त्या आधीपासून गुरुत्वाकर्षण अस्तित्वात होतच की नाही. पृथ्वी निर्माण होण्यापूर्वी किंवा सूर्य अस्तित्वात येण्यापूर्वी किंबहुना कोणतीही निर्मिती होण्यापूर्वी गुरुत्वाकर्षणाचा नियम अस्तित्वात होता अशी कल्पना केली पाहिजे.(बरोबर)
स्वतःचं वस्तुमान नाही, स्वतःची ऊर्जा नाही, कोणाच्या मनातही नाही, कारण कोणी अस्तित्वातच नाहीये, अवकाशात नाही, कारण अवकाश ही अस्तित्वात नाही अशा स्थितीतही गुरुत्वाकर्षणाचा नियम होता असं म्हणता येईल का?
जर त्यावेळीही गुरुत्वाकर्षणाचा नियम होता असं मानलं तर मग एखादी गोष्ट अस्तित्वात नसते असं मानण्यासाठी कशी परिस्थिती असायला हवी?
अस्तित्वरहिततेचे सर्व संभाव्य गुणधर्म गुरुत्वाकर्षणाच्या नियमाला लागू पडतात. उलटपक्षी अस्तित्वाचा एकही गुणधर्म आढळत नाही. तरीही तो अस्तित्वात होता असं मानणं सारासार विचाराला धरून आहे.
याचा पुरेपूर विचार केला तर आपण फिरूनफिरून एकाच निष्कर्षाला पोहोचतो. तोच एकमेव शक्य बुद्धिनिष्ठ आणि संयुक्तिक निष्कर्ष आहे. गुरुत्वाकर्षण आणि गुरुत्वाकर्षणाचा नियम न्यूटनच्या आधी अस्तित्वात नव्हते. दुसऱ्या कुठल्याही निष्कर्षात काही तथ्य नाही. आणि याचा अर्थ असा की गुरुत्वाकर्षणाचा नियम फक्त माणसांच्या मनात असतो. दुसरीकडे कुठेही नाही. ते एक पिशाच्चच आहे. आपण मगरुर आणि अहंकारी असतो म्हणून इतरांच्या भुतांची टिंगल करतो. आपल्या स्वतःच्या भूतांविषयी आपण त्यांच्या इतकेच अज्ञानी रानटी आणि अंधश्रद्धा असतो.
आपण सर्वजण गुरुत्वाकर्षणाच्या नियमावर विश्वास ठेवतो कारण - सामूहिक संमोहन 
शास्त्रज्ञांची खरी समस्या मन आहे. मनाला द्रव्य नाही, ऊर्जा नाही. तरीही ते जे जे करतात त्यावर मनाच अधिराज्य असतं त्यातून सुटका नाही. भूतं फक्त मनात असतात असं शास्त्रज्ञ म्हणतात ते मला फार पटतं.
शास्त्र सुद्धा फक्त आपल्या मनात असतं. त्यामुळे ते काही वाईट ठरत नाही किंवा भूतं देखील.
आयझॅक न्यूटन हे चांगलं भूत आहे. फार चांगलं. भूतकाळातल्या अशा हजारो भूतांचा आवाज म्हणजे आपला सारासार विचार.

निवेदकाने उपस्थित केलेल्या मुद्याचा प्रतिवाद पुढीलप्रमाणे -

💡एखादी गोष्ट अस्तित्वात नसते असं मानण्यासाठी कशी परिस्थिती असायला हवी?
उत्तर - 
👉🏻भौतिक परिणाम नाही.(द्रव्य, ऊर्जा )
👉🏻तिचा जगावर कोणताही परिणाम दिसत नाही.
👉🏻 तार्किकदृष्ट्या अशक्य आहे.
(उदा. विवाहित अविवाहित पुरुष, गोल चौकोन)

शिंग असलेला घोडा (अस्तित्वात नाही.)
👉🏻कोणताही भौतिक पुरावा किंवा अंश सापडत नाही.
👉🏻जगावर किंवा निसर्गावर कोणताही प्रत्यक्ष परिणाम होत नाही.
👉🏻फक्त माणसाच्या कल्पनेत आणि कथेत असतो.

हवा (अस्तित्वात आहे.)
👉🏻 डोळ्यांना दिसत नसली तरी वजनाने आणि दाबाने मोजता येते.
👉🏻 झाडांची पाने हलतात, आपण श्वास घेतो.
👉🏻 ती संपूर्ण अवकाशात पसरलेली आहे.

💡आपण मगरुर आणि अहंकारी असतो म्हणून इतरांच्या भुतांची टिंगल करतो. आपल्या स्वतःच्या भूतांविषयी आपण त्यांच्या इतकेच अज्ञानी रानटी आणि अंधश्रद्धा असतो.
उत्तर - ही तुलनाच चुकीची आहे. 
उदा. एकशिंगी घोड्याची पूजा अर्चा केल्याने सर्व आजार बरें होतील.
पाणी 100 ° ला उकळते.

वरील दोन्ही विधानांचा विचार केला असता आपण सत्यता कशाची पडताळू शकतो. अर्थात दुसऱ्या विधानाची.

ज्या अमूर्त संकल्पनेची सत्यता पडताळता येत नाही तिचा कोणी उदो उदो करत असेल तर संयत भाषेत सत्य मांडण चुकीचं कसं? प्रमाणाच्या आधारे सत्य मांडणं यात कुठे आला रानटीपणा?

💡आपण सर्वजण गुरुत्वाकर्षणाच्या नियमावर विश्वास ठेवतो कारण - सामूहिक संमोहन.
उत्तर - असं म्हणणं अर्धवट आहे. कारण तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे देशाचे असा प्रयोग करून आपण याची प्रचिती घेऊ शकतो आणि निष्कर्ष दरवेळी एकच येईल. म्हणून याला संमोहन म्हणणं चूक आहे.

चार
शारीरिक श्रम वाचावेत म्हणून आपण तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या वस्तू वापरतो. ते तंत्रज्ञान समजून घेत नाही. त्यामुळे त्या वस्तू बद्दल आत्मीयता येत नाही. आपण भावना रहित होऊन वस्तू वापरू लागतो. मग हळूहळू माणसांच्या बाबतीतही तसंच करतो.

पाच -
जॉनच्या मोटरसायकलचा हँडल खिळखिळा झाला आहे. बिअरच्या कॅन चा पत्रा वापरून तो नीट करूया असे निवेदक सुचवतो. जॉन नाक मुरडतो. BMW च्या टॉप मॉडेल ला बियर कॅनचा पत्रा लावण्यात त्याला कमीपणा वाटतो.

जॉन आणि निवेदक यांच्या दृष्टिकोनातील फरक इथे जाणवतो. निवेदक आंतरिक सौंदर्य पाहत असतो.
( फिड्रस, क्रिसशी संवाद साधू पाहतोय असं स्वप्न निवेदकाला पडतं. )

सहा -
पुढील उतारा प्रकरण 6 मध्ये आहे. अत्यंत महत्वाची संकल्पना आहे.

फिड्रस च्या मते माणसाच्या आकलनाचे दोन प्रकार असतात. क्लासिकल आकलन, रोमँटिक आकलन.अंतिम सत्याच्या दृष्टीने पाहता या द्विधा भावाला फारसा अर्थ नाही खरा, परंतु पायाभूत स्वरूपाच्या शोधासाठी क्लासिकल पद्धत वापरताना तो आवश्यक ठरतो.

फिड्रस च्या विश्वात मूलभूत पायाभूत कल्पना समजून घेणं महत्त्वाचं असतं.

मोटर सायकल वरून भ्रमंती रोमँटिक असली तरी तिची देखभाल करणं हे क्लासिकल असतं. तिला लागलेली ग्रीज, घाण तिच्या रचनेवर लागणारं प्रभुत्व या गोष्टी रोमँटिक मनाला मुळीच भुलवणाऱ्या नसतात. त्यामुळे स्त्रिया या फंदात सहसा पडत नाहीत.

क्लासिकल आकलनपद्धतीत पृष्ठपातळीवरचा कुरूपपणा अनेकदा आढळत असला तरी तो त्यात स्वाभाविकपणे अनुस्यूत असतोच असं नाही. त्यात एक स्वाभाविक सौंदर्यजाणीवही असते. ती अतिशय सूक्ष्म असते. त्यामुळे रोमँटिक माणसांना समजून येत नाही. क्लासिक पद्धत भावनारहित, अनलंकृत, मितव्ययी आणि प्रमाणबद्ध असते. तिचा उद्देश भावना जागृत किंवा प्रेरित करणं हा नसतो. सावळ्यागोंधळामधून व्यवस्था शोधणं, अज्ञात गोष्टींचं ज्ञान करून घेणं हा असतो. ती सुंदरपणे मुक्त व स्वाभाविक नसते, तर सुंदरपणे संयत असते. सर्व गोष्टींवर नियंत्रण करणारी असते. हे नियंत्रण किती कौशल्याने राखलं जातं यावर तिचं मोल ठरतं.

रोमँटिक माणसाला ही क्लासिक पद्धत नीरस, बेढब, कुरूप वाटते. यांत्रिक देखभालीसारखीच. यात असतात एखाद्या गोष्टीचे भाग, घटक, त्यांची नाती. दहाबारा वेळा कंम्प्यूटरवर त्यांच्या रचना करून पाहिल्याशिवाय काहीही लक्षात येत नाही. सगळं मोजायचं, मापायचं, सिद्ध करायचं. त्याचं दडपण येतं. ओझं वाटतं. नुसता राखी रंग. जीवनविमुखपणाचा !

या क्लासिक पद्धतीतही रोमँटिकच्या छटा अवतरतात. उच्छृंखल, तर्कहीन, अनिश्चित, अविश्वसनीय, सुखवादी. उथळ, पोकळ. बहुधा बांडगुळी. समाजाला फरपटवणाऱ्या. दोन्हीमधल्या संघर्षाच्या या खुणा आता ओळखीच्या वाटायला हव्यात.

अडचण इथेच आहे. माणसं कोणत्यातरी एकाच पद्धतीनं विचार करतात. त्यामुळे त्यांना दुसरी पद्धत नीट समजत नाही. तिच्याबद्दल गैरसमजही असतात. पण आपल्याला उमजतं तेच काय ते सत्य असा त्यांचा ठाम विश्वास असतो. मला तर वाटतं, या दोन्ही पद्धतींची किंवा सत्यदर्शनांची सांधेजुळणी करू शकेल असं माणूसच आता आढळणार नाही. वस्तुस्थितीची ही दर्शनं एकत्र येतील अशी जागा दिसत नाही.

👉एखाद्या यंत्राची तांत्रिक आकृती रोमँटिक व्यक्तीला दाखवली तर तिला त्यात स्वारस्य वाटणार नाही. त्याला दिसतील फक्त रेषा, आकडे, नावं. काहीच मन वेधणारं नाही. पण तोच आराखडा क्लासिकल माणसाला दाखवला तर त्याला त्याची भुरळ पडेल. कारण त्या रेषा, आकार, प्रतीकं यात त्याला पायाभूत स्वरूपाची सगळी समृद्धी जाणवेल.

फिड्रस च्या दृष्टिकोनातून हे समजावण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्णपणे समजून घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका.

A) क्लासिकल आकलन 

ही विचार करण्याची पद्धत तर्क, रचना आणि विश्लेषण यावर आधारित असते.
कसे पाहते?
गोष्टींचे तुकडे करून समजून घेते.
“हे कसे काम करते?” हा प्रश्न विचारते.
लॉजिक, विज्ञान, गणित यावर भर देते.
उदाहरण:
मोटरसायकल पाहताना:

👉 इंजिन कसे काम करते?
👉 कोणता पार्ट खराब आहे?
👉 ते दुरुस्त कसे करायचे?
👉 Focus: quality & technical value
क्लासिकल - कसे काम करते? / तर्क आणि विज्ञान /विश्लेषण / भागांमध्ये पाहते.

B) रोमँटिक आकलन
ही विचार करण्याची पद्धत भावना, सौंदर्य आणि अनुभव यावर आधारित असते.
कसे पाहते?
गोष्टींच्या “फील” कडे लक्ष देते.
“हे कसे वाटते?” हा प्रश्न विचारते.
कला, सौंदर्य, अनुभव यावर भर देते.
वस्तुस्थिती पेक्षा भावनांचे प्राबल्य असतं.
उदाहरण:
मोटरसायकल पाहताना:

👉 चालवताना कसा आनंद मिळतो?
👉 वारा, निसर्ग, स्वातंत्र्य याचा अनुभव
👉 ती किती सुंदर दिसते.
👉 Focus: emotion & attraction

रोमँटिक - कसे वाटते? / भावना आणि अनुभव / सौंदर्य / पूर्ण चित्र पाहते.
👉 आपण फक्त एकाच पद्धतीने (फक्त तर्क किंवा फक्त भावना) जग पाहिलं, तर जीवन अपूर्ण राहते.
👉 दोन्ही एकत्र आल्यावर “Quality” (गुणवत्ता) समजते.

फिड्रस च्या विवेकनिष्ठ विश्लेषणात्मक क्लासिकल विश्वाचा विचार करणं मला आवडतं आहे.

(फिड्रस विश्लेषणात्मक विचाराच्या एकाच घावात संपूर्ण जगाचं, त्याच्या मर्जीनुसार, विभाजन करायचा. लहान भागांचं आणखी लहान, आणखी लहान भागात. त्याला हवं असलेलं रूप येईपर्यंत.)

सात -
क्लासिकल अंडरस्टँडिंग वर प्रेम करणारं फिड्रस हे निवेदकाचे भूतकाळातील एक व्यक्तिमत्व आहे. फिड्रस चा एकाकीपणा, इतरांसारखं न वागणं यामुळे त्याला मनोरुग्ण ठरवण्यात येत. इलेक्ट्रिक शॉक ची ट्रीटमेंट देऊन फिड्रस हे व्यक्तिमत्व संपवलं जातं. निवेदक मोटरसायकलवर फिरायला येतो आणि फिड्रस हळूहळू बाहेर येऊ लागतो.

( विवेकनिष्ठतेच्या मागे लागून फिड्रस भ्रमिष्ट झाला होता. )

नऊ -
आपण बऱ्याचदा काल्पनिक भीती ने ग्रासलेलो असतो. किंवा संकटाकडे कानाडोळा करत असतो. अशावेळी फिड्रस ने सांगितलेल्या तर्क पद्धतींचा वही पेन घेऊन अवलंब करावा.

फिड्रस ने ज्याचा पाठपुरावा केला होता त्या गोष्टी मागे जायचं निवेदक ठरवतो. तर्कनिष्ठता विवेकनिष्ठता बाळगून पायाभूत स्वरूप समजावून घेणं....

तर्क दोन प्रकारचा असतो.
निगमनात्मक आणि आनुमानिक 

▶️ अनुमानिक तर्क
निरीक्षणाच्या आधारे सामान्य विधान करणे म्हणजे अनुमान. 
उदा. बायको आज फारच प्रेमाने बोलत आहे म्हणजे तिला माहेरी जायचं असावं.
हा झाला अनुमानिक तर्क. यात पूर्व अनुभवावरून सामान्य सिद्धांत मांडलेला असतो. नियमांवर नाही. निष्कर्ष आहे, खात्री नाही.

▶️ निगमनात्मक तर्क
क्लासिकल अंडरस्टँडिंग निगमनात्मक तर्काशी जुळते. मशीन कशी काम करते त्याचे नियम आधी समजून घेतले जातात. त्या नियमांच्या आधारे समस्या सोडवली जाते.
उदा. इंजिनमध्ये स्पार्क नाही → इंजिन चालणार नाही.
बाइक चालत नाही → कदाचित स्पार्क नाही.
इथे विचार लॉजिकल आणि नियमांवर आधारित आहे.

गुंतागुंतीच्या प्रश्नांसाठी निगमनात्मक व अनुमानिक या दोन्ही तर्क पद्धतींचा उपयोग करावा. यासाठी योग्य टप्प्यांनी जाणं म्हणजे शास्त्रीय पद्धत. प्रश्न कठीण असेल तर एक वही ठेवावी. प्रत्येक टप्प्याला काय केलं त्याची टिपणं ठेवावी. कधी कधी नुसतं लिहून काढल्यामुळे डोक्यातला गुंता सुटतो.

नोंदी नेमकेपणानं करायच्या. समस्येचं विधान , संभाव्य उत्तराचं प्रमेय, त्यासाठी करायच्या चाचण्या, त्यावरून काढलेली अनुमानं आणि अखेर निष्कर्ष.

समस्येचं नेमकं विधान करणं आवश्यक असतं. आपल्याला निश्चितपणे माहीत असलेलीच गोष्ट नोंदवायची. 
उदाहरणार्थः समस्या - मोटरसायकल का चालत नाही? वरवर पाहता हे मठ्ठपणाचं विधान वाटतं. पण नक्की माहीत नसताना, समस्या - मोटरसायकलच्या विजेच्या यंत्रणेत काय बिघाड आहे? असं लिहिलं, त्यात बिघाड नसला, तर आपण विनाकारण चुकीच्या गोष्टीच्या मागे जाऊ. त्यापेक्षा मोटरसायकल का चालत नाही? अशी समस्या मांडून पुढे शक्यता -विजेच्या यंत्रणेत बिघाड, किंवा...., किंवा...., असं म्हणणं योग्य. नंतर एकेक शक्यता प्रयोगाण, चाचणीन तपासता येते.

👉वास्तविक पाहाता शारीरिक श्रम हा मेकॅनिकच्या कामातला सगळ्यात साधा आणि सोपा भाग असतो. सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो योग्य निरीक्षण आणि नेमकेपणाने विचार करणं. म्हणूनच की काय, यंत्रांच्या चाचण्या घेताना अनेकदा मेकॅनिक मंडळी अतिशय घुमी आणि अलिप्त दिसतात. आपण त्यांच्याशी बोललेलं त्यांना आवडत नाही. कारण मनात आलेल्या कल्पना, यंत्राची रचना, याकडे त्यांचं लक्ष लागलेलं असतं. ते आपल्याकडे किंवा मोटरसायकलकडे पाहाताहेतसं वाटत असलं तरी खरं म्हणजे ते तिकडे पाहातच नसतात. त्यांच्या दृष्टीने मोटरसायकलची योग्य रचना, बिघडलेल्या त्या वाहनाची कारणमीमांसा करण्याचं तंत्र याबद्दलचं ज्ञान वाढवण्याचा त्यांचा खटाटोप चाललेला असतो. त्यांची दृष्टी रचनेच्या पायाभूत स्वरूपाकडे असते.

दहा -
फिड्रस रसायनशास्त्राचा विद्यार्थी होता. त्याला सूक्ष्मजीवशास्त्रामध्ये विशेष प्राविण्य मिळवायचं होतं. यामागे व्यक्तिगत आकांक्षा नव्हती, उदात्त ध्येयमुळे तो प्रेरित झाला होता. पण.....
विज्ञानाद्वारे मिळणारे ज्ञान हे अंतिम सत्य नसून, ते काळाच्या ओघात बदलणारे मानवी आकलन आहे. आपण ज्याला 'वैज्ञानिक सत्य' समजतो, ते पूर्णपणे त्रिकालाबाधित नसून केवळ सध्याच्या ज्ञानाच्या मर्यादेतले एक भाष्य आहे.
असं त्याला जाणवत. मग अभ्यासात प्रगती नाही हे कारण देऊन त्याची विद्यापीठातून हाकलपट्टी होते.

▶️ फिड्रस ला असं का वाटलं?
निसर्ग आपल्याला थेट “सत्य” देत नाही.
तो फक्त माहिती देतो (उदा. आपण काय पाहतो, मोजतो.)
पण त्या माहितीचं स्पष्टीकरण (theory / प्रमेय) आपणच बनवतो.
👉 म्हणजे:
निसर्ग = डेटा देतो
माणूस = त्यावरून अर्थ काढतो

▶️ यावर फिड्रस विचार करतो.
एखाद्या घटनेचं एकच स्पष्टीकरण नसतं.
अनंत (infinite) प्रमेयं बनू शकतात.
👉 उदाहरण: आकाश निळं का दिसतं?
एक प्रमेय: प्रकाश विखुरतो
दुसरं प्रमेय: वातावरणामुळे
आणखी वेगळं स्पष्टीकरणही देता येईल.
म्हणजे एकच सत्य → अनेक वेगवेगळ्या theories

▶️ मग समस्या काय आहे?
जर अनेक प्रमेयं शक्य असतील
आणि सगळ्यांना काही प्रमाणात समर्थन मिळत असेल तर “खरं कोणतं?” हा प्रश्न निर्माण होतो.

▶️ आइनस्टाइनचं म्हणतो 
“एखाद्या क्षणी, अनेक theories मधून एक theory जास्त योग्य वाटते.”
👉 पण लक्ष दे:
तो “नेहमीच” योग्य नाही म्हणत
तो “त्या क्षणी” योग्य म्हणतो.
म्हणजे सत्य कायमचं नसतं — ते बदलत राहतं.
जास्त संशोधन → जास्त theories
जास्त theories → जास्त पर्याय
जास्त पर्याय → निश्चित उत्तर कमी

म्हणजे:
आपण सत्याजवळ जातोय असं वाटतं, पण कधी कधी उलट गोंधळ वाढतो.
फीड्रस असा विचार करतो की  विज्ञानाची पद्धतच पूर्णपणे परिपूर्ण नाही. त्यामुळे समाजात गोंधळ वाढतो.सत्य ठाम राहत नाही.म्हणून तो confused होतो आणि अभ्यासात अडकतो.

या ठिकाणी फीड्रस चुकला असं मला वाटतं. प्रमेय बदलले की उत्तर बदलू शकतो हा त्याने काढलेला निष्कर्ष चुकीचा वाटतो.
उदा.समजा आपण एखादा रस्ता शोधतोय.
5 routes आहेत,सगळे perfect नाहीत.
मग तू काय करशील? त्या क्षणी best वाटणारा route निवडशील. विज्ञानही तसंच काम करतं . फिड्रस सारखा विचार केला तर चालनच थांबवावं लागेल.

अकरा -
फिड्रस यानंतर काही काळ लष्करात गेला. मग तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी विद्यापीठात दाखल झाला. तो तत्त्वज्ञानाकडे वळला कारण अनंत प्रमयाबद्दलच्या त्याच्या प्रश्नांना विज्ञानाकडे उत्तरं नव्हती. कांट आणि ह्युम या तत्त्वज्ञांचे दाखले देऊन तो संवेदनाविश्वाविषयी काहीतरी समजावतोय.

बारा -
फिड्रस तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी भारतात आला.
एक दिवस प्राध्यापक वर्गात जग मिथ्या आहे असा युक्तीवाद करत होते. फिड्रस ला त्यांचा युक्तिवाद पटला नाही. तत्त्वज्ञानातील फोलपणा जाणून तो सर्व सोडून परत येतो.

त्याला का नाही पटत?

वेदांत विचार - आपल्याला जे दिसतं आणि आपण जे असतो हे वेगळे नाहीत. दोन्ही मध्ये एकच तत्व आहे. द्वेत भावना नाहीशी होणे म्हणजे तत्वमसी - तूच ते अंतिम सत्य आहेस, म्हणजे व्यक्ती आणि विश्व वेगळे नाही.
तत्वमसी श्वेतकेतू - जे तत्व माझ्यामध्ये आहे तेच या सृष्टीच्या चरचरांमध्ये आहे.

तर्कशास्त्र - हे ज्ञाता आणि ज्ञेय यामधील फरक गृहीत धरतं म्हणून तर्कशास्त्र वेदांत विचार म्हणतो त्या अंतिम सत्याकडे जाऊ शकत नाही.
ज्ञाता - जाणणारा 
ज्ञेय- जाणण्याची वस्तू 
ज्ञान - जाणण्याची क्रिया 

वेदांत विचारात ज्ञाता, ज्ञेय हे एकच आहे याची जाणीव होणं म्हणजे ज्ञान असं म्हटलं आहे. तर्कशास्त्र हे मान्य करत नाही. तर्क नेहमी विषय आणि निरीक्षक वेगळे मानतो. शारीरिक मानसिक भावनिक क्रिया बंद केल्या की ज्ञाता आणि ज्ञेय यामधील भेदाचा भ्रम नाहीसा होतो. त्यासाठी ध्यान करायचं असं वेदांत विचार सांगतो. फिड्रस ला या कल्पनेत काही तथ्य वाटेना. त्याने तर्क शुद्ध विचार ( क्लासिकल अंडरस्टँडिंग ) कधी सोडलं नाही. जिथे तर्कशुद्ध विचार नसतो तिथे अर्थ किंवा तथ्य नसतं हा ठाम विश्वास त्याने कधीच सोडला नाही.
ध्यान, अद्वैत विचार, जग मिथ्या हे फिड्रस ला पटलं नाही . 
प्राध्यापकांना तो विचारतो...
"हिरोशिमा नागासाकी वर जे अणुबॉम्ब पडले ते मिथ्या होते का?"
प्राध्यापक स्मित करून म्हणाले, "होय".
"जर दुःख मिथ्या असेल तर मानवी वेदनेचं काय? मृत्यूचं काय? हिंसेच काय? जर दुःखालाही तुम्ही मिथ्या म्हणत असाल तर ही तत्त्वज्ञानाची भाषा वास्तवापासून तुटलेली आहे."
असं म्हणून फीड्रस वर्गाच्या बाहेर पडला. त्याने तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाला रामराम ठोकला.

आता फिड्रस एका कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू होतो. गुणवत्ता दर्जा कॉलिटी म्हणजे काय? हा विचार त्याला स्वस्थ बसू देतं नाही.
गुणवत्तेची व्याख्या करता येत नाही ती फक्त जाणवते, तिची व्याख्या करायला गेले की तुम्ही तिला मर्यादित करता.
आपण जगाकडे दोन दृष्टिकोनातून पाहतो:
​वस्तुनिष्ठ (Objective): विज्ञानाच्या नजरेतून, जिथे मोजमाप आणि आकडेवारी महत्त्वाची असते.
​व्यक्तिनिष्ठ (Subjective): भावना आणि मानवी आवडीनिवडी.
​फिड्रसने असा बोध घेतला की गुणवत्ता या दोन्हीच्या आधी येते. ती केवळ वस्तूत नसते आणि केवळ पाहणाऱ्याच्या मनातही नसते. जेव्हा माणूस आणि वस्तू एकमेकांशी जोडले जातात, त्या 'क्षणामध्ये' गुणवत्ता जन्माला येते.

फिड्रसने गुणवत्तेचे दोन भाग केले होते, जे नंतर त्याने एकत्र केले.
​रोमँटिक गुणवत्ता : वस्तूचे बाह्य सौंदर्य, तिची अनुभूती आणि तात्कालिक आनंद
(उदा. मोटरसायकल चालवताना मिळणारा आनंद).
​क्लासिक गुणवत्ता: वस्तूची अंतर्गत रचना, तिचे मेकॅनिझम आणि त्यामागील तर्कशास्त्र 
(उदा. मोटरसायकलचे इंजिन कसे काम करते याचे ज्ञान).
​फिड्रसच्या मते, खरा 'गुणवत्ता दर्जा' तेव्हाच सिद्ध होतो जेव्हा बाह्य सौंदर्य आणि अंतर्गत तर्कशुद्धता यांचा योग्य मिलाफ होतो.

फिड्रससाठी गुणवत्तेचा थेट संबंध माणसाच्या 'काळजी घेण्याच्या' वृत्तीशी आहे. जेव्हा एखादा मेकॅनिक किंवा निर्माता आपल्या कामात पूर्णपणे मग्न होतो, त्यात त्याचे मन असते, तेव्हा त्या कामातून 'गुणवत्ता' निर्माण होते. काम करताना 'मी' आणि 'ते काम' यातील अंतर मिटून जाणे म्हणजेच गुणवत्तेचा अनुभव घेणे होय.
फिड्रसच्या मते गुणवत्ता हा जगाचा पाया आहे. ती कोणतीही निर्जीव व्याख्या नसून, माणूस जेव्हा एखाद्या गोष्टीशी अत्यंत आत्मीयतेने आणि सजगतेने जोडला जातो, तेव्हा निर्माण होणारा तो एक जिवंत अनुभव आहे.

काही काळाने फिड्रस चा मुलगा क्रिस याच अकाली निधन होतं. कारण काय? फिड्रस ची प्रतिक्रिया कशी असते जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचा.
(मराठी अनुवाद सरोज देशपांडे यांनी केला आहे आणि रोहन प्रकाशन ने प्रकाशित केला आहे. पुस्तक सध्या आऊट ऑफ प्रिंट आहे.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...