मुख्य सामग्रीवर वगळा

वारी - व्यंकटेश माडगूळकर





जांभळाचे दिवस, जंगलातील दिवस हे व्यंकटेश माडगूळकर यांचे अनुभव कथन मला फार आवडले. बनगरवाडी ही कादंबरी सुद्धा लाजवाब आहे. वारी हा कथासंग्रह सुद्धा आवडला. पण यात बऱ्याच गोष्टी खटकल्या सुद्धा....त्यांनी जातीआधारित त्यांचे निरीक्षण नोंदवले. कदाचित नेणिवेतून आले असेल, नक्की कस सांगणार??? पण वाचकाने भान न ठेवल्यास गावगाडा, बारा बलुतेदार थोडक्यात नेमाडे सांगतात तो देशीवाद हे चांगले पर्याय होते /आहेत अशी जाणीव / नेणीव नकळत विकसित होऊ शकते. खूप सावध राहून वाचलं पाहिजे.

बहुजनांनी Fiction लिहिलं पाहिजे असं अविनाश (ठसन, पतेली या कादंबऱ्याचे लेखक) का म्हणतात हे "वारी" च्या वाचनाने प्रकर्षाने जाणवलं.

💡वारी 

या कथेत अर्जुन म्हातारा महार समाजाचा दाखवलाय, त्याचा मुलगा मिळेल तो भाकर तुकडा घेऊन जगतोय.
अर्जुन हा वयोवृद्ध म्हातारा पंढरपूरला जाण्याची आस लावून बसला आहे. मुलगा, सून यांना त्याची घालमेल पाहवत नाही. शेवटी अर्जुन पंढरपूर ला जातो. पण चोख्याच्या पायरीवरूनच परत येतो.
पांडुरंगाच्या देवळात जाऊन दर्शन न घेता परत येतो. तो म्हणतो...
"सरकारनं आमा लोकास्नी तुज्याशी जान्यास परवानगी दिली हे खरं. जानारे जातील; पन देवा, मी मातुर येनार न्हाई. मी माझी पायरी सोडनार न्हाई. वाडवडील वागत आलं, तसाच मी बी वागंन. देवा इटुबाराया, ह्यो बाटलेला धी घेऊन तुज्या देवळात येनार न्हाई. देवा, आपली लायखी न्हाई."

पांडुरंगाच्या मंदिरात सर्व जाती-धर्माच्या लोकांना प्रवेश मिळावा यासाठी साने गुरुजींनी उपोषण केलं, सरकारने कायदा केला. या गोष्टीला ब्राह्मण्यवादी लोकांचा विरोध होता. त्यांनी विठ्ठलाच्या मूर्तिचे तेज बंदिस्त करून दुसरीकडे नेल्याचा आवही आणला होता. या मनुवादी विचारांचा पोटशूल आजही ठणकत असतो.

याआधी मी ही कथा वाचली होती, मला आवडलेली. आज पुन्हा वाचली आणि मला यामध्ये कावा दिसू लागला. सरकारने कितीही कायदे करू द्या, संविधानाने कितीही अधिकार देऊ द्या तुम्ही जुन्या रूढी तोडू नका हे अर्जुन म्हाताऱ्याचा माध्यमातून बिंबवल जात आहे असं मला वाटतंय.

कलमकसाई यांचा सांस्कृतिक दहशतवाद मोडून काढण्यासाठी बहुजन समाजानं Fiction लिहिलं पाहिजे.

💡वाटसरू 

निबीड अरण्य, मुसळधार पाऊस, दूरदूर मानवी वस्ती नाही. तो वाटसरू एका झोपडीत निवारा मागतो. वाटसरू हा फौंजदार असतो.
तो सापळा होता भाल्या दरोडेखोर ला पकडण्यासाठी. 
गोष्ट भारी लिहिली आहे, वाचक दंग होऊन जातो.(भाल्या दरोडेखोर धनगर होता हे नोंदवायला लेखक विसरत नाही.)

💡नगरी 

गावापासून तालुक्याच्या ठिकाणी जायला पायी जाणे किंवा घोडा हेच पर्याय होते. काही काळाने मोटार गाडी सुरु होते. ड्राइव्हर, क्लीनर गावच्या गरजा समजून घेत नाही, चाराने आठाणे कमी असतील तरी गाडीतून उतरवायचे. जोतिबा पाटील याच्या शेतातून भुईमूगच्या शेंगा उचलून त्यालाच धक्काबुक्की केली.दादू लोहाराला एक चवली कमी म्हणून गाडीतून उतरवले. गावच्या पोरांची पोलिसात फिर्याद दिली....
थोडक्यात त्यांनी फार फार माज केला.
मोका बघून मोटारवाल्याला झोका द्यायचा विचार गावकऱ्यांच्या मनात होताच..
गावाकऱ्यांनी वेळ साधून टप्प्यात त्यांचा कार्यक्रम केला. याची ही कहाणी वाटू शकते. कथे चा मूळ उद्देश गावगाडा ची उपयोगिता, उदात्तीकरण करणे हा आहे. (माझ्या मते )

💡तळ्याच्या पाळी 

दुष्काळ ग्रस्त गावाचा कायापालट त्या तळ्या मूळ होतो. गावाला आलोच आहे तर ते तळं पाहून जाव, या विचाराने तो निघतो. त्या तळ्याच्या निर्मितीत त्याचा आज्जा, बाप यांनी (पगार घेऊन ) सुपर्रवाईझर म्हणून काम केल होत.

तळ्यावर त्याला पिकलेला म्हातारा भेटतो. म्हातारा कुठला अशी चौकशी तो करतो... म्हातारा तळ्याकडे बोट दाखवतो.म्हाताऱ्याचे गाव, गावची चावडी, घर, गोठा ..... सर्व सर्व त्या तळ्यात गुडूप झालेलं होत.

सकाळी अफाट वाटलेलं तळ त्याला आता दाबक्यासारखं वाटू लागत.

कथेतून...
👉🏽दादू मुसलमानाच्या घरापुढचा कडुनिंब नुकताच जागा झाला होता.

👉🏽ऐन विशीत इथल्या साहेबापुढे माझ्या वडिलांनी 'दिगंबर बळवंत कुलकर्णी, माडगूळकर' अशी फॉर्मात मोडीत सही केली होती आणि त्या सहीवर खूश होऊन त्यांना दरमहा बारा रुपयांची नोकरी या तळ्यावरच लागली होती.

( बहुजन पोरांना अशी फॉर्म मध्ये सही करता यावी म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या, सावित्रीबाईंना शिक्षिका बनवलं. त्यांना शेण चिखलाचे गोळे मारणारे कोण होते??? बहुजनांच्या शिक्षणामुळे कोणाची मक्तेदारी धोक्यात येणार होती?)

💡बाबू म्हाताऱ्याचा शेवट 

ही गोष्ट वाचून मला नेटफ्लिक्स वर पाहिलेला The substance चित्रपट आठवला. ही कथा आणि चित्रपट दोन्हीचा आशय, संदेश एकच आहे.

काळ, वेळ हा फार जालीम आहे. ज्या सौंदर्य आणि बळाचा अभिमान उराशी बाळगला ते कधीतरी निस्तेज होणार आहे. या नश्वर बाबीचा अभिमान जितका जास्त, वय झाल्यावर सत्याचा स्वीकार तितकाच कठीण जातो. The substance मधील ती नायिका आणि या कथेतील म्हातारा यांची मानसिक कुत्तरओढ पाहून, जाणवून आपण सावध होऊ. भविष्यात सत्य स्वीकारताना त्रास कमी होईल.

Everythin is temporary.... Everything.

(👉🏽म्हाताऱ्याची पोरं संसाराची, कुणबाव्या ची उस्तवारी नीट रीतीने बघत होती.
यातून लेखकाला काय सुचवायचं असेल बरं...)


💡हे पाप कुठं फेडू?

उमाजी त्याची पत्नी गोकुळा यांचा सुखाचा संसार होता. रत्ना नावाची गाय त्यांना भरभरून देत होती. त्यात ते समाधानी होते. रत्ना पुन्हा गाभण राहिली... होणारे खोंड आपली भरभराट करणार या स्वप्नरंजनात उमाजी होता, हवेत इमले बांधत होता.
उमाजी कधीमधी दारू प्यायचा, याने गोकुळाचा जीव कासावीस होऊ लागलेला शेजारच्या गावातील रामोशी फुकट देतायेत म्हणून उमाजी मोक्कार दारू पितो. त्याच ताळतंत्र सुटत. अशात तो रत्ना ने खोड काढली म्हणून तिला झोडपू लागतो. पिल्यामुळे बेभान झालेल्या उमाजी ला कधी थांबायचं हे सुदरत नाही आणि सगळ्या स्वप्नांचा विलंय होतो.

👉🏽उमाजी रामोशी आहे आणि रामोशी म्हटल्यावर चोरी लबाडी, चोरून दारू गाळणं आलीच हे सांगायला लेखक अजिबात विसरत नाही. 
लेखका चे निरीक्षण...
👉🏽कुणब्यांच काम फक्त गाया राखणं आहे.
👉🏽एरवाळी झोपणारे वाण्या बामन असतात.
👉🏽मेलेली गाय उचलून नेण्याचं काम महार करतात.

💡असलं लई बघितल्यात!

भानू, गावच्या पाटलाचा पोरगा. त्याची वासना गाढवी सोनाराच्या पोरीवर गेली.
गाढवी सोनार हातावर पोट घेऊन जगणारी फिरस्ती जमात, त्यांनी मायंदाळ दुनिया पाहिलेली असते. ती पोरगी भानू ला जन्माची अद्दल घडवते याची ही कथा..

👉🏽कथेत गावचा राणू पाटील आणि फाटक मास्तर केवळ या दोघाना आदरार्थी संबोधलं आहे. महार, रामोशी, गाढवी सोनार यांचं संबोधन एकेरी आहे.(पेशवाईत काय माज केला असेल याची कल्पना करू शकतो.)

👉🏽गाढवी सोनार गुरांना वैरण मागून किंवा विकत घेत नाहीत, संधी मिळेल तिथे हात मारतात. हे सांगायला लेखक विसरले नाहीत.

💡लग्न 

भालचंद्र, त्याचे दोन भाऊ, लग्नाला आलेली बहीण माली वडील पोस्टात नोकरीला आहेत. परिस्थिती बेतास बेत आहे. मालीला श्रीमंत अभ्यंकरांच्या घरातील स्थळ येत.

भालू (भाल्या नव्हे ) बहिणीला श्रीमंत स्थळ मिळाल्याने तुलना करू लागतो. ऐन लग्नात गरळ ओकून निघून जातो.

👉🏽 घरात पोषक वातावरण नाही प्रचंड गरिबी आहे तरी भालचंद्र ला अभ्यास करायचा आहे.
👉🏽त्याच वागण विक्षिप्त असलं तरी त्याला भाल्या न म्हणता भालू असाच उल्लेख केलेला आहे. 

💡जत्रा 

गंगाराम गुरव शेतमजूर होता. मालकाची बायको गौरा वर त्याचा जीव जडतो. दोघे पळून जाऊन दूर गावात राहू लागतात.
वर्ष दीड वर्षे जात. एक घटना घडती. गैरसमज वाढत जातो. गंगाराम गुरव, त्याचा मित्र शामू, गौरा ला जत्रेला म्हणून नेतात आणि..... पूर्वपती, आई यांचा तळ तळाट गौरा ला भोगावा लागतो.

शामू ला सत्य समजत तेंव्हा वेळ निघून गेलेली असते.

👉🏽ज्या हवालदारमुळे गैरसमज निर्माण झाला त्याचा उल्लेख लेखकाणे छाकट्या मुसलमान असा केला आहे.

💡रसूल 

गावचा कुलकर्णी मुंबईला जातो. तिथे त्याला एकाएकी रसूल भेटतो. रसूल मुसलमान त्याच्याच गावाचा... गावाला घरदार, आई वडील होते. रसूल मुंबई ला असायचा कधीमधी गावाला यायचा. त्याने मराठ्याची बाई पळवून आणली आणि गावाकडेच राहू लागला. गावाला हे पटलं नाही. रसूल ला चोप देऊन आईबापासकट हाकलून देण्यात आलं. तोच रसूल 20-25 वर्षांनी गावातील कुलकर्णी ला मुंबई त योगायोगाने भेटतो. गावाकडच्या बऱ्याच लोकांची चोकशी करतो. जाता जाता कुलकर्णी ला म्हणतो 

"खरं सांगायचं म्हणजे, त्यात काही चव नाही, कुरकळणी. तरुणपणात माणसाला काय कळत नाही. जवानी ही मोठी खराब गोष्ट आहे. त्या वेळी माणूस बोकडाचासुद्धा मुका घेईल! पण आपलं घरदार, नातंगोतं, सगळं सोडून अशा गोष्टींच्या मागे लागणं, हे काही खरं नाही. काय?"

💡तो अटळ बाळ्या!

एक बेकार मित्र, बाळ्या.... ज्याला तुम्ही टाळू शकत नाही. डोळ्याने अधू असणारा बाळ्या कायम आर्थिक विवंचनेत आहे, घराची जबाबदारी आहे तरीही वाचन भरपूर करतो.

बाळ्याचं पुढं काय होईल????

💡सोबत 

आपलं प्रियजण प्रथमच एकटयाने प्रवास करत असेल विशेषतः महिला तर काळजीने जीव कासावीस होतो. तशीच अवस्था सखारामची होती, बायको मंजुळा ला माहेरी जाण्यासाठी तो रेल्वेत बसवून देतो, सोबत अंध व्यक्ती आणि एक अपंग म्हातारी असते. ते सखाराम ला विश्वासात घेतात, सर्व माहिती घेतात आणि.....

शनिवारी गेलेली मंजुळा मंगळावर पर्यंत घरी पोहचलेली नसते. एका खुनाचा तपास करण्यासाठी सखाराम ला बोलावणं येत आणि....

(पूर्वीच्या काळी फोन नव्हते. प्रवासात आपल्या प्रियजणांचं काय झाल? ते इच्छित स्थळी सुखरूप पोहचले का? टपाल कधी येणार?? तेंव्हाच जीवन किती अवघड होत?? विज्ञान हाच सर्वशक्तिमान देव आहे असं वाटत.)

💡वारसा 

देना पखाल्या, (पखाल्या म्हणजे पाणी देणारा ) मिळेल ते काम करायचा, त्या कामानुसार त्याच आडनाव बदलायचं. आपल्या बापाने कधीच चांगली कापडं घेतली नाहीत, चांगलं चुगलं खायला दिल नाही याचा देना च्या मनात संताप होता.

पाणी द्यायला घेतलेला रेडा डॉक्टर ला दाखवण्यासाठी तालुक्याच्या गावी आलेला. तिथली कपडाची दुकानं पाहून तो हरखून जातो. या महिन्याचा 35 रुपये पगार बायकोला, पोरांना, स्वतःला कापड घेण्यासाठी खर्च करायचे असं तो ठरवतो. पोरांना, बायकोला तसा शब्द देतो.

देना चा बाप त्याच्याकडे 100 रुपये मागतो. पोटात गाठ आलिया.... असं म्हणतो.
देना ची पोरगी इठाबाई कपडाविषयी विचारते तेंव्हा तो कावतो आणि डोळे वटारून चेहरा फिस्करून बाहेर निघून जातो, अगदी तसाच देनाचा बाप देनाला करायचा.....हा वारसा कधी मिटेल का????

(मनाला पाझर फोडणारी कथा आहे. गरिबीच चक्र भेदणं लै मुश्किल झालेलं आहे..... हे चक्र सहजा सहजी सुटत नाही, सर्व ठीक झालं तर किमान 5-6 पिढ्या खपत्यात यासाठी.)

💡जन्माच्या गाठी 

वय झालं कि लग्न करायचं?
लग्नाचं योग्य वय कोणतं?
सौन्दर्य, पैसा, बुद्धी पाहून लग्न करायच का?
मग नेमक काय पाहून ठरवायचं? 

कुलकर्णी च हेच झालं. लग्न करायचं म्हणून तो उशिरा जागा होतो. पण एकाएकी त्याची लग्नाची इच्छा च मरून जाते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...