मी नुकताच रायलिंग पठारावर गेलो होतो. समोरच मनात धडकी भरवणारा नितांत सुंदर लिंगाणा होता. माझ्या शेजारी बसलेले तरुण फोटो आणि शॉर्ट व्हिडिओ काढण्यात व्यस्त होते. बाहुबली चे गाणे टाकून रील इन्स्टा वर टाकणार असं म्हणाले. समोर असणारं निसर्गसौंदर्य अनुभवायचे सोडून खूप like मिळतील, त्यांची जळेल अशा आशयाची त्यांची चर्चा सुरु होती.
इन्स्टा,फेसबुक, व्हाट्सअप स्टेटस यावर असणारे लाईक बटन याची नशा वाईट आहे.
समाज माध्यमात रील,फोटो टाकून आपण नेमकं काय साध्य करतोय? इतरांचं अटेंशन मिळवून नेमकं काय साध्य करायचंय? निराशेच्या गर्तेत जाण्याची ही लक्षण आहेत.
आपण जितका जास्त वेळ समाज माध्यमांवर घालवू तितका कॉर्पोरेट कंपन्यांचा प्रॉफिट वाढणार आहे , चंगळ वाद वाढणार आहे. आपल्या आवडीनिवडी सर्व डाटा मिळवला जातोय, जाहिरात कंपनींना विकला जातोय. यासाठी वापरकर्त्याला स्क्रीन टाइम ची लत लावली जातेय.
सिगारेटची, तंबाखूची, पान मसाल्याची चटक वाढावी म्हणून कंपन्यांकडून उपाययोजना केल्या जातात. तसंच इंस्टाग्राम, फेसबुक, you tube ... इत्यादी समाज माध्यम आपल्या लाईक, स्क्रीन टाईम नुसार नवनवीन व्हिडिओ सुचवत राहतात. आपल्याला स्क्रीनची लत लावून नफा कमवतात, आपण प्रॉडक्ट झालो आहोत.
कोणी म्हणेल निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य तर वापरकर्त्याला आहे ना? माझ्या मते नाही...
वापरकर्त्याला ट्रॅप मध्ये अडकवण्यासाठी अब्जावधी रुपये खर्च करून तंत्रज्ञ नेमलेत. समाज माध्यम ही अटेंशन इकॉनोमी आहे. कंपनी आपल्या मानसिक दुर्बलतेचा फायदा घेते.
व्यसनाधीन पदार्थ, ड्रग्ज निर्माण करून नफा कमवणारे आणि समाज माध्यमांचे निर्माते यांच्या मनोवृत्तीत फरक नाही.
आपल्या प्रत्येक क्लिक वर, कोणत्या स्क्रीनवर किती वेळ थांबला, काय सर्च केलं... या प्रत्येक बाबीची नोंद घेतली जात आहे. या मिळणाऱ्या डाटातून खास तुमच्यासाठी अल्गोरिदम काम करतो. या अदृश्य राक्षसाचे स्वरूप समजून घेणे त्यांच्या ट्रॅपमध्ये न अडकण्यास मदत करू शकत.
👉🏻 डिजिटल मिनिम्यालिजम म्हणजे काय?
👉🏻 समाज माध्यमे आपल कशाप्रकारे नुकसान करतात?
👉🏻 मोकळ्या वेळेचं नेमकं काय केलं पाहिजे?
👉🏻 एकांत वास का आवश्यक आहे?
👉🏻 डिजिटल डिक्लटर होण्याची गरज का आहे आणि त्याची पद्धत कोणती?
जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा. या पुस्तकासाठी वेळ, पैशाची केलेली गुंतवणूक नक्की सार्थकी लागणार आहे.
आपण आपले आयुष्य नीटपणे जगू शकलो नाही अशी खंत आयुष्याच्या अखेरच्या क्षणात नको असेल तर कॅल न्यू्पोर्ट लिखित Digital minimalisam
(गोंगाटाणे भरलेल्या जगात गुणवत्तापूर्ण जीवन जगण्याची निवड) नक्की वाचा.
" आता साधा फोन परत आणण्याची वेळ आली आहे. "
💡पुस्तकातून
👉🏻 आपण आपली मूल्य ठरवली पाहिजेत. समाज माध्यम वापरताना या मूल्यांचा विसर पडू द्यायचा नाही.
👉🏻 अनावश्यक डिजिटल सक्रियता महागडी ठरते.
👉🏻 समज माध्यम वापरताना स्पष्ट हेतू समाधान प्रदान करतो.
👉🏻 तंत्रज्ञानाशी संबंधित आपले नियम निश्चित करा. तीस दिवसांचा ब्रेक घ्या. आपल्या जीवनात तंत्रज्ञानाचा पुन्हा समावेश करा.
👉🏻इंटरनेटवरील (ऑनलाइन) संताप आणि आक्रोशाचे वर्चस्व हे एका अर्थाने या प्लॅटफॉर्मचे एक अपरिहार्य वैशिष्ट्य आहे लक्ष वेधून घेण्याच्या या खुल्या बाजारपेठेत सकारात्मक आणि रचनात्मक विचारांपेक्षा नकारात्मक भावना अधिक लक्ष वेधून घेतात. इंटरनेटचा अधिक वापर करणाऱ्या लोकांचा या नकारात्मकतेशी नियमित सामना होतो आणि त्यातून वापरकर्त्याची सकारात्मकता कमी होऊन नकारात्मकतेची भावना वाढीस लागते. अनेकांना अनिवार्य स्वरूपात सततच्या ऑनलाइन व्यग्रतेसाठी मोजाव्या लागणाऱ्या मोठ्या किमतीची जाणीवही होत नाही.
👉🏻या साधनांचा गरजेपेक्षा अधिक वापर हा केवळ एखाद्या व्यसनाप्रमाणे नसून तो शिणवणारादेखील आहे. ही डिजिटल साधने आपली स्वायत्तता आणि समाधान हिरावून नकारात्मक प्रवृत्तींना चालना देण्यात आणि जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींपासून आपले लक्ष विचलित करण्यासही सक्षम आहेत.
👉🏻तंत्रज्ञानाच्या वापरात कमीत-कमी वेळ खर्च करणे, हीच आजच्या हायटेक जगातील प्रगतीची खरी गुरुकिल्ली असल्याचे त्यांना उमगले आहे.
👉🏻समाजमाध्यमांच्या सम्राटांनी स्वतःला एक चांगलं जग निर्माण करण्यासाठी काम करणारे परोपकारी निर्माते म्हणून भासवणं बंद करावं आणि ते मुलांना व्यसनाधीन करणारी उत्पादनं विकणारे टी-शर्टमधील तंबाखूचे शेतकरी आहोत, हे मान्य करावं. कारण आपल्याला समाजमाध्यमांवर मिळणारे 'लाइक्स' तपासणं, हा धूम्रपानाचाच नवा प्रकार आहे.
👉🏻नवे अॅप किंवा डिजिटल सेवेच्या छोट्या लाभांकडे आकर्षित होणे आणि नंतर आपल्या जीवनातील सर्वांत मौल्यवान संसाधन असलेला वेळ त्यावर घालवून त्याचे महत्त्व विसरणे खूप सोपे आहे.
👉🏻आपण आपल्या जीवनातील मिनिटांकडे एक ठोस आणि मौल्यवान संसाधन म्हणून बघायला हवे. ते निश्चितपणे एक महत्त्वाचे संसाधन आहे.
👉🏻 जगात रहा पण त्याच्या आधीन होऊ नका.
👉🏻 निर्णयाच्या परिणामाणपेक्षा योग्य व स्पष्ट हेतूने निर्णय घेणे अधिक महत्त्वाचे ठरते.
👉🏻एखाद्या तंत्रज्ञानाचा अवलंब न केल्याने गमावल्या जाणाऱ्या लाभांपेक्षा तंत्रज्ञानाच्या जाणीवपूर्वक आणि विशिष्ट हेतूने केलेल्या वापरातून मिळणाऱ्या लाभांना प्राधान्य देणे, हा तंत्रज्ञानाशी निगडित अॅमिश तत्त्वज्ञानाचा गाभा आहे.
👉🏻 तंत्रज्ञानाशी संबंधित आपले नियम निश्चित करा.
👉🏻 30 दिवसांचा ब्रेक घ्या.
👉🏻 असामान्य जीवन जगण्यासाठी आपल्या मेंदूला एकांताचे क्षण प्रधान करणे अत्यंत आवश्यक आहे.
👉🏻"आणि त्या क्षणाला मला वाटले की मला माझ्या अंतर्मनाचा आवाज ऐकू येतोय, 'मार्टिन ल्यूथर, सदाचारासाठी उभा राहा...
न्यायासाठी उभा राहा... सत्यासाठी उभा राहा...'
👉🏻'स्वतःच्या विचारांसह एकटे आणि शांत राहण्यास अक्षम असणे, हे मानवतेच्या सर्व समस्यांचं मूळ आहे.
👉🏻माणूस म्हणून आपला उत्कर्ष साधण्यासाठी एकांत आवश्यक आहे. मात्र, आपल्या जीवनातील हा महत्त्वाचा घटक आपण अलीकडच्या काळात आपल्या जीवनातून नकळत वजा करत आहोत.
👉🏻आपल्याला एकटेपणा जाणवतोय? कदाचित यामागे समाजमाध्यमांवर अवाजवी वेळ घालवणे हे कारण असू शकेल'.
👉🏻स्टीव्ह जॉब्स यांनी भलेही आयफोनचा शोध लावला असेल, पण ते महत्त्वाची नाती टिकवण्यासाठी छोट्या-छोट्या डिजिटल संवादांचा आधार घेणारे व्यक्ती नव्हते.
👉🏻चिंतनशील जीवनच सर्वोत्तम आणि सर्वात सुखद जीवन आहे.''हे जीवन सर्वांत आनंदी जीवनदेखील असेल.
👉🏻इतरांचा एखादा खेळ पाहण्यात कसा काय आनंद मिळू शकतो, हे मला कधीच कळलं नाही. पर्यटनस्थळांचे आकर्षणही मला सहन होत नाही. मी समुद्रकिनारी जाऊन बसत नाही. पण, तेथे बसून वाळूचा मोठा किल्ला बनवावा लागला तर गोष्ट वेगळी आहे. सेलिब्रिटी आणि राजकारणी काय करताहेत, हे जाणून घेण्यातही मला रस नाही. या साऱ्या गोष्टींपेक्षा एखाद्या गोष्टीच्या निर्मितीत मला समाधान मिळते, असे मला वाटते. अधिक चांगल्या पद्धतीने नमूद करायचे झाले तर समस्यांवर उपाय शोधणे आणि गोष्टी सुधारणे मला अधिक आवडते.
👉🏻मोकळ्या वेळेबाबतचे आपले विचार आणि तत्त्वज्ञान ते अशा प्रकारे मांडतात : "आपण मला एक दिवसासाठी मोकळे सोडल्यास... मी सुतारकाम, शारीरिक व्यायाम किंवा लेखन करून, म्युझिक स्टुडिओत वाद्ययंत्रे वाजवून, विविध कामांची यादी तयार करून ती सारी पूर्ण करण्याचा आनंद घेत राहीन.
👉🏻अवजारे हाती घेऊन त्याद्वारे एखादी वस्तू तयार करणे, ही लोकांची स्वाभाविक इच्छा असते. आपल्या मनात सार्थकतेची भावना निर्माण होण्यासाठी ते आवश्यक असते.
👉🏻उत्तम लाकडी बेंच तयार केल्याबद्दल प्रशंसा मिळवण्याऐवजी किंवा संगीताच्या मैफलीत उत्तम प्रदर्शन केल्याबद्दल टाळ्या मिळवण्याऐवजी, आता आपण 'लाइक्स'च्या आशेने लोकप्रिय रेस्टॉरंटमधील जेवणाचा फोटो शेअर करू शकता किंवा पोस्ट केलेल्या एखाद्या हुशार टिप्पणीवरील रिट्विट हताशपणे तपासू शकता. परंतु, क्रॉफर्ड सूचित करतात त्याप्रमाणे, मान्यता मिळवण्यासाठी हस्तकौशल्याप्रमाणे लक्ष वेधून घेण्यासाठीच्या डिजिटल प्रयत्नांना कोणत्याही भक्कम गोष्टींचा आधार नाही, ज्या भौतिक जगात मूर्त आणि टिकाऊ असे काहीतरी करण्यासाठी आवश्यक आहेत. त्यामुळे मान्यता मिळवण्यासाठी होणारे हे प्रयत्न अनेकदा हस्तकौशल्याच्या माध्यमातून मिळणाऱ्या मान्यतेच्या तुलनेत फिके पडतात आणि म्हणूनच ते 'अपरिपक्व पद्धतीने फुशारकी' मारल्याप्रमाणे दिसायला लागतात. कौशल्य आपल्याला या उथळपणापासून दूर ठेवते आणि त्याऐवजी कार्यपूर्तीची अर्थपूर्ण भावना आपल्या मनात निर्माण करते.
👉🏻 आपण आपल्या मोकळ्या वेळेसाठी एक रणनीती तयार करावी.
👉🏻 आपल्या फोन मधून समाज माध्यमे हद्दपार करा.
👉🏻ब्रेकिंग न्यूज ही सहसा कमी दर्जाचीच असते. एखाद्या घटनेची संपूर्ण माहिती गोळा करून पत्रकारांनी केलेले सविस्तर वार्तांकन हे ब्रेकिंग न्यूजपेक्षा अधिक दर्जेदार असते.
👉🏻 स्मार्ट नव्हे साधा फोन बाळगा.
👉🏻आपण कोणती उपकरणे वापरायची, ती का वापरायची आणि कोणत्या अटींवर त्यांचा वापर करायचा, हे पूर्ण आत्मविश्वासाने आपल्याला ठरवता आले पाहिजे. असे करणे प्रतिगामीपणाचे नसून शहाणपणाचे आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा