जे लोक अगदी लहानशा अडचणींमुळे कोसळतात किंवा प्रयत्न सोडून देतात, त्यांच्यासाठी नजीब याची कहाणी म्हणजे एक नैतिक शिक्षण ठरेल....
नजीब- एक अगदी साधा माणूस !
नजीब, केरळ मधील एका खेड्याचा रहिवासी, नदीतील वाळू उपसायचं काम करायचं. वाळू उपशावर बंदी आली आणि त्याच सुमारास नजीबला परदेशी कामाची संधी आली. काही काळ परदेशी नोकरी करून गावाला पक्क घर बांधायचं आणि पुन्हा कायमचं गावाकडे राहायचं असा त्याचा बेत होता. तीस हजार रुपये कर्ज घेऊन तो व्हिसा मिळवतो. चार महिन्याची गरोदर पत्नी सैनू, आई उम्माह यांचा निरोप घेऊन तो मुंबईला जातो. त्याच्याबरोबर शेजारच्या गावातील हकीम हा तरुणही होता.
चांगल्या जीवनशैलीचे स्वप्न घेऊन ते रियाध विमानतळावर उतरतात. त्या क्षणापासून त्यांच्या अपेक्षाभंगाला सुरुवात होते. भाषा येत नाही, ओळखीचे कोणी नाही, जवळ पैसे नाहीत...... कोणी घ्यायलाही येत नाही. त्यांची पक्की तंतरते.
चार पाच तासांनी एक अर्बाब (मालक ) येतो. त्यांना घेऊन दूरच्या वाळवंटात जातो. हकीम नजीब यांची ताटातूट होते.
तीन वर्ष नऊ महिने चार दिवस नजीब परकीय मुलखात अडकून पडला होता. बकऱ्या, उंट राखण्याचं काम त्याला करावं लागलं. या काळात त्याने काय सोसलं? तिथून फरार कसा झाला? याची थरारक कहाणी त्याने सांगितली आहे. अखेरच्या पानापर्यंत उत्कंठा शिगेला पोहोचवणार नजीबच हे अनुभव कथन नक्की वाचावं, घरबसल्या वाळवंटी जीवनाची सफर होते.
इब्राहिम खादिरी नक्की कोण होता? तो कुठे गेला? हमीदच पुढे काय झालं? हे प्रश्न अनुत्तरितच राहतात.
जीवन आणि मायीन अमूल्य आहे. संकटात सापडल्यावर याची जाणीव होते. नजीबच्या अनुभवातून आपण शहाणे होऊ आणि सजग राहून या दोन्हीचा आस्वाद घेऊ.
नक्की वाचा "गोट डेज", ही काही केवळ नजीब ची कथा नाही, हे वास्तव जीवन आहे, एका बकऱ्याच जीवन!
(नजीबची कहाणी सांगणारा आडू जीवितम या नावाचा चित्रपटही आहे. चित्रपट कितीही चांगला असला तरी पुस्तक वाचणं हा अनुभव सरस राहील. कारण नजीब जे काही वर्णन करतोय त्याचे चित्र वाचकाच्या मनात तयार होतं. जगातला कोणताही दिग्दर्शक हे चित्र तयार करू शकत नाही.)
💡पुस्तकातील उतारे
👉🏻स्वतःच्या दुःखातून बाहेर पडण्याचा एक मार्ग म्हणजे आपल्यापेक्षा अधिक व्यथित परिस्थितीत जगलेल्या लोकांच्या कथा ऐकून घेणं.
👉🏻बंदी माणसाच्या चेहऱ्यावर कत्तलीसाठी ओढत नेल्या जाणाऱ्या बकऱ्याचे भाव असायचे. आपण निरपराध आहोत हे तो टाहो फोडून सांगायचा प्रयत्न करायचा. त्याच्या किंकाळ्या तुरुंगाच्या भिंतींच्या वर जायच्या, पण ते सारं अरण्यरुदन ठरायचं. अरब लोक कायदा स्वतःच्या मर्जीप्रमाणे अमलात आणायचे.
👉🏻हमीदला बघण्याची माझी ती शेवटची वेळ. त्याचं पुढे काय झालं असेल ते माहीत करून घेण्याचा मी प्रयत्न केला, पण मला ते समजलं नाही. एका शेतात तो सूर्योदयापासून रात्र होईपर्यंत काम करायचा, मजुरी अगदी क्षुल्लक आणि छळ विपुल. ते सारं असह्य झालं तेव्हा तो पळून गेला. तो जेव्हा तुरुंगात पोहोचला तेव्हा हमीद माझ्या चौपट आनंदात होता. त्याला असं ठामपणे वाटायचं, की एकदा तो सरकारच्या आश्रयाला आला, की अरब त्याला पकडू शकणार नाही. पण जग किती अचानकपणे, उलटंपालट होतं!
👉🏻माझ्या अंतर्मनात काहीतरी जळून त्याची राख झाली.
👉🏻करुणा असेल तर ती व्यक्त व्हायला भाषा आवश्यक नसते.
👉🏻मी मोठ्यांदा हसलो. आणखी काय करू शकणार होतो? माझ्या वास्तवापासून माझी स्वप्नं किती लांब होती हे माझ्याशिवाय कोणालाच ठाऊक नव्हतं.
👉🏻जेव्हा एखाद्या गोष्टीची गरज पडते, तेव्हाच आपण तिचा विचार करू लागतो आणि मग चुकचुकतो की जेव्हा आपल्याला संधी होती तेव्हा आपण काही शिकून घेतलं नाही.
👉🏻ज्या बकरीचं दूध काढायचं असेल, तिच्याकडे कधीही मागच्या बाजूनं जाऊ नका. समोरच्या बाजूनं जा. दूध काढायला सरळ सरळ सुरुवात करू नका. एखाद्या लहान मुलाला चुचकारतात तसं तिला कुरवाळा, गाल, नाक, पाठ, थोपटा. असं सारीकडून तिला थोपटलं की मग तिच्या बाजूला बसा. तिच्या पोटाला हलक्या हातानं दोन-तीन वेळा कुरवाळा. मग सावकाश तिच्या आचळांना हात लावा. बकरी झटका देण्याचा प्रयत्न करील, कारण बकऱ्या देखील कुमारिकेसारख्या शहारतात. मग तिची अस्वस्थता दूर कारण्यासाठी तिच्या आचळांना हळुवार रीतीनं कुरवाळा. घरात तिचं पिलू हे काम करतं. आई आणि मूल यांचा असा स्पर्शसंबंध घडला, की आईची अस्वस्थता कमी होते आणि मुलाबद्दलच्या वात्सल्यानं तिच्या स्तनाग्रातून दूध वाहू लागतं. बकरीचं दूध, तुम्हाला ही अवस्था गाठल्यानंतरच काढता येतं.
👉🏻मला हे वास्तव एका दिवसात जाणवलं. चिंता आणि भीती, या गोष्टींचा काहीच उपयोग नव्हता. ते जग मला परकं झालं होतं. आता अस्तित्वात होतं ते फक्त दुःखद असं नवं विश्व. या जगाच्या परिस्थितीत मी फेकला गेलो आहे. या जगाला असलेल्या चिंतांमध्ये मी आकंठ बुडालो आहे आणि त्यांचं रूप आत्ता आणि इथंच समजून घेणं हे चांगलं होईल. जिवंत राहण्याचा तो एकमेव मार्ग होता. अन्यथा माझ्या वाढत्या काळजींनी माझा बळी घेतला असता आणि दुःखानं मी बुडून गेलो असतो. शक्य आहे, की जो जो या इथं असा फसला, तो याच तन्हेनं जिवंत राहिला- नाही का?
👉🏻मी कालच्या बद्दल विचार करीत नव्हतो किंवा उद्याची चिंता करीत नव्हतो. फक्त आजच्या दिवसावर लक्ष केंद्रित करीत होतो. मला वाटतं, मसरामधलं माझं सारं आयुष्य असंच होतं.
👉🏻 मसरा - बकऱ्यांचे घर
खुबुस - मला मिळू शकेल असा एकमेव खाद्यपदार्थ
मायीन - अत्यंत दुर्मिळ असा द्रव पदार्थ जो अतिशय काळजीपूर्वक वापरायचा असतो. कृपया पाणी असं बाष्कळ नाव त्याला देऊ नका. अर्बाब ला मायीन बद्दल जे वाटतं त्याची तुलना आपल्याला पाण्याबद्दल काय वाटतं याच्याशी होऊ शकत नाही.
जमल - उंट
ला - नाही
जी हम - होय मालक
यल्लाह - चालता हो
हलीब - दूध
गनम - बकरी
वारसी - वैरण
👉🏻अखेर शब्दांत असं काय ठेवलंय? त्याचा समजलेला अर्थ महत्त्वाचा. हे शब्द जेव्हा अर्बाब उच्चारायचा, तेव्हा त्याला काय म्हणायचं आहे हे मला समजत असे. संपर्क साधण्यासाठी भाषातज्ज्ञ असण्याची गरज नसते.
👉🏻आयुष्याला तोंड द्यायला मी एकटाच शिकत होतो. जी कामं पूर्वी कधीच केली नव्हती, ती करायला माझा मीच शिकत होतो. आयुष्याचा नवा मार्ग मलाच शोधायचा होता आणि असाधारण अशा परिस्थितीशी जुळवून घ्यायचं होतं. मला कोणतीही निवड करण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, मी खरोखरच संपूर्णपणे असहाय होतो. एखाद्याच्या हाडांचा अगदी चूर होण्याइतपत काम केलं, की मगच थोडंसं पाणी मिळतं, हे आम्हाला अगोदर समजलं असतं, तर आम्ही हाडांचा चूर होण्याइतकंच काय, पण प्राण जाईपर्यंत काम केलं असतं.
👉🏻 जिवंत राहण्यासाठी मला कसला तरी आधार हवा होता.
👉🏻खच्ची झालेले बकरे वेगानं वाढतात हे मी बघितलं होतं, पण खच्चीकरण इतकं निष्ठुर असतं ते मी बघितलं नव्हतं.
👉🏻पहिला बकरा दोन किमीवर असला तर पुढचा पाच किमीवर, मसरा आणि वाळवंट यांच्यातील अंतर मी किती वेळा तुडवलं असेल याचा मला अंदाजच नव्हता. मला इतकंच आठवतं, की मी मरणप्राय थकलो होतो. मी एकदा पाणी प्यायला थांबलो तेव्हा अर्बाबनं मला जोरानं मारलं आणि माझ्या हातातला पाण्याचा पेला भिरकावून दिला. मी पुन्हा वाळवंटाकडे परतलो - तहानेनं शोष पडलेल्या अवस्थेत, धापा टाकत, जीभसुकलेल्या अवस्थेत.
👉🏻त्या जीवघेण्या उष्णतेमध्ये पाण्याचा एक थेंबही न पिता आणि पळभराची विश्रांती न घेता मी जिवंत कसा राहिलो याच आश्चर्य मला नंतर अनेकदा वाटलं. त्या प्रकरणी दोन घटक माझ्या कामी आले असं मला वाटतं - एक जिवंत राहण्याची इच्छा आणि दुसरी, अल्लाहवर असलेली माझी अचल श्रद्धा!
👉🏻तुम्हाला खरं सांगू, मला अनेकदा असं वाटतं, की काही माणसांपेक्षा बकऱ्यांना अनेक गोष्टी चांगल्या समजतात. काही असो, त्या दिवशी रमणी माझ्यासमोर शांत आणि स्थिर उभी राहिली. अर्बाबला पुरेल एवढं दूध मी भांड्यात जमा करू शकलो; ते मी त्याच्या तंबूसमोर ठेवलं. मनात मी त्याला शिव्या घातल्या- "पी डुकरा. पोट भरेपर्यंत दूध पी."
👉🏻जो मृत्यूचा स्वीकार करायला तयार होतो त्याला भीती कसली उरणार?
👉🏻अखेर मला जेव्हा प्रत्यक्षात गुराख्याचं आयुष्य जगायची संधी मिळाली तेव्हा उमजलं की वास्तव हे स्वप्नापेक्षा किती वेगळं असतं, त्यात वेदनांमुळे केवढं अंतर असतं. जे अपरिचित असतं, त्याची स्वप्नं, दूर अंतरावरून बघणं बरोबर नाही. ही स्वप्नं जेव्हा प्रत्यक्षात येतात तेव्हा त्यांच्याबरोबर जुळवून घेणं अनेकदा अशक्य असतं.
👉🏻ते तसं नसलं तरी ते तसं असेल यावर मी विश्वास ठेवणं अधिक पसंत केलं. मी माझ्या हृदयाची तशी समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
👉🏻रोजच्या रोज अशी सुटका करून घेण्याच्या किती संधी आपण सोडून देतो? आमच्या हाती संधीचा सुवर्णचषक येतो आणि आम्ही तो फेकून देतो.
👉🏻बाहेर जाण्याचा रस्ता शोधण्यासाठी मी कोणत्या दिशेनं जायला पाहिजे - पूर्वेला की दक्षिणेला, की पश्चिमेला नाही तर उत्तरेला ? आता हे खरं होतं, की इथं मला पुरेसं अन्न मिळत नव्हतं, पाणी, कपडे, झोपण्यासाठी व्यवस्थित अशी जागा, पगार आणि बघण्यासाठी स्वप्नं, यातलं काहीच इथं नव्हतं. पण काहीतरी मौल्यवान असं होतंच होतं माझा प्राण! निदान मी तो शाबूत राखू शकलो होतो. मी अपरिचित अशा वाळवंटात पळून गेलो असतो, तर मी कदाचित तोही गमावला असता. मग इतका काळ मी जे काही सहन केलं होतं, त्याला अर्थ काय राहिला असता?
👉🏻ती रोपं माझ्या कानात कुजबुजली, "बाळ नजीब, वाळवंटात दत्तक गेला आहेस तू. तुलाही तुझं आयुष्य, जीवित्व या वाळवंटात सांभाळून ठेवलं पाहिजे. या वाळवंटाबरोबर लढत दे. जाळणारे वारे, पोळणारे दिवस, मावळतील. त्यांच्यासमोर शरणागती पत्करू नकोस. कंटाळू नकोस, नाहीतर तुझ्या आयुष्याची किंमत तुला द्यावी लागेल. हार मानू नकोस. अर्धमेल्या अवस्थेत, जणू ध्यानधारणा करतो आहेस अशा आविर्भावात रहा. आपण कोणीच नाही आहोत असा आविर्भाव आण.
न बोलता, गुप्तपणे अल्लाहला विनव. तो तुझ्या अस्तित्वाची ओळख मान्य करेल. तुझा आक्रोश तो ऐकेल. अखेर एक दिवस संधी तुझ्यापुढे चालून येईल. गरम झळी वाहून जातील. शीतल वारा तुला साद घालेल. मग आणि मगच तू तुझं डोकं वर कर; तुझं अस्तित्व जाहीर कर आणि मग क्षणार्धात स्वातंत्र्याच्या वसंतात प्रवेश कर. बहर आणि भविष्यातली फळे चाख.
त्या लहानग्या झाडांचे शब्द मी कान देऊन ऐकले, योग्य संधीची मी वाट पाहू लागलो.
👉🏻माझी इच्छा एकच होती- अगदी तीव्र अशी वाळवंटात, कपड्यांसकट एका सावलीत बसावं. माझ्या काठीची सावली पडायची, त्यात मी पुरेशी सावली शोधायचा प्रयत्न केला. मी अशा स्थळांबद्दल ऐकलं होतं, की जिथं कावळ्याच्या पंखाइतकीही सावली पडत नाही. त्यातलं सत्य मला वाळवंटात समजलं.
👉🏻काम सकाळी पाच वाजता सुरू व्हायचं आणि रात्री दहा वाजले तरी संपायचं नाही.
👉🏻इतर वेळीदेखील हे सिद्ध झालं आहेच, की आत्यंतिक गरज असली की ऐकणाऱ्याला कुठलीही भाषा समजते! पण त्याचबरोबर माझा अनुभव असाही आहे, की ऐकणाऱ्याच्या ऐकण्याच्या गरजेपेक्षा, बोलणाऱ्याची सांगण्याची गरज मोठी असली तर ऐकणाऱ्याला भाषा समजत नाही.
👉🏻मला ला जर कुणी विचारलं, की वाळवंटात तू बघितलेलं सर्वात सुंदर असं दृश्य सूर्य म्हणजे वाळवंटात उडी घेणारा कासव भासतो. अगदी सावकाश, तो वाळूच्या जंगलात बुडतो.
👉🏻मोठ्या दुःखापैकी एक अगदी तीव्र असं दुःख म्हणजे, एखादं सुंदर दृश्य बघताना सोबत कुणी नसावं.
👉🏻आमचे सारे विचार, भावना; दोन शब्दांत सामावायला आम्हाला किती संयम पाळावा लागला असेल याचा विचार करा. ज्या माणसाला सातत्यानं आपले विचार दुसऱ्याला सांगण्याची संधी अविरत मिळत असते, त्याला माझ्या वेदनांची कल्पना येणार नाही.
👉🏻आयुष्यातील प्रत्येक अनुभवाला एक सर्वोच्च असा बिंदू असतो तो अनुभव आनंदाचा असू दे, दुःखाचा असू दे, आजारपणाचा असो किंवा भुकेचा असो. त्या त्या अनुभवातील सर्वात जास्त तीव्रता एकदा अनुभवली, की आपल्याला दोनच मार्ग उपलब्ध असतात. आपण त्या अनुभवासकट जीवन जगायचं किंवा निषेध करायचा आणि त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी संघर्ष करायचा. आपण दुसऱ्या मार्गाची निवड केली आणि आपण जिंकलो तर आपण सुरक्षित राहतो. जर नाही जमलं, तर आपण आत्महत्या करतो किंवा वेड्यांच्या इस्पितळात दाखल होतो.
👉🏻वेदना कितीही तीव्र असू देत किंवा अडचणी कितीही मोठ्या असू देत, कालौघात आपण त्या साऱ्या गोष्टींशी जुळवून घेतो. माझ्या दैनंदिन आयुष्याची सवय मला वर्षभरात झाली. आयुष्याचं ओझं असं मला आता वाटत नव्हतं. पूर्वी मला नेहमी नवल वाटायचं की अगदी गरीब, नित्य आजारी असलेले, अंध आणि विकलांग हे सर्व लोक आयुष्य जगतात कसे आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलतं कसं, त्या प्रश्नाचं उत्तर मला आता मिळालं होतं- ते हास्य जीवनातूनच उमलतं.
माझ्या आयुष्यात काही अडचणी आहेत असं मला आता वाटत नव्हतं. मला काय करायला लागत होतं? सकाळी उठायचं, बकऱ्यांचं दूध काढायचं, प्राण्यांना चारा द्यायचा, बकऱ्यांना चालण्यासाठी घेऊन जायचं. परत यायचं, खुबुस खायचे, दिवसाच्या प्रकाशात आणि रात्रीच्या चांदण्यांत पलंगावर आडवं व्हायचं. कसलेही विचार नाहीत, चिंता नाहीत किंवा इच्छा नाहीत. मला आणखी काय पाहिजे होतं? बाहेरच्या जगात काय चाललं आहे याबद्दल मला काहीच माहीत नव्हतं आणि माझं कुटुंब मी विसरलो होतो. माझ्या लेखी ते सारे लोक माझ्याबरोबर कुठल्यातरी जन्मात किंवा कुठल्यातरी काळात राहिले होते. त्यांच्या दुःखांमुळे मला काहीच फरक पडत नव्हता. माझं आयुष्य अगदी सुखाचं होतं, सुखाचं!
👉🏻एकाएकी सुटका करून घेण्याची माझी सारी तृष्णा हरपली. एखाद्या बकऱ्याला जरी मुक्त केलं तरी, तो परत त्याच्या पिंजाऱ्यामध्येच येईल. मी तसा बनलो होतो. या अवतारात आणि या आकृतीत मी कुठंही जाऊ शकणार नव्हतो. मी बकरा आहे, माझं जीवन या मसरामध्येच आहे. मी माझं जीवन संपवेन किंवा मी एखाद्या रोगानं मरेन, तोपर्यंत हा घाणेरडा चेहरा, ही घाणेरडी आकृती, हे गलिच्छ आयुष्य, मला कुणालाच दाखवायची इच्छा नव्हती. माझं आयुष्य म्हणजे बकऱ्याचं आयुष्य आहे.
👉🏻सरते शेवटी माणसाला पुढे जाण्यास मदत करते ती फक्त आशावृत्ती ! आम्ही चालत होतो, पण आमच्यापुढे पसरलं होतं वाळवंट. वाळू, वाळू आणि फक्त वाळूच !
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा