मुख्य सामग्रीवर वगळा

तर्कटपंजरी- प्राजक्ता अतुल (मधुश्री पब्लिकेशन )

देव काल्पनिक आहे.
पारलौकिक शक्ती अस्तित्वात नाही.
कोणाकडेही अतेंद्रीय शक्ती नसते.
पुनर्जन्म, कर्म सिद्धांत हे थोतांड आहे.

या प्रकारचे विचार मान्य असणाऱ्या विचारी नागरिकांचे एक संघटन आहे, BRIGHTS या नावाचं.
BRIGHTS च्या सभासदांचा निरीश्वरवादाच्या विचारापर्यंत प्रवास कसा झाला हे सांगणारे अनुभव या पुस्तकात आहेत. पुस्तक संग्रही ठेवण्यासारख आहे. आवर्जून वाचावे.

मनातलं -

अरे तू सूर्याला मानतो का? समुद्राला मानतोस का? गुरुत्वाकर्षणाच्या नियमाला मानतोस का? यावर विश्वास ठेवतोस का?

कोणी अशा प्रकारचे प्रश्न विचारले तर किती विचित्र वाटेल? सूर्य समुद्र गुरुत्वाकर्षणाचा नियम यांना मानायचे काय, ते तर अस्तित्वात आहेतच. आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो, स्वतः पडताळणी करू शकतो.

देव मानतोस का? या प्रश्नाला काय उत्तर देणार? उत्तर देण्याआधी प्रश्नकर्त्याची आणि आपली देव या शब्दाची व्याख्या एक हवी ना? देवाची व्याख्या व्यक्तीपरत्वे बदलेल, मग देव आहे का याचे उत्तरही बदलणारच ना?

नास्तिक, नॉनव्हेज या शब्दांमध्ये नकारात्मकता आहे. यांना प्रतिशब्द प्रचलित करायला हवेत.( शरद बेडेकर यांनी निरीश्वरवाद हा चांगला शब्द दिला आहे.)

BRIGHTS च्या सभासदांचे अनुभव वाचल्यावर एक समानता जाणवते. वाचन करून विचार चिकित्सा करायला त्यांनी प्राधान्य दिलं. जन्मताच माणूस निरिश्वरवादी असतो. कुटुंब समाज यांच्याकडून देवधर्म याच प्रोग्रॅमिंग केलं जातं. वर्षानुवर्षेची धारणा पक्की होते. हे प्रोग्रॅमिंग अचेतन मनामध्ये जाऊन रूततं.

शिक्षण, नोकरी, संसार, कामाचा ताण यात धारणा तपासायला, वैचारिक साहित्य वाचायला, नवीन तत्त्वज्ञान समजून घ्यायला वेळ कोण काढणार? डोक्याला ताण कोण देणार? प्रवाहा विरुद्ध जाण्याची हिंमत कोण दाखवणार?

बालपणापासून देवधर्म, चमत्कार,कृपाप्रसाद यांचे कंडिशनिंग झाल्याने क्रिटिकल थिंकिंग, वेगळ्या विचाराविषयीची सहिष्णुता मृतवत होते. यावर मात करणं हे कष्ट साध्य आहे. वेळ देऊन वाचन, विचार, चिंतन केल्यास प्रत्येकजण निरेश्वरवादी होईल.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि BRIGHTS या दोन संस्थांमधील फरक 

👉🏻 देव आणि धर्म यावर आणि अनिस भाष्य करत नाही. यांच्या नावाने होणार आर्थिक मानसिक शारीरिक शोषण थांबवणे, अतेंद्रीय शक्ती चमत्कार यांचा भांडाफोड करणे याला अनिस प्राधान्य देते.
👉🏻 देव आणि धर्म कृत्रिम आहेत ते अस्तित्वात नाहीत असं BRIGHTS चं म्हणणं आहे. BRIGHTS चा विचार radical आहे. समाजात तो स्वीकारला जात नाही. त्यामुळे बंद दाराआड वैचारिक चर्चा झोडणाऱ्यांचे संघटन असं BRIGHTS चं स्वरूप असल्याचं वाटू शकतं, पण अशा चर्चा मधूनच नियमित नास्तिक मेळाव्याचं आयोजन होताना दिसतय.

नीतिमत्तेने वागण्यासाठी देवधर्माची गरज नाही, असं मानणाऱ्या निरेश्वरवादींची संख्या उत्तरोत्तर वाढत जावी यासाठी BRIGHTS काम करतय. पहा, विचार करा, पटलं तर साथ द्या.

BRIGHTS - शून्य धर्म.... समृद्ध जीवन 

💡पुस्तकातील उतारे 

👉🏻देव -धर्माची चिकित्सा करायची म्हणजे प्रसंगी प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारणे आलेच.ह्याबाबत पहिली मर्यादा जाणवली ती व्यक्तिगत पातळीवर आर्थिक स्थिरता आणि वैचारिक स्पष्टता असणे ही. 

👉🏻विवेकवाद सर्वोत्तम मूल्य आहे. त्याच्या प्रसारात हेळसांड नको.

👉🏻The good life is one inspired by love and guided by knowledge. Neither love without knowledge, nor knowledge without love can produce a good life.

👉🏻आम्ही सर्व पारलौकिकाचे अस्तित्व नाकारतो. देव, ईश्वर, स्वर्ग-नरक, आत्मा, पाप-पुण्य-कर्म, पुनर्जन्म, इ. संकल्पनांत अभिप्रेत असलेल्या व्यक्ती, वस्तू, जागा, घटना, गुणधर्म पारलौकिक आहेत. आम्ही ह्या नव्या व्याख्येनुसार नास्तिक आहोत.

👉🏻वस्तुनिष्ठ अनुभवांना सोप्या बुद्धिगम्य नियमांत बसवणे म्हणजे विज्ञान, अशी विज्ञानाची व्याख्या सर्वांना मान्य होईल. त्यामुळे, आम्ही पारलौकिकाचे अस्तित्व अवैज्ञानिक, असत्य मानतो. जर एखादा पारलौकिक पदार्थ किंवा घटना वस्तुनिष्ठ, बुद्धिगम्य असती तर तिचे अस्तित्व विज्ञानात मान्य झाले असते. ती घटना भौतिक, सत्य ठरली असती, पारलौकिक, काल्पनिक उरलीच नसती.

👉🏻भौतिक विश्वात देव/ईश्वर हस्तक्षेप करतात असे न मानणे.

👉🏻जसे , मी म्हटले की atomic नंबर 1000 असलेला एक घटक आस्तित्वात आहे, हे मी मानत नाही. कारण, असा घटक आस्तित्वात असण्याचे काहीही पुरावे नाहीत. मग देवाबाबत मी संदिग्ध भूमिका का घेतो? त्यालाही तर पुरावा नाही. हा युक्तिवाद मला बिनतोड वाटला.

👉🏻वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाजाचे शैक्षणिक प्रबोधन करणे' हे brights चे प्रमुख उद्दिष्ट आहे.

👉🏻जग आणि मानवी जीवन ह्यांना प्रभावित करणारी कोणतीही सर्वशक्तिमान अलौकिक शक्ती अस्तित्वात नाही, असे म्हणताना आम्ही कोणताही धार्मिक अभिनिवेश बाळगत नाही.

👉🏻पारलौकिक निकषांवर ऐहिक जीवनाचे नियमन करण्यास सुचवणारी कुठलीही जीवनपद्धती धर्म/धम्म/दीन/रिलिजन आम्हाला मान्य नाही.

👉🏻ते वयच तसे असते. भावनिक प्रेरणा मुबलक; पण माहिती तुटपुंजी, अनुभव मोजका आणि समज उथळ. म्हणूनच विचार अपरिपक्व आणि विवेक तोकडा. म्हणतात ना, "Catch them young!" ते ह्यासाठीच.

👉🏻मुळात नास्तिक्याचा प्रवास हा एका झटक्यात, रागाने घेतलेला निर्णय नव्हता. त्यामुळे कोणता असा ठरावीक क्षण आठवत नाही की, 'अमुक एका दिवशी मी नास्तिक झालो'. माझ्यासाठी ती हळूहळू होणारी एक प्रक्रिया होती आणि आयुष्यभर ती चालू राहील असे वाटते.

👉🏻कामाचा एक भाग म्हणून नामांकित, विचारवंत व्यक्तींना भेटणे, त्यांची मुलाखत घेणे, आपली भूमिका समजावून सांगणे हे माझे सातत्याने सुरू असते. हेच काम प्रत्येक सभासदाने स्वतःच्या जिल्ह्यात करावे. जिल्ह्यातील विचारवंत, राजकीय व्यक्ती, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना प्रत्यक्ष भेटून आपली भूमिका समजावून सांगून नास्तिक्याचा अधिकाधिक प्रसार करावा असे वाटते.

👉🏻आपल्याला सांगितले जाते की, मोठ्याने बोलायचे नाही, उलट उत्तरे द्यायची नाहीत, गप्प बसावे, वाक म्हणले की वाकावे. अशा संस्कारांमध्ये आपण वाढतो. शाळेमध्ये प्रश्न विचारणारी मुले आगाऊ ठरवली जातात. खरे तर चिकित्सकवृत्ती असायलाच हवी. पण, शाळेतल्या शिक्षकांनाही प्रश्न विचारणारी मुले आवडत नाहीत. आणि म्हणूनच आपल्याकडे सॉक्रेटिस जन्माला येत नाही.

👉🏻किंमत चुकवण्याचे धाडस तुमच्यामध्ये असेल तरच, तुम्ही जाहीर भूमिका घेऊ शकता.

👉🏻हिंदू धर्मानुसार समुद्र ओलांडणे पाप आहे. ज्याकाळी समुद्र ओलांडणे पाप होते, तेव्हादेखील शिवाजींनी आरमार उभे केले. म्हणजे काय तर, काळाच्या गरजेनुसार वर्तन करायला हवे हे त्यांनी सकृत दाखवून दिले.

👉🏻माझ्या मते, नास्तिकता म्हणजे देव अस्तित्वात आहे की नाही, ह्या प्रश्नापेक्षा हे जग कसे चालते, ह्याचा विचार वैज्ञानिक पद्धतीने करणे होय. हे जास्त महत्त्वाचे आहे. हे विश्व कोणा निर्मिकाच्या इशाऱ्यावर चालते असे सिद्ध झाले, तर त्यावर विश्वास ठेवणे योग्य होईल. 'जेवढा पुरावा, तेवढा विश्वास' हे सूत्र कायम स्मरणात ठेवले पाहिजे. आपण ह्याला अज्ञेयवाद असे म्हणतो. पण, मला वाटते की, ही पूर्ण नास्तिकत्वाच्या आधीची पायरी आहे. तसेच ती विज्ञानवादी भूमिका आहे. अंतिम सत्य माहीत झाले आहे, असा दावा विज्ञान कधीच करत नाही. आजही तरुण पिढीशी संवाद साधत असताना त्यांना प्रश्न विचारायला भाग पाडणे, हा आपला प्रयत्न असायला हवा. येथूनच प्रश्नांकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी त्यांना मिळू शकेल. ह्या प्रयत्नांतूनच योग्य उत्तरेही त्यांना मिळू शकतील.

👉🏻नास्तिकता म्हणजे एखाद्या धर्माला पर्याय अजिबात नाही. ती प्रदर्शित किंवा प्रचार करण्याची देखील बाब नाही.

👉🏻माझी दहावी झाल्यावर आयुष्यातील पुढील १० वर्षे मी काय करावे आणि काय करू नये, हे मुद्दे दादाने एका कागदावर एकदम स्वच्छ मांडून दिले. तो कागद आजही माझ्याजवळ आहे. काय होते त्या कागदावर?

१) कोणत्याही प्रसंगात कर्मकाण्डे करायची नाहीत.

२) धार्मिक विधींवर वेळ, पैसे दवडायचे नाहीत.

३) सतत प्रयत्नशील राहायचे.

४) वेगवेगळे अभ्यासक्रम करून स्वतःच्या बौद्धिक क्षमता विकसित करत राहायचे.

५) देव, धर्म आणि जातियता ह्याला आयुष्यात बिलकूल जागा द्यायची नाही. आणि अशा अनेक सूचना.

मी तो मार्ग स्वीकारला.

👉🏻विवेकबुद्धी म्हणजे सारासार विचार करण्याची पद्धत. तर्काच्या आधारावर समजणाऱ्या गोष्टी पारखून घेण्याची पद्धत. ही एक विचारप्रक्रिया असते. आपले पालक आणि समाज आपण लहान असल्यापासून नकळतपणे ती शिकवत असतात. ती 'उपजत' नसते. उपजत असतात त्या प्रेरणा! त्यातल्याच 'भीती' ह्या प्रेरणेचा वापर विवेकबुद्धीला आकार देण्यासाठी होतो. 'भीती' ही एक उपजत प्रेरणा (Basic Instinct) आहे.

👉🏻पण काही गोष्टींना 'घाबरायचे असते' असे आपल्यावर संस्कार केले जातात. ही असते 'शिकवलेली' भीती. देवधर्म, भुते-खेते वगैरे गोष्टींची भीती ही शिकवलेली भीती असते. ह्यासाठी काही घडावे/दिसावे असणे जरुरी नाही. कल्पनेला बळी पडून काहीही झाले नसतानाही आपण घाबरू शकतो. मनात एकदा का भीतीची कल्पना केली आणि वाढवली की, त्याबद्दलची भीती वाढत जाते.

👉🏻लहान मुलांच्या मनोविकासाच्या काळात त्यांची मानसिक प्रतिकारशक्ती 'विवेकबुद्धी'ने विकसित न करता आपण ती देवाधर्माच्या आणि भुताखेतांच्या भीतीच्या आधाराने विकसित करतो. खरेतर, मुलांच्या मनात एका 'कुतूहलपूर्ण मुला'ची प्रतिमा तयार करून, त्याच्याशी स्वतःची तुलना करायला लावून, त्याला नैतिकतेचा आधार घेऊन, आपण शिस्त लावू शकतो. पुढे थोडे कळत्या वयात त्याच्या अशोभनीय वागण्याचे विश्लेषण करायला लावून, 'तुझ्या बाबतीत असे कोणी केले तर तुला ते चालेल का?', अशा सोप्या तर्कातून विचार करायला लावण्याची सुरुवात करून देऊ शकतो. चांगल्या वागण्याचे कौतुक तर, वाईट वागण्याची निंदा ह्याद्वारे त्याच्या व्यक्तिमत्वाला आकार देऊ शकतो. मनमोकळ्या गप्पा, मित्रमैत्रिणी, शेअरिंग, REBT मध्ये सांगितल्याप्रमाणे भावनांचे विश्लेषण, भावनांचे नियमन, समुपदेशन हे मानसिक प्रतिकारशक्ती वाढविण्याचे जास्त आश्वासक मार्ग आपण मुलांना शिकवू शकतो.

पण तेवढे करण्यासाठी पालकांना वेळ नसतो किंवा तेवढी त्यांची मानसिक कुवतदेखील नसते. अशावेळी 'देवबाप्पा शिक्षा देईल, राक्षस येईल, भूत धरेल' अश्या पद्धतीची भीती आपण त्याच्या मनात पेरतो. पढे मुले अशा गोष्टींना आपसूकच बळी पडत जातात आणि मग आयुष्यभर त्यांना कशा ना कशासाठी ईश्वर लागत राहतो.

👉🏻जसे, शरीराच्या रक्षणासाठी प्रतिकारशक्ती असते, तसे मनाच्या रक्षणासाठी विवेकबुद्धी असते.

👉🏻धर्म ही नशा आहे असे म्हटले जाते. कारण तो ठोस उपाय देत नाही, तर तो केवळ दुःख हलके करायला मदत करतो. इतर नशिल्या पदार्थांसारखे माणसाला आपल्या कह्यात ठेवते. ह्या बधिरतेच्या अंमलाखाली लोक ओढावलेल्या परिस्थितीचा कार्यकारणभाव तर्काच्या आधारे न शोधता, त्याला नशिबाचे भोग, पूर्वजन्मीच्या पापांचे फळ असे ठप्पे लावून मोकळे होतात. एकदा का तसे मानले तर, त्यातून बाहेर पडायची धडपड करायची नैतिक जबाबदारी ते सोडून देतात.

👉🏻वास्तविक पाहता न्याय-नीतिची चाड असणे, पर्यावरणाविषयी प्रेम असणे कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करणे, व्यवसाय/नोकरीशी इमानदार राहणे, आपले काम इमानेइतबारे करणे अशा गोष्टींसाठी तुम्ही धार्मिक असण्याची किंवा देव मानण्याची गरज नसते. त्यामुळे, पापाच्या भीतीने किंवा स्वर्गाच्या लालसेने काही शिकविण्यापेक्षा, इतरांनी आपल्यासोबत जसे वागावे वाटते, तसे आधी आपणही इतरांसोबत वागले पाहिजे, अशा सोप्या पद्धतीने आपण मुलांना शिकवू शकतो.

👉🏻जगण्याच्या वाटेवरच्या सगळ्या असुरक्षिततांचे सतत भांडवल करत, श्रद्धेच्या गोंडस नावाखाली वाढणाऱ्या प्रकारांना आपण भुलता कामा नये. 'खतरे में' किंवा 'गर्व से कहो', ह्यांना भीक घालणे बंद केले पाहिजे. पुण्य, स्वर्ग, मोक्ष असल्या श्रद्धेय व्यसनांच्या आहारी जाऊन, सतत कसल्या न कसल्या भीतीला बळी पडत जाणे टाळता यायला हवे. दुःखे, संकटे, आजार जीवनाचे अविभाज्य भाग आहेत आणि ते येणारच. वैज्ञानिक प्रगतीमुळे यातील बऱ्याच गोष्टी कमी केल्या आहेत. देव-धर्म, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, पूर्वजन्मीचे संचित असल्या भ्रामक गोष्टींशी त्यांचा संबंध नाही. माणसांनी स्वतःच्या अविवेकीपणामुळे त्यात भर घालता कामा नये. इथून पुढे आपल्याला लहानपणापासूनच मुलांना विवेकवाद कसा शिकवायचा यावर विचार करावा लागणार आहे. श्लोक / शुभंकरोती / प्रार्थना /कलमा म्हणणे म्हणजे संस्कार, ह्या भ्रमातून लोकांना बाहेर काढून नैतिकतेला धार्मिकतेपासून वेगळे करावे लागणार आहे. तोच कट्टरता कमी करण्याचा उपाय आहे आणि तीच प्रगतीची दिशादेखील आहे.

👉🏻जी गोष्ट अस्तित्वात आहे त्यालाच सिद्ध करता येते, जी गोष्ट अस्तित्वात नाही त्याला सिद्ध करता येत नाही' आणि 'जो दावा करतो, तो दावा सिद्ध करायची जबाबदारी त्याचीच असते.

👉🏻खचर्चाचे सोडा पण किमान आपला स्वाभिमान टिकवण्यासाठी तरी माणसाने दगडाच्या मुर्तीसमोर डोके टेकवत फिरू नये असे वाटते. आई-वडील जन्म देतात, संगोपन करतात आणि माणसाने श्रद्धा ठेवायची ती स्वतःच निर्माण केलेल्या ह्या मूर्तीची? हा विरोधाभास मनाला छळतो.

👉🏻हे जग एका देवाने निर्माण केले असेल तर, दुसऱ्या देवाचे भक्त त्याने निर्माण कसे होऊ दिले? हा प्रश्न लोकांना का पडत नाही, हे मला आजवर कळलेले नाही. संपूर्ण विश्व निर्माण करणारा एक देव असता तर, त्याने वेगवेगळे धर्म, जाती, पंथ निर्माणच होऊ दिले नसते. त्याने विश्व निर्माण केले आहे, तर प्राणीसुद्धा निर्माण केले आहेत. कोणत्याही देवळात न जाता, कोणत्या देवाची आराधना न करता प्राणी त्यांचे जीवन जगतात तर मानव का नाही?

👉🏻देवावरच्या श्रद्धेमागे दोन मुख्य कारणे असतात. एक भीती आणि दुसरी लालसा. 

👉🏻देव मानायला जास्त काही बुद्धी वापरावी लागत नाही. मूर्ती दिसेल तिथे माथा टेकवावाचा, बस्स. तार्किक बुद्धी वापरावी लागते, ती नास्तिक बनायला.

👉🏻ईश्वर हा वर आकाशात कुठेतरी बसला आहे, तो खूप दयाळू आहे, न्यायी आहे, पूजापाठ, होमहवन, मंत्रोच्चार केल्याने, पोथ्या वाचल्याने तो प्रसन्न होतो आणि भक्तांच्या अडचणींचे निवारण करतो, इच्छा पूर्ण करतो, निपुत्रिकांना संतान देतो. थोडक्यात देवाला सौदेबाजी मान्य आहे.

👉🏻खरेतर नास्तिक लोक देवाला नाकारतात, असे म्हणण्यापेक्षा देवाच्या कल्पनेला नाकारतात असे आपण म्हटले पाहिजे. कारण देव ही कल्पनाच आहे, प्रत्यक्षात तो नाहीच.

👉🏻नकळत्या वयात, न मागता आणि कसलेही विशेष प्रावीण्य नसताना सहज मिळालेली बाब म्हणजे धर्म आणि धार्मिक संस्कार, असे माझे मत बनलेले आहे.

👉🏻कधीतरी मानवाने ठरवले असणार, आज 'सोमवार' आहे; पण तेव्हा उद्याचा दिवस 'सोमवार', असे ठरवले असते तर, आज 'रविवार' असता. वारांसोबत जोडलेल्या श्रद्धा नाकारण्यासाठी इतका साधा तर्क उपयोगी पडला.

👉🏻मृत्यूनंतरचे (पारलौकिक) असे कोणतेच आयुष्य नसते, जे आहे ते आत्ता (भौतिक) जगात आहे, उपभोगतो आहोत तेच फक्त आयुष्य आहे. त्यामुळे भौतिक आयुष्यासाठी आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक आणि आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य द्यायला हवे, इतकी समज ह्या नास्तिक्याच्या प्रवासातून आली.

👉🏻 विचार करणे हेच माणूस असल्याचे पहिले लक्षण आहे.

👉🏻 उपहास किंवा अपमान करून अंधश्रद्धा दूर करता येत नाही.इतरांचा उपहास किंवा अपमान करून आपण लोकांना अंधश्रद्धेपासून र करू शकत नाही. तर त्यांच्याशी सन्मानाने आणि प्रेमाने वागूनच ही गोष्ट समजावणे शक्य आहे. तसे न झाल्यास लोक प्रथा, परंपरांना घट्टपणे कवटाळतात.

👉🏻शांतता, समृद्धी, विवेक ह्यांनी भरलेल्या जगात माणूस जगतो, तेव्हाच तो खऱ्या अथनि इतर प्राण्यांपासून वेगळा असतो.

👉🏻ह्या वाचनामुळे घरासमोरून जाणाऱ्या गणपतीच्या मिरवणुकीपेक्षा नासाचे वोयेजर अवकाशयान कुठपर्यंत पोहोचले असेल, हे जाणून घेण्यात अधिक रस वाटू लागला.

👉🏻देव ही दुसरे तिसरे काही नसून माणसाच्या मनातील भीतीच्या भांडवलावर उभी केलेली एक परिसंस्था आहे.

👉🏻घाबरलेल्याला अजून घाबरवून सोडणे हीच इथली गरजच आहे, हेही कळले.

👉🏻पूर्वी नियोजित काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्याचे ताण असल्यामुळे देव आठवायचा. आता पर्यायी योजना आखायची प्रेरणा मिळते. प्रसंगी अपयश स्वीकारायचीही मनाची तयारी होते.

👉🏻दया-क्षमा-शांती, तेथे देवाची वस्ती' 

👉🏻देवावर टीका करणाऱ्याला देव स्वतःच शिक्षा करेल याच्यावर विश्वास नसतो, म्हणून मग हे काम ते स्वतःच्या हातात घेतात.

👉🏻आपल्याकडे (१) बरेच लोक चिकित्सक नसतात. (२) जे चिकित्सक असतात, ते त्यांची चिकित्सकबुद्धी देवाधर्माच्या बाबतीत वापरत नाहीत. (३) जे थोडीथोडकी का होईना चिकित्सा करतात, त्यांच्यात निष्कर्ष स्वीकारायचा 'ठामपणा' असेलच असे नाही. (४) चिकित्सक आहे, निष्कर्ष स्वीकारायचा ठामपणाही आहे, मात्र समाजाच्या / व्यवसायाच्या/नोकरीच्या भीतीने, असुरक्षिततेमुळे स्वतःचे विचार ते स्वतः जवळच ठेवतात
एवढे सगळे फिल्टर्स ओलांडून, चिकित्सा + तर्कनिष्ठा ठामपणा + निर्भयता यांच्या जोरावर जे स्वतःला नास्तिक म्हणून घोषित करतात, ते अगदी नगण्य उरतात.

👉🏻अज्ञान स्वीकारणे हे 'जाणून घेण्याच्या' दिशेने पहिले पाऊल असते. त्यामुळे, आपल्याकडे एखाद्या गोष्टीचे प्रामाणिक उत्तर नसेल तर कोणत्याही अप्रमाणित व्याख्या आणि कथांवर विश्वास ठेवण्याऐवजी उत्तर नसल्याचा प्रामाणिक स्वीकार करणे चांगले.

👉🏻कोणतीच अदृश्य शक्ती आपल्याला तारू किंवा मारू शकत नाही आणि प्रत्येक गोष्टीमागे एक कार्यकारण भाव आहे, इतका साधा, सोपा विवेकवाद आपल्या समाजात का रुजला नाही?

👉🏻आज समाजामध्ये देवाधर्माची भीती आणि त्यातून होणारे अविवेकवादी वर्तन ह्या मानसिक आजारांवर काम करण्याची गरज आहे. प्रत्येक कुटुंबातील कोणत्यातरी एका पिढीला हे द्वंद्व लढावेच लागते. त्यातूनच भीतिमुक्त, निडर भारतीय समाज तयार होईल, जो कोणत्याही न्यूनगंडाने पछाडलेला नसेल.

👉🏻हॉलमध्ये बसण्यासाठी काहींना जागा मिळाली, काहींना नाही हे दैवी शक्ती ठरवते. कोणाचे लग्न झाले, कोणाचे नाही हे दैवी शक्ती ठरवते. हा काय खुळचटपणा आहे? त्या देवाला काही काम आहे की नाही? हे सगळे उद्योग करत दैवी शक्ती बसलीय, देव बसला आहे म्हणजे काय? आणि वैज्ञानिकदृष्ट्या हे खरे नाही, वैचारिकदृष्ट्या देखील हे खरे नाही. परंतु, ही लढाई समाज बदलण्याची आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...