मुख्य सामग्रीवर वगळा

मिथकांपासून विज्ञानापर्यंत - गौहर रझा (अनु - विक्रम) (मधुश्री पब्लिकेशन)

शालेय जीवनात विज्ञान शाप की वरदान? यावर निबंध लिहिलेला आठवतो. हा विषयच चूक आहे. आज माझ्या मनात विज्ञान हे वरदानच असल्याबद्दल कोणताही संशय नाही. विज्ञानाच्या मदतीने तंत्रज्ञान विकसित होतं. मानवी क्षमता उंचावण्याचे काम तंत्रज्ञान करतं. तंत्रज्ञान चुकीच्या कामासाठी वापरलं जाऊ शकतं. मग तंत्रज्ञानाचा दोष विज्ञानाच्या माथी का? ( मास्तरने शालेय जीवनातच हा पैलू लक्षात आणून द्यायला हवा होता, त्यावेळी साप्ताहिक पूजा घेण्यावर जोर दिला, मास्तर चुकलाच...असो )

विज्ञान हे विनम्र आहे. कोणतंही ज्ञान हे अंतिम सत्य आहे असा दावा विज्ञान करत नाही. पेनिसिलिन हे पहिलं प्रतिजैविक होतं. याच्या शोधासाठी फ्लेमिंगला नोबेल ही देण्यात आलं. यावर वैज्ञानिक थांबले नाहीत.त्यांनी प्रस्थापित झालेल्या ज्ञानावर शंका घेतल्या,संशोधन केलं, पुराव्यासहित नवीन विचार मांडला, कालांतराने पेनिसिलीनचा वापर थांबवण्यात आला. नवीन ज्ञानाचं विज्ञानात स्वागत होतं म्हणून विज्ञान विनम्र आहे.

तोराह, कुराण, बायबल यानुसार देवाने हे जग सहा दिवसात निर्माण केलं. वैदिक धर्माच्या मान्यतेनुसार ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. विज्ञान सांगत चौदा बिलियन वर्षापूर्वी विस्फोट होऊन हे ब्रम्हांड निर्माण झालं. विज्ञानाच्या मते सुरुवातीला एक पेशीय जीव आले, त्यांची उत्क्रांती होऊन बहुपेशीय सजीव आले. 

मिथकांपासून विज्ञानापर्यंत या पुस्तकात...

ब्रम्हांडाची निर्मिती कशी झाली?
सजीव सृष्टीची निर्मिती कशी झाली?
खगोलशास्त्राचा विकास कसा झाला?
विज्ञान आणि धार्मिक मान्यता यात काय फरक आहे?
आणि 
विज्ञान म्हणजे काय?

वरील प्रश्नांचा वेध गौहर रझा यांनी घेतला आहे. या प्रश्नांची संदर्भासहित वैज्ञानिक स्पष्टीकरणे पुस्तकात मिळतील. वैज्ञानिक संकल्पना सोप्या रीतीने समजावण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही ही माहिती किचकट वाटू शकते. पण या माहितीच्या खरेपणाविषयी शंका नाही. जिज्ञासा असल्यास ती आपण पडताळून पाहू शकतो. या माहितीच्या आधारे ज्ञान होतं. माहिती विसरली तरी आपल्याबरोबर ज्ञान राहणार आहे.

ब्रह्मांडाची निर्मिती,सजीव सृष्टीची निर्मिती या मागची वैज्ञानिक रचना समजल्यास धर्म, त्याचे ग्रंथ आणि सर्वशक्तिमान देव यांची विश्वासाहर्ता जाईल. यावर धंदा करणारे उपाशी मरतील. म्हणून तंत्रज्ञानाला आपलेसे करून विज्ञाना ला विरोध केला जातो.

धार्मिक द्वेष कमी होऊन जग अधिक सुंदर होण्यासाठी या चार प्रश्नांच्या उत्तराचं ज्ञान सर्वांना व्हावं, हे पुस्तक वाचणं त्या मार्गावरील एक पायरी आहे.

(विज्ञान 'का' चे उत्तर देतं नाही, 'कसं' यावर विज्ञान काम करते.)

💡पुस्तकातून......

💡 विज्ञान म्हणजे काय?

👉🏻विज्ञान हे निसर्गाच्या नियमांना समजून घेण्याच्या, त्यातली कोडी सोडवण्याच्या आणि रहस्यं उघडण्याच्या प्रयत्नांचं नाव आहे.
👉🏻विज्ञान हे आपल्या निष्कर्षांना वारंवार तपासून पाहण्याचंसुद्धा नाव आहे.
👉🏻विज्ञानात 'सत्यापेक्षा गरजेचा आहे तो सत्याचा शोध'. त्यामुळे विज्ञानात कधीही कायमचं सत्य असत नाही.
नम्रता आणि जिज्ञासा यांच्या सोबतीने नव्या सत्याचा अंगीकार करणं हाच तर विज्ञानाचा मार्ग आहे.


💡लोकायत तत्वज्ञान 

👉🏻प्रत्यक्ष बोध हाच सत्याला स्थापित करण्याचा आणि सत्य स्वीकारण्याचा एकमेव मार्ग आहे.
👉🏻जे इंद्रियांद्वारे अनुभवलं जाऊ शकत नाही किंवा समजून घेतलं जाऊ शकत नाही, ते अस्तित्वात नाही.
👉🏻जे-जे काही अस्तित्वात आहे; ते हवा, माती, आग आणि पाणी यांच्या निरीक्षण करता येण्याजोग्या तत्त्वांनी बनलं आहे.
👉🏻जीवनातली सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे आनंद ही आहे; एकमेव वाईट गोष्ट म्हणजे दुःख ही आहे.
👉🏻सुख मिळवणं आणि दुःखापासून दूर राहणं हाच मानवाच्या अस्तित्वाचा एकमेव उद्देश्य आहे.
👉🏻धर्म हा त्या ताकदवान आणि धूर्ताचा आविष्कार आहे, जो दुबळ्याची शिकार करतो.


💡बुद्धाच प्रसिद्ध वचन 

"कोणत्याही गोष्टीवर केवळ एवढ्यासाठी विश्वास ठेवू नका, की तुम्हाला ती कोणीतरी सांगितली आहे म्हणून. कोणत्याही गोष्टीवर केवळ यासाठी विश्वास ठेवू नका, की खूप लोक त्याबद्दल बोलत आहेत आणि आणि इतरांमध्ये ती गोष्ट पसरवत आहेत म्हणून. कोणत्याही गोष्टीवर केवळ एवढ्यासाठी विश्वास ठेवू नका, की ती तुमच्या धार्मिक पुस्तकांमध्ये लिहिली आहे म्हणून. कोणत्याही गोष्टीवर केवळ एवढ्यासाठी विश्वास ठेवू नका, की तुमच्या शिक्षकांनी आणि वडीलधाऱ्यांनी ती सांगितली आहे. परंपरांवर केवळ यासाठी विश्वास ठेवू नका, की त्या तुमच्यापर्यंत अनेक पिढ्यांपासून चालत आल्या आहेत. फक्त आणि फक्त, निरीक्षण केल्यावर आणि विश्लेषण केल्यावर जर तुम्ही तिच्या कारणाशी सहमत असाल आणि जर ती गोष्ट सर्वांच्या भल्यासाठी आणि फायद्यासाठी अनुकूल असेल, तरच तिला स्वीकारा आणि त्यावर अंमलसुद्धा करा."

💡डी डी टी 

वैज्ञानिकांनी 1939 मध्ये डी डी टी ( डायक्लोरो डायफिनेल ट्रायक्लोरोइथेन ) चा शोध लावला. हे अतिशय उत्तम कीटकनाशक होतं. 1950 60 च्या दशकात अनेक देशातल्या हरितक्रांतीमध्ये सुद्धा याची मोठी भूमिका राहिली.

पण वैज्ञानिक संशोधन हे थांबत नाही आणि स्वतःचेच निष्कर्ष ते वारंवार तपासून बघतं. 
डीडीटी या कीटकनाशकाच्या निर्बंध वापरामुळे किडीच्या उपजाती निर्माण होऊ लागल्या आणि कीटकनाशकाचा परिणाम कमी झाला. याशिवाय डीडीटी जर माणसाच्या शरीरात गेलं तर कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. हे वैज्ञानिकांना समजलं.

वैज्ञानिकांनी आपले निष्कर्ष नव्या वैज्ञानिक माहितीच्या आधारावर बदलले.

जे लोक स्वतःच्या धार्मिक पुस्तकांमध्ये आणि ग्रंथांमध्ये सगळं ज्ञान सामावलं असल्याचा दावा करतात किंवा भविष्य सांगतात, ते ना डीडीटीचा शोध लावू शकले, ना त्यामुळे होणाऱ्या कॅन्सरची भविष्यवाणी करू शकले. त्याचबरोबर ते स्वतःच्या धारणांवरती हट्टीपणाने अडून बसतात आणि बदलत्या माहितीनुसार आणि काळानुसार त्या धारणा ते बदलत नाहीत.

💡 विज्ञान मागे पडतं धर्म पुढे जातो असं का?

जन्माला आल्यापासून मरेपर्यंत, रोज सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्यावर धार्मिक संदेशांचा वर्षाव होत राहतो. धार्मिक संदेशांच्या ह्या वर्षावात विज्ञानाशी आपलं नातं हे तुटकतुटकच राहतं.

एका सर्वसाधारण कुटुंबात सकाळी डोळे उघडल्यावर घरातला कुणी ना कोणी सदस्य पूजाअर्चा करताना दिसतो, कुठूनतरी अजान किंवा भजनाचा आवाज येत असतो, टीव्हीवर कोणीतरी ज्योतिषी 'आजचा दिवस कसा जाईल' हे सांगत असतो, रस्त्यावरून जायला लागलात तर धार्मिक स्थळ दृष्टीस पडल्याशिवाय एक किलोमीटर अंतर पार करता येणं कठीण! माणसं त्या धार्मिक स्थळांसमोर डोकं टेकताना किंवा हात जोडताना रस्त्यांत दिसतात. जर शाळेत पोहोचलात, तर तिथे दिवसाची सुरुवात एखाद्या धार्मिक प्रार्थनेने किंवा धार्मिक भाषणाने होताना दिसते. जर एखाद्या ऑफिसात जावं, दुकानात जावं, तर धार्मिक स्थळांची चित्रं किंवा मूर्ती, बुवा-बाबांची पोस्टर्स दृष्टीस पडतात. एवढंच काय, तर विज्ञान-संशोधन संस्थांमध्ये आणि प्रयोगशाळांमध्ये देखील धार्मिक प्रतीकांची आणि चिन्हांची काही कमतरता नसते, इकडे-तिकडे नजरेस पडतातच. वैज्ञानिक संमेलनं आणि कार्यशाळासुद्धा सरस्वतीवंदना, गणेशवंदना किंवा कुराणाची तिलावत (कुराणपठण) यांसारख्या धार्मिक कार्यांनीच सुरू होतात.
मला खात्री आहे, की तुम्ही कोणत्याही धार्मिक स्थळावर बोधायन, आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य, आचार्य पी. सी. रे, जगदीश चंद्र बोस, सी. व्ही. रमण, मेघनाद सहा, होमी जहांगीर भाभा, शांतीस्वरूप भटनागर, विक्रम साराभाई यांच्यासारख्या कोणत्याच वैज्ञानिकाचं चित्र किंवा मूर्ती पाहिली नसेल, पण वैज्ञानिक संशोधन संस्थांमध्ये धार्मिक चित्रं आणि मूर्ती नक्की पाहिल्या असतील.

💡 पृथ्वीचे वय 4.5 बिलियन वर्ष आहे हा निष्कर्ष स्वीकारला तर काय होईल?
👉🏻 सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग,कलयुग अशा युगांच्या संकल्पना वरचा लोकांचा विश्वास उडून जाईल.
👉🏻 कोणत्यातरी महाशक्तीने सगळी सृष्टी सात दिवसात बनवली आहे यावरचा विश्वास उडून जाईल.

💡 हे विश्व सतत प्रसरण पावत आहे. ही वैज्ञानिक माहिती लोकांना समजली तर स्वर्ग नरक यावरचा लोकांचा विश्वास उडून जाईल. सात आसमान नसतात हे लोकांना समजेल.

💡सर्व सजीव सृष्टी ही हळूहळू उत्क्रांत झाली आहे हे जर लोकांना समजलं तर एक जात ब्रह्मदेवाच्या तोंडातून निर्माण झाली आहे.... अशा प्रकारच्या माहितीवर कोण विश्वास ठेवेन.
मग जातीव्यवस्थेचा सांगाडा उध्वस्त व्हायला सुरुवात होईल. 

💡 युरोपातील लोकांच्या त्वचेचा रंग गोरा असतो कारण त्यांच्यात मेलेनिन वर्णकाचं प्रमाण कमी असतं, अन्यथा आपल्या सर्वांचेच पूर्वज हे काळ्या रंगाचे होते. हे समजलं तर वंशवादाचे राजकारण कसे चालू शकेल?

💡 न्यूटनचे गतीविषयक नियम समजून घेतले तर कुणा बाबाच्या चमत्कारांवर विश्वास कसा ठेवू शकू?


💡पुस्तकातून 

👉🏻माझा अनुभव सांगतो, की जर आपलं म्हणणं नम्रपणे आणि सहजपणे मांडलं, तर सामान्य नागरिक भावनिक किंचाळी न मारता आपलं म्हणणं ऐकायला आणि त्यावर स्वतःचं मत व्यक्त करायला तयार असतो. हां, जे लोक ह्या मुद्द्यांवरून सत्तेचं राजकारण करत असतात, त्यांच्याकडून मात्र मला काहीही आशा नाही.

👉🏻NCERTच्या एका पाठ्यपुस्तकात अशी व्याख्या केलीय की - 'आपण ज्या दुनियेत राहतो ती दुनिया समजून घेण्याच्या उद्देशाने आणि विश्वातल्या रहस्यांची उकल करण्याच्या हेतूने विचार, निरीक्षण आणि कृती करण्याचा मार्ग म्हणजे विज्ञान.

👉🏻21वं शतक येईपर्यंत तर विशेषीकरण म्हणजे स्पेशलायझेशन इथेपर्यंत पोहोचलंय, की एका डिसिप्लिन किंवा सब-डिसिप्लिनमध्ये तज्ज्ञता असणाऱ्या शास्त्रज्ञाला दुसऱ्या एखाद्या डिसिप्लिनबद्दल फक्त वरवरची किंवा जवळजवळ शून्य माहिती असू शकते. उदाहरणार्थ, खगोलशास्त्रात तज्ज्ञता असणाऱ्या एखाद्या शास्त्रज्ञाला जैवतंत्रज्ञाना (biotechnology - बायोटेक्नोलॉजी) बद्दल फार काही विशेष माहिती नसू शकते.

👉🏻माझा हा अनुभव आहे, की सुनामी असो, भूकंप असो, सूर्यामध्ये होणारी काही उलथापालथ असो किंवा कोविड महामारी असो, लोक कोणत्याही वैज्ञानिकाला त्याच्याकडून/तिच्याकडून माहिती जाणून घ्यायला संपर्क करतात आणि अशी अपेक्षा ठेवतात, की तिच्याकडे सर्व विषयांची अचूक वैज्ञानिक माहिती असेल. त्यांच्यासाठी हे समजून घेणं अवघड असतं, की वैज्ञानिक हा धर्मगुरू, ज्योतिषी, राजकारणी यांच्यासारखा नसतो. त्या लोकांकडे कोणत्याही विषयाच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तयार असतं, पण वैज्ञानिकाला हे सांगावं लागतं, की मला विज्ञानाच्या ह्या विशिष्ट विषयाबद्दल किंवा डिसिप्लिनबद्दल काही माहिती नाहीये. विज्ञानाचा हा पैलूसुद्धा विज्ञानाची नेमकी व्याख्या ठरवण्याच्या मार्गातला एक मोठा अडथळा आहे.

👉🏻एका खास कसोटीवर तावूनसुलाखून घेतलेली माहितीच 'सत्य' असते.

👉🏻'विज्ञानात असा कोणताही दावा, जो चुकीचा सिद्ध होण्याची अर्हता स्वतःमध्ये बाळगून नसेल, त्याला 'वैज्ञानिक दावा' म्हणता येणार नाही.
देव, अल्लाह किंवा गॉड ह्या संपूर्ण सृष्टीला चालवतो आणि प्रत्येक व्यक्तीचं नशीब तो ठरवतो' ह्या दाव्याला ना चूक सिद्ध करता येतं ना बरोबर, त्यामुळे 'असा कुणी देव असतो का की जो ह्या संपूर्ण सृष्टीला चालवतो?' हा विज्ञानाचा प्रश्न नाही. हे सारे दावे आस्थेच्या कक्षेत येतात. जर तुमचा विश्वास असेल तर हे सारे दावे बरोबर आहेत आणि विश्वास नसेल तर चूक. ही एक परिकल्पना नक्कीच असू शकते, पण सिद्धान्त बनण्याची (म्हणजे बरोबर किंवा चूक सिद्ध केलं जाण्याची) क्षमता त्यात नाही. हां, जर कुणी असा दावा करत असेल, की 'पृथ्वी ही देवाच्या मर्जीने फिरत असते आणि तो तिला आपल्या मर्जीनुसार कधी पूर्वेकडून पश्चिमेकडे तर कधी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरवत राहतो' तर मग हा दावा वैज्ञानिक संशोधनाच्या कक्षेतला असेल. ह्या दाव्यात चुकीचा सिद्ध होण्याची आणि बरोबर सिद्ध होण्याची समसमान संभावना आहे. त्यामुळे अशी कोणतीही परिकल्पना जिला कधी चूक सिद्ध करता येऊ शकत नाही, ती विज्ञानाच्या कक्षेच्या बाहेर असते. कार्ल पॉपरच्या मते, अनुभवजन्य मिथ्याकरण (falsification - फॉल्सिफिकेशन) हे विज्ञानाच्या व्याख्येचं एक आवश्यक अंग आहे. म्हणजे जर दावा चुकीचा सिद्ध केला जाण्याची काही शक्यता त्या दाव्यात नसेल, तर तो दावा हा वैज्ञानिक दावा नसतो.

👉🏻 जेव्हा मी विज्ञान म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ तंत्रज्ञान अजिबात नाही.

👉🏻तर्क हा ज्या कसोटीवर पारखून पाहिला गेला, त्या कसोटीचा उल्लेख केल्याशिवाय त्या तर्काला कोणतीही मान्यता किंवा महत्त्व असत नाही. 

👉🏻सामान्य नागरिकांच्या नजरेत विज्ञान म्हणजे 'सत्याचा शोध' आहे, 'आकड्यांवर आधारित माहिती' आहे, 'परीक्षण' आहे, 'काही नवं शोधून काढण्यासाठीचा उपक्रम' आहे, 'एका ठरावीक प्रक्रियेने केलेली तपासणी' आहे, 'जिज्ञासा' आहे, 'निसर्गात ज्या काही घडामोडी घडत असतात, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न' आहे, 'ब्रह्मांडाला समजून घेण्याचा मार्ग' आहे, 'पारखून घेतल्याशिवाय एखाद्या गोष्टीचा स्वीकार न करणं' आहे, 'प्रश्न विचारून, एका ठरावीक पद्धतीने तपासणी करून, एखाद्या निष्कर्षाप्रत पोहोचणं' आहे आणि ही सगळीच उत्तरं बरोबर आहेत.

👉🏻जेव्हा कुणीतरी अशी अंधश्रद्धा पसरवतं, की 'गाय श्वासोच्छवास करताना ऑक्सिजन आत घेते आणि बाहेर सोडतेदेखील ऑक्सिजनच'; तेव्हा अशा व्यक्तीने विज्ञानाशी तडजोड आधीच केलेली असते. ती व्यक्ती, 'सगळे जीव जिवंत राहण्यासाठी श्वसन प्रक्रियेत ऑक्सिजन आत घेतात आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतात', या वैज्ञानिक माहितीचा वापर करत असते. ही माहिती आपल्यापर्यंत विज्ञानातल्या संशोधनामुळेच पोहोचली आहे आणि याच माहितीचा वापर करून अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. म्हणजे विज्ञानाशी तडजोड केल्याशिवाय आजच्या काळात अंधश्रद्धा पसरवणंसुद्धा अशक्य झालं आहे.

👉🏻 विज्ञानाच्या तुलनेत तंत्रज्ञानाशी मैत्री करणं सोपं असतं.

👉🏻कोणतंही 'ज्ञान' हे जर वैज्ञानिक पद्धतीचा वापर न करता मिळवलं गेलं असेल, तर त्याला विज्ञानाच्या कक्षेत ठेवलं जाऊ शकत नाही. फक्त अनुभवांतून किंवा अभ्यासातून मिळवलेलं ज्ञान हे तोपर्यंत विज्ञानाच्या कक्षेबाहेर असतं, जोपर्यंत ते वैज्ञानिक पद्धतीच्या कसोटीवर पारखून घेतलं जात नाही (युनानी, सिद्ध, आयुर्वेद यांना अनुभवात्मक ज्ञान असं तर म्हटलं जाऊ शकतं, पण विज्ञान नाही; आणि ज्योतिष, रेकी, फेथ हिलिंग वगैरे तर या कक्षेच्याही बाहेर आहेत)

👉🏻माणसांना देवतांच्या सेवेसाठी त्यांचा आदेश पाळण्यासाठीच निर्माण केलं गेलं आहे' हा विचार, त्याच समाजात निर्माण होऊ शकत होता, की ज्यात कामांचं, संपत्तीचं आणि जातींचं विभाजन होऊन गेलं असेल.

👉🏻विज्ञान हे वैज्ञानिक तर्क आणि पुरावे यांच्यावर टिकलं आहे आणि धर्म हा श्रद्धा आणि आस्था यांच्यावर. माणूस आस्थेचा आधार तेव्हाच घेतो, जेव्हा त्याच्याकडे वैज्ञानिक माहिती नसते.

👉🏻धर्मांमध्ये असत्यीकरणाचा कोणताही सिद्धान्त नसतो. हजरत ईसा हे देवाचा पुत्र होते, हजरत मोहम्मद हे मेराजच्या रात्री स्वर्गापर्यंत गेले, जिथे त्यांची भेट कित्येक नबींशी (अल्लाचे संदेशवाहक) झाली (याचा उल्लेख आपल्याला अल-तबरी, अल-बुखारी आणि अल इब्ने इसहाकच्या पुस्तकांमध्ये मिळतो, कुराणात उल्लेख आहे, पण तपशील नाही) किंवा भगवान राम हे अयोध्येत जन्माला आले आणि त्यांना वनवास घडला (ज्याचा उल्लेख आपल्याला वाल्मिकी रामायण, स्कंदपुराण आणि अयोध्या विवादावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयांमध्ये मिळतो) या गोष्टींना चुकीचं सिद्ध करायला काही वाव नाही. इथे प्रश्न विश्वासाचा आणि आस्थेचा आहे आणि तोच विश्वासाचा आधारसुद्धा आहे. या कथांमध्ये विज्ञानाचा दावा बनण्याची क्षमता नाही.

👉🏻विज्ञानामध्ये मोठ्या-मोठ्या कुशाग्र मेंदूंनी जर चुका केल्या, तर ते स्वतः आपली चूक मान्यसुद्धा करतात किंवा पुढे येणाऱ्या पिढ्या त्या चुका सुधारतात. धर्मामध्ये अशा कोणत्याही सुधारणेची शक्यता नसते.


👉🏻विज्ञानामध्ये विरोध प्रकट केल्यावर कोणताही रक्तपात होत नाही, याउलट जर कोणी जुन्या धारणांना चुकीचं सिद्ध केलं, तर आनंद साजरा होतो. असं करणाऱ्याला पुरस्कार देऊन सन्मान दिला जातो. विज्ञान हे वादावादीशिवाय प्रगती करू शकत नाही. तुम्ही हे कधीही ऐकलं नसेल की न्यूटनला मानणाऱ्यांनी, आइन्स्टाईनला मानणाऱ्यांसोबत हाणामारी केली किंवा त्यांची घरं जाळली. विज्ञानात प्रत्येक वादविवाद हा सभ्यपणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या कक्षेत राहूनच केला जातो, चुकांवर न संकोचता गरमागरम वादविवाद होतात, मांडलेल्या तर्काच्या प्रत्येक कमजोरीवरती, भावना न भडकवता बोट ठेवलं जातं आणि त्यानंतर मग जे विज्ञानाच्या कसोटीला पात्र ठरेल, ते मान्य केलं जातं.

👉🏻विज्ञानात, प्रश्न विचारणं हे ज्ञानाच्या सीमारेषेला स्पर्श करण्याच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल तर असतं, पण उत्तरं शोधण्यासाठी खूप अंतर चालून जावं लागतं.

👉🏻प्रजातींच्या उत्क्रांतीचा सिद्धान्त हे अजिबात म्हणत नाही, की माणूस हा माकड, गोरिला किंवा ओरांगउटानपासून बनला आहे.

👉🏻इतिहास सांगतो, की माणसाच्या विचारांचं आणि त्याच्या आसपास पसरलेल्या भौतिक वास्तवाचं एकमेकांशी घट्ट नातं असतं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...