मुख्य सामग्रीवर वगळा

जळलेला मोहर - वि स खांडेकर (मेहता पब्लिशिंग हाऊस)


स्त्री - पुरुष यांच्यातील शृंगार हे पाप आहे, असं धर्म, समाज यांच्याकडून बिंबवल जात. शृंगार ही वाईट गोष्ट आहे, या मोहापायी अध्यात्मिक दृष्टया जीवन रसातळाला जात आणि स्वर्ग मिळत नाही या (भंपक)कल्पनेने मनोविकार वाढला आहे.

गांधी, विवेकानंद यांना जमलं म्हणून सामान्य लोकांकडून ही अपेक्षा करणं अज्ञान आहे.
जळलेला मोहर ही कादंबरी वाचनीय आहे. अखेरच्या पानापर्यंत खिळवून ठेवते.
शृंगार, संसारातील गैरसमज, त्यातून होणारी मानसिक सासेहोलपट यावर ही कादंबरी भाष्य करते.

सामान्य मानवी जीवनाच्या अत्यंत्य महत्वाच्या पैलूविषयी आपली समज वाढवण्यास 
"जळलेला मोहर " मदत करते . 

(दुसरी आवृत्ती 1948 ला आली, डॉ साने यांनी लिहिलेली प्रस्तावना अफलातून आहे. पुन्हा पुन्हा वाचावी अशी.डॉ साने यांनी लिहिलेले पत्र पुस्तकातून जशेच्या तसें दिले आहे.मेहता प्रकाशन ने प्रकाशित केलेलं हे पुस्तकं प्रत्येकाच्या संग्रही असलं पाहिजे.नक्की विकत घ्या.)

डॉ. साने यांचे पत्र

स्त्री-पुरुषसंबंधांच्या बाबतीत आपला समाज अद्यापि फाजील सोवळा आहे, असेच मला वाटते. नैसर्गिक वासनांचा प्रामाणिकपणाने विचार करण्याऐवजी त्यां धार्मिक पडद्याआड लपवून आपण संस्कृतीचा विकास करीत आहो, समाजाचा गाडा मोठ्या शिकस्तीने आवरून धरून तो खड्डयात पडणार नाही, अशी दक्षता आपण घेत आहो, असे मानणारे लोक कळत, न कळत आत्मवंचना करीत असतात. पडद्याआड काही झाले, तरी हरकत नाही; पण त्या गोष्टीची उघडपणे चर्चा करता कामा नये, असा आपल्या समाजाचा सनातन दंडक आहे. या दंडकामुळे कामवासनेचे स्वरूप अधिक उन्नत झाले, समाजातल्या विविध विकृतींना आळा पडला किंवा पतिपत्नींची एकमेकांविषयीची निष्ठा वाढत गेली, असे मुळीच नाही. उलट, या बाबतीत मोकळेपणाने बोलण्याची चोरी असल्यामुळे अर्धवट ज्ञान व संपूर्ण अज्ञान यांतून निर्माण होणारे अनेक अनर्थ पिढ्या न् पिढ्या आपल्या सामाजिक जीवनात थैमान घालीत राहिले आहेत. आपल्या दैनंदिन जीवनातल्या लहानसहान गोष्टींवर सुद्धा धार्मिकतेचा एवढा मोठा पगडा होता, (अद्यापिही आहे, असेच म्हणावे लागेल) की त्यामुळे जीवन नैसर्गिक, सुखकारक आणि व्यक्ती व समाज ह्यांना उपकारक व्हावे, म्हणून ज्या शास्त्रीय दृष्टीचा अवलंब करावा लागतो, ती आपल्यांत कधीच विकसित झाली नाही. रूढीचे दास हे दुर्दैवाने आपल्याकडे सामाजिक जीवनाचे नेते मानले गेले, प्रामाणिक विचारवंताला पिढ्या न् पिढ्या नास्तिक म्हणून हिणविण्यात आले, बंडखोर ठरविण्यात आले. या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या समाजावर किती भयंकर झाला आहे, ह्याची कल्पना तुमच्यासारख्या लेखकांना करता येणार नाही. घराच्या चार भिंती याच तुमच्या चार दिशा असतात. माझ्यासारख्या डॉक्टराचे तसे नाही. चार तासांच्या अवधीत त्याला दहा दुःखी जीवनकथा पाहायला मिळतात. त्या दुःखाला कारणीभूत झालेले अज्ञान, दारिद्र्य आणि पशुत्व यांचे नग्न दर्शन त्याला होते. माझ्यासारख्या डॉक्टरपुढे दररोज माणसाचे चित्रविचित्र नवे नवे नमुने उभे राहतात. ते पाहिले, की आपल्या समाजातल्या अज्ञानाला, त्यातून निर्माण झालेल्या खोट्या लज्जेला आणि शिष्टाचाराच्या व सभ्यपणाच्या नावाखाली असह्य कुचंबणा करून घेणाऱ्या आपल्या संस्कृतीला हसावे, की रडावे, हेच अनेकदा कळेनासे होते.

कालचीच एक गोष्ट सांगतो काल संध्याकाळी एक अपरिचित तरुण माझ्या दवाखान्यात आला. तसा काही तो अगदी अडाणी नव्हता. आपल्याला थंडी वाजून ताप येत आहे, असे त्याने मला प्रथम सांगितले. मी थर्मामीटर काढून तो त्याला खाकेत लावायला सांगताच स्वारी म्हणाली,

"तसा काही फार ताप येत नाही मला. अवघड जागी एक गळू झालंय् ! त्यामुळं थंडी वाजल्यासारखी वाटते. बहुधा थोडी कसर येत असावी!"

तो खोटे बोलत आहे, हे लगेच माझ्या लक्षात आले. बनावट साक्षीदारापेक्षाही अधिक खोटे बोलल्यावर, आढेवेढे घेत-घेत आपल्याला गुप्त रोगापासून त्रास होत असल्याचे त्याने शेवटी कबूल केले !

डॉक्टरकडे जाऊन त्याच्यापुढे सुद्धा आपला रोग कबूल न करण्याची ही जी वृत्ती दिसते, तिचे मूळ आपल्या हरिदासांनी आणि पुराणिकांनी रूढ केलेल्या आणि समाजाने आंधळेपणाने शिरोधार्य मानलेल्या सांकेतिक कल्पनांत आहे. कामविकार हा माणसाचा नंबर एकचा शत्रू आहे, हे आम्ही हजारो वर्षे घोकीत आलो आहो. विश्वामित्रासारखे उग्र तपश्चर्या करणारे महर्षी सुद्धा मेनकेच्या एका कटाक्षाने घायाळ होऊन तिच्या पायांशी लोळण घेतात, असे आपली पुराणे आणि काव्ये, आपले संत आणि साहित्यिक शतकानुशतक समाजाला पढवीत आले आहेत. या पिढीजाद पोपटपंचीचा कामविषयक नीती सुधारण्याच्या कामी किती उपयोग झाला असेल, ते एका परमेश्वरालाच माहीत ! या पोपटपंचीच्या मुळाशी असलेले तर्कशास्त्रच मोठे अजब आहे. लोहपिष्ट भक्षण करून साठ सहस्त्र वर्षे उग्र तपश्चर्या करणाऱ्या अलौकिक ऋषीला जो मोह टाळता आला नाही, त्याच्यावर सामान्य मनुष्य सहजासहजी मात करू शकेल, ही कल्पना किती हास्यास्पद आहे! पण अस्तित्वात नसलेल्या स्वर्गसुखाच्या मागे धावत सुटलेल्या आणि ज्या पृथ्वीवर आपल्याला प्रत्येक क्षण घालवावा लागतो, तिच्याकडे पाठ फिरवून कल्पनेतल्या परलोकाकडे डोळे लावून बसलेल्या माणसांना तर्कशुद्ध विचार करता येणार तरी कसा? कटु सत्य आणि गोड असत्य, यांच्यामधला भेद जाणून घेण्याची त्यांना इच्छाच नसते. आत्मविकास हे मानवी जीवनाचे उच्चतम ध्येय असले, तरी मनुष्य हा केवळ आत्मा नाही, तो शरीरही आहे, शरीरधर्माकडे दुर्लक्ष करून आत्म्याच्या पाठीमागे लागणे म्हणजे तहानेलेल्या मनुष्याने अंतराळात विहीर खणून तिचे पाणी पिण्याची इच्छा करण्यासारखे आहे. ही गोष्ट सर्वांनीच नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. पण 'असेल माझा हरि, तर देईल खाटल्यावरी' हे ज्याचे जीवनविषयक तत्त्वज्ञान, कुठल्याही संकटाशी झुंज घेण्याऐवजी, ते आपले पूर्वजन्मीचे पाप आहे, म्हणून कसायापुढे मान टाकणाऱ्या बकऱ्याप्रमाणे त्याला शरण जाण्याची तयारी करणे हा ज्याचा धर्म, त्या समाजात एवढा विवेक कुणाला सुचणार? या विवेकभ्रष्टतेमुळेच माणसाला मनुष्य म्हणून जगू देण्याइतके विचारांचे औदार्य आपल्यापाशी नसल्यामुळेच, पहिल्या बाजीरावासारख्या अलौकिक पराक्रमी पुरुषाचा मोठा दुःखद अंत झाला. बाजीरावाचे मस्तानीवरले प्रेम, ही त्या काळातल्या नीतिकल्पनांना न पटणारी गोष्ट होती, हे काही खोटे नाही. पण परंपरागत नीतीच्या पलीकडे जाऊन या प्रेमाचे स्वरूप पाहण्याचा त्या काळी एखाद्याने तरी प्रयत्न केला असेल का? इतर देशांत ही प्रेमकथा अलौकिक आणि अद्भुतरम्य अशा काव्याचा विषय म्हणून गौरविली गेली असती. पण आपले त्या काळचे कवी राम-कृष्णांच्या लीला वर्णन करण्यात आणि 'जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे' या उपदेशाचे घुटके लोकांना पाजण्यात गुंग होऊन गेले होते. त्यांना या प्रेमकथेतली उत्कटता, वास्तवता आणि भव्यता कुठून प्रतीत होणार? जिथे समाजातले कविमनच असे रूढिग्रस्त असते आणि ठरावीक चाकोरीतून फिरत राहते, तिथे बिचाऱ्या जनमनाला दोष लावण्यात काय अर्थ आहे?

पहिल्या बाजीरावाची बायको नेहमी आजारी असे, अशा स्थितीत मस्तानीसारखी लावण्यवती त्याच्या पराक्रमावर लुब्ध होऊन त्याच्या गळ्यात पडली. मराठेशाहीच्या सीमा भरतीच्या लाटांप्रमाणे पुढे पुढे लोटीत नेणारा, निजामाला हां हां म्हणता खडे चारणारा, नादिरशहासारख्या आग्यावेताळाला आपल्या शौर्याने दहशत बसविणारा, असा हा पराक्रमी पुरुष स्त्रीप्रेमासाठी भुकेला असावा, यात अस्वाभाविक असे काय होते? राज्याचा भरिभार वाहून श्रांत झालेले त्याचे मस्तक प्रेयसीच्या बाहुपाशात विसाव्याची अपेक्षा करीत होते. तो कितीही शूर असला, मुत्सद्दी असला, देशभक्त असला, तरी शेवटी मनुष्यच होता! नेमके याच गोष्टीकडे त्या काळात कुणी लक्ष दिले नाही. ते देणे कुणाला शक्यच नव्हते. आपले व्यक्तिजीवन अंध धर्मकल्पनांनी आणि रूढ नीतिनियमांनी इतके करकचून बांधलेले होते, की बाजीराव आणि मस्तानी यांच्या प्रीतीकडे सहानुभूतीने पाहणे हे त्या वेळच्या समाजात निःसंशय मोठे पाप ठरले असते.

पण त्याच काळातली इतर देशांतली माणसे स्त्री-पुरुषसंबंधांकडे कामतृप्ती ही जीवनातली आवश्यक गोष्ट आहे, या तत्त्वाकडे न बुजता, न बाचकता, कशी पाहत होती, हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. तुम्हांला पत्र लिहीत असताना माझ्यापाशी बेंजामिन फ्रैंकलिनचे आत्मचरित्र पडले आहे. या पुस्तकात आत्मवृत्ताबरोबर त्याचे काही लेखही दिले आहेत. पुण्यातले ब्राह्मण मस्तानी-प्रकरणी पहिल्या बाजीरावाला वाळीत टाकण्याचा ज्या वेळी प्रयत्न करीत होते, त्याच वेळी बेंजामिन फ्रैंकलिन हा एक प्रसिद्ध अमेरिकन पुरुष आपल्या लेखनाच्या द्वारे लोकांपुढे कोणते विचार मांडीत होता, हे पाहिले,

म्हणजे त्यातला विरोध मनाला बोचल्याशिवाय राहत नाही.

फ्रैंकलिनने एका तरुण मनुष्याला उपदेश म्हणून १७४५ मध्ये एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रातला मुख्य मजकूर असा आहे:

'प्रिय मित्रा, तू आपल्या मनाच्या अनावर वृत्तीचे जे वर्णन केले आहेस, तिच्यावर जगात फक्त एकच औषध आहे. ते म्हणजे लग्न ! विवाह केल्यानेच तुला खऱ्याखुऱ्या सुखाचा लाभहोईल. आज ते लग्न न करण्याची तू जी कारणे सांगत आहेस, ती मला तरी पटत नाहीत. पुरुष निसर्गतः अपूर्ण आहे, हे कधीही विसरू नकोस! त्याच्या जीवनाला स्त्री पूर्णता आणते. तिची मृदुता, व्यावहारिकता आणि सौंदर्यदृष्टी त्याच्या आयुष्यात गोडवा निर्माण करते. स्त्रीचे जीवनही पुरुषावाचून असेच अपुरे आणि ओके ओके होते. पुरुषाची पराक्रमाची शक्ती आणि विवेकबुद्धी तिच्या जीवनाला पूर्णता आणते. म्हणूनच तुझ्यासारखा अविवाहित तरुण हा एका दृष्टीने अर्धवट मनुष्य आहे, असे मला वाटते. कात्रीच्या एका पात्यासारखी तुझी स्थिती आहे.'

फ्रैंकलिनचे इथपर्यंतचे हे पत्र आपल्याकडल्या सनातनी लोकांना सुद्धा आवडेल. पण त्याने पुढे जो मजकूर लिहिला आहे, तो ऐकल्यावर मात्र ते 'अब्रह्मण्यम्' म्हणून कानांवर हात ठेवतील. फ्रैंकलिन पुढे म्हणतोः

'पण लग्न करण्याचा माझा हा सल्ला तुला पटत नसेल, लग्न न करताच तुला राहायचे असेल, तर माझ्या एका सूचनेचा अवश्य विचार कर. ती म्हणजे स्त्रीसुख मिळविताना तरुणीपेक्षा प्रौढ स्त्रियाच तू पसंत करीत जा. तुला माझा हा सल्ला प्रथमदर्शनी मोठा विचित्र वाटेल. पण तो पूर्ण विचारांती मी देत आहे. प्रौढ स्त्रियांना व्यवहारज्ञान अधिक असते. जगाच्या अनुभवाने त्यांची मने समृद्ध झालेली असतात. त्यामुळे त्यांच्या संभाषणात चातुर्य आणि मोहकता अधिक आढळते. उलट, तरुण स्त्रियांना आपल्या रूपाचा मोठा अभिमान असतो. या गर्विष्ठपणामुळेच त्या बेपर्वाईने वागतात. आपल्यापाशी सौंदर्याचा हुकमी पत्ता नाही, हे प्रौढ स्त्रीला कळत असते. त्यामुळे सौंदर्याची उणीव ती सौजन्याने भरून काढते. आजारीपणात तिच्याइतक्या प्रेमळपणाने दुसरी कोणतीच स्त्री रोग्याची शुश्रूषा करू शकणार नाही. स्त्री जितकी वयाने अधिक मोठी, तितकी ती स्वभावाने अधिक चांगली, असा सर्वसामान्य सिद्धान्त सांगितला, तर तो काही सर्वस्वी चुकीचा ठरणार नाही! अशा स्त्रियांशी मैत्री करण्यात फारसे पापही नसते. कुमारिकेला आपल्या प्रेमपाशात गुंतविल्याने एखादे वेळी तिच्या आयुष्याचा सत्यनाश होण्याचा संभव असतो. कदाचित तिला सारा जन्म रडत आणि कुढत काढावा लागेल, अशी परिस्थिती एखादे वेळी उत्पन्न होते. तसल्या संबंधांमुळे आपल्या मनात पश्चात्तापाची शल्ये सलत राहतात. प्रौढ स्त्रीच्या बाबतीत असे कधीच होत नाही. उलट, तिची कृतज्ञताच आपल्या पदरी पडते.'

फ्रैंकलिनने एका तरुणाला केलेल्या उद्देशातला अधिक सभ्यपणाचा असा भाग मी इथे उद्धृत केला आहे. विवाहबाह्य संबंधांच्या बाबतीत तरुणींपेक्षा प्रौढ स्त्रियाच अधिक सुखप्रद का होतात, याची त्याने जी आणखी दोन-तीन कारणे दिली आहेत, त्यांचा या पत्रात उल्लेख करण्याची सुद्धा मला छाती होत नाही. मी ती नुसती सूचित केली, तरी सारी संस्कृतिसंरक्षक मंडळे माझ्यावर हिरिरीने तुटून पडतील. कृष्णराव मराठे गुंड कायद्याखाली मला पकडावे, म्हणून सरकारच्या मागे लागतील. एवढेच नव्हे, तर स्वतःला पुरोगामी म्हणविणारी अनेक माणसेही कानांत बोटे घालून आपल्या भुवया वर चढवितील.

याचा अर्थ फ्रँकलिन हा एक चावट मनुष्य होता, असा मात्र मुळीच नाही. तो व्यवहाराकडे वास्तव दृष्टीने पाहतो. पदोपदी प्रत्येक गोष्टीला काव्याचा मुलामा देणे त्याला पसंत नाही. निसर्गावर पांघरूण घालून किंवा त्याची शाब्दिक उपेक्षा करून कुणी त्याच्या पाशातून मुक्त होत नाही. उलट, नैसर्गिक गोष्टी वेळी अवेळी चोरून ठेवल्यामुळे त्यांना रहस्याचे स्वरूप प्राप्त होते; आणि रहस्याविषयी आकर्षण वाटणे हा तर मनुष्याचा स्वाभाविक धर्मच आहे. जीवनात कामवासनेचे स्तोम माजविणे जितके चुकीचे आहे, तितकेच तिला क्षुद्र किंवा ओंगळ लेखणेही चुकीचे आहे. ही दुसरी चूक भारतीय समाज गेली दोन हजार वर्षे करीत आला आहे. निवृत्तीचा पगडा सर्वसामान्य समाजमनावर कधीच बसणे शक्य नसते. पण त्याला वैराग्याचे सोंग मात्र आणता येते. तसाच काहीसा प्रकार या बाबतीत झाला आहे. ऐतिहासिक काळात राजे लोक सुंदर स्त्रियांसाठी लढाया करीत होते, पळवून आणलेल्या बायकांचे जनानखाने बाळगीत होते! सामान्य लोक सामान्य व्यभिचार करीत होते. स्त्रीच्यापायी इतिहासाचा प्रवाह बदलल्याचे दाखले तुम्हांला हवे तेवढे मिळतील. पण असे असूनही स्त्री-पुरुषसंबंध हा मानवी जीवनातला एक आवश्यक आणि विचारणीय भाग आहे, असे म्हणायची मात्र आपल्याकडे कुणाचीच तयारी नव्हती.

या बाबतीत आपले प्राचीन साहित्य अधिक प्रामाणिक आहे, असे म्हणता येईल. जाता जाता महाभारतातले एक उदाहरण आठवले. तेच इथे देतो. अर्जुनाने धर्म व द्रौपदी ह्यांना चुकून एकांतात पाहिले. या नियमभंगाचे प्रायश्चित्त म्हणून अर्जुनाला पुढे तेरा वर्षे तीर्थयात्रा करावी लागली. एखाद्या आधुनिक लेखकाला अर्जुनाच्या या तीर्थयात्रेचे वर्णन करायचे असते, तर या प्रायश्चित्ताच्या कालात तो किती विरक्त वृत्तीने वागत होता, ईश्वरचिंतनाशिवाय त्याला दुसरे काहीही कसे सुचत आणि रुचत नव्हते, इत्यादिकांविषयी त्याने गोड गोड थापा मारल्या असत्या. पण महाभारतकाराला असला लपंडाव संमत नव्हता. या तीर्थयात्रेतील अर्जुनाची अनेक प्रेमप्रकरणे त्याने सविस्तर वर्णन केली आहेत. अर्जुनाच्या ह्या प्रणयिनींपैकी उलूपीचे महाभारतातले वर्णन स्त्री-पुरुषांच्या प्रेमसंबंधांकडे पाहण्याच्या आपल्या काव्यमय परंतु कृत्रिम पद्धतीवर पूर्ण प्रकाश टाकणारे असल्यामुळे ते मुद्दाम जसेच्या तसे पुढे देत आहे.

वैशंपायन सांगतातः

राजा, कुरुकुलाला कीर्तीस चढविणारा तो महाबाहू अर्जुन वनात जाऊ लागला असता विद्वान, वेदवेदांगवेत्ते व ब्रह्मचिंतन करणारे ब्राह्मण, भिक्षुक, भगवद्भक्त, सूत, पुराणिक, मधुरवाणीने देवादिकांची आख्याने गाऊन दाखविणारे कथेकरी, ऊध्र्वरते ब्रह्मचारी, संन्यासी, वगैरे श्रमणसंज्ञक वनौकस हे सर्व व दुसरे कित्येक मृदुभाषी अनुचर बरोबर असल्याने, मरुद्गणांनी परिवेष्टित अशा इंद्राप्रमाणे तो शोभू लागला. मार्गात त्याने कित्येक रमणीय, विचित्र वने, सरोवरे, नद्या व समुद्र, देश व पवित्र तीर्थे पाहिली. नंतर त्याने गंगाद्वारी वास्तव्य केले. राजा, त्या स्थळी त्या पांडवश्रेष्ठाने जे अद्भुत कर्म केले, ते ऐक. तो तेथे असता त्याचे आश्रयावर सर्व ब्राह्मणांनी अनेक ठिकाणी अग्निहोत्रे आरंभिली, त्याकरिता सर्व तीरांवर जागजागी कुंडे बांधली होती; आणि जितेंद्रिय व सत्यनिष्ठ ब्राह्मणांनी स्नानसंध्या करून अग्निप्रबोधन केल्यामुळे त्यांतील अग्नी धडाडले होते. ब्राह्मण हे मंत्रघोषपूर्वक आत आहुती देत होते व होमांती अग्नीची पुष्पांनी पूजा करीत बसले होते. अशा समयी त्या गंगाद्वाराचा देखावा काही अवर्णनीयच दिसत होता. याप्रमाणे वेदींनी व ब्राह्मणांनी ते स्थान गजबजून गेले असता एके दिवशी अर्जुन स्नानार्थ गंगेत उतरला; व स्नान आणि पितृतर्पण करून अग्निकार्य करण्याच्या हेतूने तो गंगेतून बाहेर पडणार, तो त्याचे रूप पाहून मदनार्त झालेल्या उलूपी नामक नागकन्येने त्याला एकाएकी पाण्यात ओढून पाताळात नेले. सुदैवाने तेथे कौरव्यनामक नागाचे घरी उत्कृष्ट रीतीने पूजिलेला अग्नी आयताच त्याला आढळला. तेव्हा त्या अग्नीतच अर्जुनाने निःशंकपणे आहुती देऊन आपले अग्निकार्य संपविले; आणि त्यायोगाने हुताशन संतुष्ट झाला. नंतर अग्निकार्य उरकल्यावर त्या उलूपीकडे वळून व गालांतल्या गालांत हसून तो तिला म्हणाला,

"हे कल्याणि, हे तू का साहस केलेस? हे सुभगे, हा देश कोणाचा? तू कोण व कोणाची कन्या? सुंदरी, हे सर्व मला सांग."

उलूपी म्हणालीः

ऐरावत कुलात उत्पन्न झालेला कौरव्य नावाचा नाग आहे, त्याची मी कन्या. माझे नाव उलूपी. तू स्नानाकरिता गंगेत उतरला असता तुला पाहताच मी मदनाकुल झाले. हे निष्पापा, मला अद्यापि दुसऱ्या पुरुषाचा स्पर्श नाही, व तुझ्यापायी हा मदन मला पीडा देत आहे. तर तू आपला देह माझे कामी लावून मला आज संतुष्ट कर.

अर्जुनाने उत्तर दिले,

हे कल्याणि, तू म्हणतेस ते नीट आहे; परंतु मी स्वतंत्र नाही; मी धर्मराजाच्या अधीन असून त्याने बारा वर्षेपर्यंत ब्रह्मचर्य पाळण्याची मला आज्ञा केली आहे. हे जलचारिणी नागकन्ये, खरे पुसशील, तर तुझ्यासारख्या सुंदरीला संतुष्ट करण्याला मी तयार आहे. परंतु मी धर्माज्ञा स्वीकारून चुकलो आहे व ती मला मोडता येत नाही. कारण, मी आजपर्यंत कोणत्याही कारणास्तव अनृत बोललो नाही. तस्मात, हे नागकन्ये, तुझी इच्छा तर पूर्ण व्हावी, आणि मजवर खोटेपणा येऊन माझी धर्महानी होऊ नये, अशी काही तरी तोड काढ !

उलूपी म्हणाली,

हे पांडुपुत्रा, तू पृथ्वीपर्यटन का करीत आहेस, वडील भावाने तुझे गळ्यात ब्रह्मचर्य का बांधले, ते सर्व मी जाणते. द्रौपदीशी एक बंधू एकांतात असता चुकून सुद्धा दुसरा तेथे प्रवेश करील, तर त्याने बारा वर्षे वनात ब्रह्मचर्याने काढावी, असा तुमचा परस्पर करार आहे. परंतु हे ब्रह्मचर्य केवळ द्रौपदीसंबंधाने होय. कारण तिच्याकडे अकाली दृष्टी टाकल्याबद्दल बारा वर्षेपर्यंत तिचा उपभोग अपराधकर्त्यास मिळू नये, हा या कराराचा तात्पर्यार्थ आहे. तस्मात या ब्रह्मचर्याचे पालन द्रौपदीपुरतेच आहे. इतर स्त्रियांसंबंधाने नाही, हे उघड दिसते. यासाठी माझे अंगीकाराने तुझा व्रतभंग होत नाही, हे सिद्ध झाले. शिवाय, हे कमलनयना अर्जुना, मी अगदी मदनार्त झाले आहे, आणि आर्ताचे परित्राण करणे हा राजधर्मच आहे. तेव्हा या दृष्टीने पाहता मदनपीडेपासून माझे त्वां संरक्षण केल्याने तुजकडे अधर्म येत नाही. बा अर्जुना, या कृतीने थोडा तरी धर्माला बाध येईल, असेही तुला वाटत असले, तरी मी तुला सांगते, की तेवढा दोष माझे मनोगत पूर्ण करून मला जिवंत राखल्याच्या पुण्याने निवृत्त होईल. पार्था, तुझ्या ठिकाणी माझी अनन्य भक्ती आहे व भक्ताची उपेक्षा करू नये, असे सज्जनांचे मत आहे. यास्तव, पार्था, तू या दासीचा अंगीकार कर. असे न करशील, तर मी खचित वाचणार नाही. हे महाबाहो, दीन, अनाथ अशांचे तू सदासर्वदा संरक्षण करतोस, असा तुझा लौकिक आहे. मग मजपुरतीच तू इतकी ओढाताण का मांडली आहेस? अरे, माझे प्राण रक्षण करून प्राणदान दिल्याने अनुपम पुण्य तू गाठी बांध. हे पुरुषोत्तमा, मी तुला आज शरण आले असून, मदनपीडेने गांजून गेल्यामुळे धाय मोकलून रडत आहे, इकडे लक्ष दे. मी काय करू? तू दृष्टीस पडताच माझ्या शरीरात या मदनाने जसा काही पेट घेतला आहे, आणि म्हणूनच मी इतक्या तुझ्या विनवण्या करीत आहे! तस्मात कृपाळू होऊन, तू आपला देह मला वाहून, माझ्या मनासारखे कर !

वैशंपायन सांगतात,

याप्रमाणे त्या नागकन्येने गळ घातली, तेव्हा तिचे म्हणणे धर्माला धरूनच आहे, असे पाहून तो प्रतापी अर्जुन त्या रात्री तिचेच महालात राहून तिच्या इच्छेप्रमाणे वागला; व सूर्योदय होताच तेथून उठून पुन्हा गंगाद्वारी आला. मग त्याला तेथे सोडून ती साध्वी उलूपी आपल्या घरी गेली. जाण्यापूर्वी 'तू जलात सर्वत्र विजयी होऊन, सर्व जलचर तुला वश राहतील!' असा तिने अर्जुनाला वर दिला.

उलूपीची ही शृंगाररसपरिप्लुत कथा आमच्या हिंदी चित्रपटनिर्मात्यांनी अजून पडद्यावर कशी आणली नाही, याचे मला राहून राहून नवल वाटते. अर्घ्यदान करण्याकरिता पाण्यात उभा राहिलेल्या अर्जुनाला एक लावण्यवती नागकन्या ओढून पाताळात नेते. चित्रणाच्या दृष्टीने केवढा कलात्मक प्रसंग आहे हा! फोटोग्राफीच्या दृष्टीने 'पहु ल्ब्'वर असले चित्र सहज ताण करू शकेल. पाताळातले भव्य देखावे, ती तिथली रत्नखचित सुंदर मंदिरे, शेकडो अर्धावृत नागकन्यांची आकर्षक नृत्ये, वगैरे मालमसाला या कथेत भरपूर घालता येण्याजोगा आहे. पाहा.बुवा, हे कथानक कुठे खपतेय् का? ते खपले, तर पडद्यावर माझे नाव तरी चमकेल, 'मूळ कल्पना-डॉ. साने.'

मी मात्र या कथेकडे नेहमीच निराळ्या दृष्टीने पाहत आलो आहे. रामायणकाळी आर्य लोक या देशात स्थिर झाले नव्हते. स्थैर्य प्राप्त करून घेण्याच्या धडपडीत असलेला समाज साहजिकच आदर्शवादी बनतो. प्रत्येक भावनेचे उज्ज्वल स्वरूप त्याला आकृष्ट करते. रामायणात महाकवी वाल्मीकीने अशा आदर्शाची चित्रे रेखाटली आहेत. पित्याच्या हातून वचनभंग होऊ नये, म्हणून चौदा वर्षे वनवास स्वीकारणारा राम, सिंहासनावर बसण्याची सोन्यासारखी संधी प्राप्त झाली असताना संन्यस्त वृत्तीने रामाच्या पादुकांची पूजा करीत राहणारा भरत, पत्नीप्रेमाकडे पाठ फिरवून भावाच्या सेवेकरिता अरण्यवासाचे कष्ट हसतमुखाने स्वीकारणारा लक्ष्मण, लोकानुरंजनाकरिता प्राणाहूनही प्रिय असलेल्या पत्नीचा त्याग करणारा राजा-गुहकापासून मारुतीपर्यंत आदिकवीने निर्माण केलेली सर्व लहानमोठी स्वभावचित्रे पाहिली, म्हणजे ती ध्येयवादित्वातून निर्माण झाली आहेत. मनुष्य कसा आहे, हे सांगण्यापेक्षा तो कसा असावा, याचे चित्रण करण्याची प्रेरणा कविमनावर अधिक प्रभाव गाजवीत आहे, हे उघड दिसून येते. यामुळे आदर्शाचे सौंदर्य रामायणात विपुल असले, तरी वास्तवाच्या विविध छटा, मनुष्यस्वभावाचे अगणित पैलू, जीवनाचे सारे कोनेकोपरे त्यात कवीने रंगविलेले आपल्याला आढळून येत नाहीत. त्यांचे खरेखुरे दर्शन आपल्याला महाभारतातच होते. वाल्मीकीची सृष्टी दैवी आहे. व्यासाची मानवी आहे. महाभारत हा पाचवा वेद मानण्याचा प्रघात पडला, तो काही उगीच नाही. व्यासांच्या काळी आर्य समाज सुस्थिर झाला होता. त्यामुळे मनुष्यस्वभावातल्या चिरंतन गुणावगुणांचा, विविध वासनाभावनांचा आणि नैसर्गिक व सामाजिक संघर्षांचा जितका वास्तव, तितकाच मार्मिक आविष्कार महाभारतात प्रकट झाला आहे. 'सुईच्या अग्रावर राहील, एवढी माती सुद्धा मी पांडवांना देणार नाही' असे म्हणणारा अहंकारी दुर्योधन, पतिव्रता असूनही, क्षणभर का होईना, कर्णाविषयी मनात अभिलाषा बाळगणारी द्रौपदी...

जाऊ दे! डॉक्टरी चालत नसल्यामुळे मी हल्ली पुराणसंशोधक झालो आहे, असा कदाचित तुमचा या लिखाणावरून ग्रह व्हावयाचा! आता एखाद्या अक्षरे उडून गेलेल्या शिलालेखाचे चरित्र सुरू होईल, या भीतीने तुम्ही माझे पत्र कदाचित वाचणारही नाही. म्हणून हे पुराणप्रकरण इथेच संपवतो.माझा मुख्य मुद्दा उलूपीच्या कथेवरून प्राचीन काळातल्या स्त्री-पुरुष संबंधांवर पडणारा प्रकाश हा आहे. चुकून हातून झालेल्या नियमभंगाचे प्रायश्चित्त घेण्याकरिता अर्जुन तीर्थाटनाला निघालेला असतो. ही बारा वर्षे आपण संन्यस्त वृत्तीने काढली पाहिजेत, याची पुरेपूर जाणीव त्याला आहे. पण उलूपीसारखी नागकन्या आपल्यावर फिदा झाली आहे, असे पाहताच या व्रतस्थ वीराचे मन डळमळू लागते. तो उलूपीला म्हणतो, 'धर्मराजाची आज्ञा पाळणे हे माझे कर्तव्य असून, त्याने बारा वर्षेपर्यंत ब्रह्मचर्य पाळण्याविषयी मला सांगितले आहे. पण खरे विचारशील, तर तुझ्यासारख्या सुंदरीला संतुष्ट करण्यास मी तयार आहे.' अर्जुनाच्या वैराग्याचा हा तकलुपीपणा पाहून त्याच्या मनाची रुखरुख घालवण्याकरिता उलूपी जो युक्तिवाद करते, तोही मोठा मजेदार आहे. ती म्हणते, 'मी अगदी मदनार्त झाले आहे आणि आर्वांचे परित्राण करणे हा राजधर्मच आहे. पार्था, तुझ्या ठिकाणी माझी अनन्य भक्ती आहे व कुणीही भक्ताची उपेक्षा करू नये, असे सज्जनांचे मत आहे. तू या दासीचा अंगीकार केला नाहीस, तर मी खचित वाचणार नाही. माझे प्राणरक्षण करण्याकरिता तरी माझ्या मनासारखे कर!' तिचा हा सारा कोटिक्रम पाहून आधुनिक काळी ही नागकन्या जन्माला आली असती, तर ती उत्तम फौजदारी वकील झाली असती, असे वाटल्यावाचून राहत नाही. अर्जुनाचे मन ताब्यात असते,तर असल्या शाब्दिक कोटिक्रमाने फसून त्याने उलूपीचा कधीच स्वीकार केला नसता. पण त्याने तिला होकार दिला. तो तिच्या शब्दांच्या जाळ्यात सापडून नाही, तर सौंदर्याच्या जाळ्यात सापडून ! तो पडत्या फळाच्या आज्ञेची वाटच पाहत बसला होता. उलूपीचे हे भाषण ऐकताच ते धर्माला धरून आहे, अशी त्याची खात्री झाली व तो रात्री तिच्या महालात राहिला. या प्रकरणाचा समारोप करताना मदनबाधेने व्याकूळ होऊन अर्जुनाच्या गळ्यात पडणाऱ्या उलूपीला साध्वी हे विशेष वैशंपायनाने लावले आहे, ही गोष्टही तुम्ही विसरू नका.

इतक्या विस्ताराने मी या कथेचा ऊहापोह करीत आहे, याचे कारण एकच आहे. ते म्हणजे जीवनाकडे-विशेषतः सामान्य मनुष्याच्या जीवनाकडे-आपण आदर्शापेक्षा वास्तवाच्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे, हे होय. ही आवश्यकता आपल्या भारतीय संस्कृतीने कधीच लक्षात घेतली नाही. आदर्श हा आकाशातला चंद्र असतो. त्याचा प्रकाश पृथ्वीला मोहक रूप देतो; पण तो चंद्र पृथ्वीवरल्या माणसांच्या हातात कधीच येत नाही, याचे तिला विस्मरण झाले. समाजात आदर्श अवश्य असावे लागतात. ते नसले, तरी कवींनी व संतांनी, सुधारकांनी आणि समाजनेत्यांनी ते जनमनापुढे निर्माण करून ठेवायचे असतात. पण त्याच वेळी आदर्शाचा उपयोग सामान्य मनुष्याच्या मनावर सुसंस्कार करण्यापुरताच होतो, हेही त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. पण आम्ही इहलोकापेक्षा परलोकाकडे दृष्टी देऊन शतकानुशतक काढले. प्रवृत्तीच्या उन्हात धावण्यापेक्षा निवृत्तीच्या छायेत स्वस्थ बसण्यात जीवनाचे साफल्य आहे, अशी आम्ही आमची खोटी समजूत करून घेतली. जीवनाविषयीच्या या एकांगी तत्त्वज्ञानाची कटु फळे आज आपण प्रत्येक क्षेत्रात चाखीत आहोत. काळाबरोबर धावण्याचे सामर्थ्य आम्ही कधीच संपादन केले नाही. 'थांबला, तो संपला!' या उक्तीचा विचार करण्याऐवजी 'ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या' याचा काथ्याकूट करण्यात आम्ही आमची बुद्धी शिणविली. जुनी ध्येये आम्ही कधी प्रामाणिकपणे आचरणात आणली नाहीत. मात्र ढोंगीपणाने त्यांची पूजा करण्यात आमचा सारा जन्म गेला. दुटप्पी आणि दुबळ्या मनुष्याला आपल्या ढोंगाचे आणि दुबळेपणाचे स्तोम माजवावेसे वाटू लागते. आपल्या समाजाचेही तसेच झाले आहे. न पाळले जाणारे पावित्र्य, आचरणात न उतरणारी नीतिमूल्ये, निसर्गाशी व प्रचलित जीवनक्रमाशी सुसंगत नसलेली ध्येये, यांचा अंध बडिवार माजविण्यात अजूनही आम्हांला मोठा आनंद होतो. आमचा दैनंदिन आयुष्यक्रम व आमचे जीवनविषयक तत्त्वज्ञान यांचा जवळजवळ काही संबंधच उरलेला नाही!बंगालच्या काळ्या दुष्काळात लाखो लोकांच्या राक्षसी हत्येला कारणीभूत झालेले लोभी नराधम दररोज देवपूजा करीत होते. घरातल्या प्रत्येक मंगल कार्याला धर्मशास्त्राप्रमाणे मुहूर्त पाहत होते, भटाभिक्षुकांना दानधर्म करीत होते, नियमाने गीतापाठ करीत होते, स्वर्गात इंद्राच्या दरबारात आपल्यासाठी पहिल्या रांगेत खास खुर्ची राखण्यात आली आहे, अशा खात्रीने स्मशानकळा आलेल्या शहरात स्वतः पुरते नंदनवन निर्माण करीत होते. भाताच्या चार शितांसाठी टाहो फोडणाऱ्या निष्पाप अर्भकांच्या केविलवाण्या किंकाळ्यांनी त्यांची झोप कधी उडाली नाही. पोटातली आग विझविण्याकरिता रुपया, दोन रुपयांसाठी आपले प्राणांहून प्रिय असलेले शील विकावे लागणाऱ्या अल्लड खेडवळ तरुणींच्या हृदयविदारक वेदना पाहून त्यांची निघृण मने कधी अस्वस्थ झाली नाहीत. कलकत्त्यातल्या रस्त्यात कुजत पडलेल्या प्रेतांच्या दुर्गंधीचा त्यांच्या नाजूक नाकांना कधीच त्रास झाला नाही. तो होणार तरी कसा? त्यांच्या बड्या बंगल्याभोवतालच्या बागांत सुगंधी फुलाचे ताटवे फुलत होते, त्यांच्या कपाटातल्या सुंदर सुंदर बाटल्यांतून निरनिराळ्या अत्तरांचे मधुर गंध घरभर दरवळत होते. आपल्या हजारो दुर्दैवी देशबांधवांची प्रेते कोल्ही-कुत्री फाडीत आहेत, अनेक बालकांचे प्राण पुरे जाण्यापूर्वीच त्यांचे डोळे गिधाडे फोडीत आहेत, हे भयानक दृश्य त्यांच्या डोळ्यांपुढे उभे राहून त्यांना कधीच भेवडावू शकले नाही. त्यांच्या डोळ्यांपुढे क्षणोक्षणी जॉर्जेटच्या तलम साड्या नेसलेल्या आणि विविध रीतीने नटलेल्या त्यांच्या नाजूकसाजूक ललना गुंजारव करीत होत्या, त्यांच्या मालकीच्या ऐटबाज 'मर्क्युरी' आणि 'ओपेल' गाड्या त्यांच्या सेवेला क्षणोक्षणी हजर होत होत्या. दुपारी भोजनाच्या वेळी दारात उभे राहून कुणी अतिथी येत आहे, की काय, हे पाहावे, तसा कोणी आल्यास त्याला आदराने आपल्या पंक्तीला घेऊन मग गृहस्थाने जेवण करावे, हा ज्या संस्कृतीतला दंडक, त्याच संस्कृतीत जन्माला आलेल्या विसाव्या शतकातल्या सुशिक्षित आणि सुसंपन्न माणसांनी आपल्यासमोर हजारो निरपराधी माणसे तडफडत, टाचा घाशीत मृत्युमुखी पडताना पाहिली. असे होण्याचे एक प्रमुख कारण आपला परंपरागत जीवनविषयक दृष्टिकोन हे आहे.

हा दृष्टिकोन सर्वच बाबतींत दुबळा, आंधळा आणि म्हणून दैववादी झाला आहे, वास्तववादाकडे सोयिस्कर रीतीने पाठ फिरविण्यात, जे उग्र आहे, ते उघड्या डोळ्यांनी पाहण्यापेक्षा डोळे झाकून घेऊन, ते सौम्य आहे, अशी आत्मवंचना करून घेण्यात, जे कटु आहे, ते धैर्याने चाखण्यापेक्षा ते न चाखण्यात धैर्य आहे, असे मानण्यात, जे नैसर्गिक आहे, त्याचा प्रामाणिकपणाने स्वीकार करण्यापेक्षा त्याची निंदा करून आपले अज्ञान आणि अतृप्ती लपविण्यात किंवा गुप्तपणाने त्याच्या उपभोगाचा आनंद चाखून ढोंगीपणाने जगण्यात आपल्या समाजाला अजूनही समाधान वाटते! या ढोंगीपणाला तुमच्यासारख्या कवींनी आणि लेखकांनी फार मोठा हातभार लावला आहे, असे माझे मत आहे. उदाहरण म्हणून पुन्हा एका पौराणिक कथेचा उल्लेख करतो. हे वाचून माझ्या अंगात आज पुराणिक संचारला आहे किंवा काय, असे मनातल्या मनात म्हणत तुम्ही मला हसाल. या कथेसारख्या ऐतिहासिक किंवा सामाजिक अनेक गोष्टी मला सांगता येतील, नाही, असे नाही; पण या कथेशी तुमचाही संबंध येत असल्यामुळे मी तिचा मुद्दाम उल्लेख करीत आहे.

सुभद्राहरणाच्या कथेवर जुन्या कवींनी लिहिलेली आख्याने आपण सोडून देऊ. पण किर्लोस्करांच्या 'सौभद्र' नाटकापासून तुमच्या 'सुभद्रा' चित्रपटापर्यंत सर्व लेखकांनी या कथाभागाला मधुर प्रणयरम्यतेचा मुलामा दिला आहे. अर्जुन आणि सुभद्रा यांचे लहानपणापासून एकमेकांवर प्रेम होते, ती दोघेही जणू काही एकमेकांसाठीच जन्माला आली होती, त्यांचे प्रेम अत्यंत सात्त्विक आणि अतिशय उदात्त होते वगैरे वगैरे गोष्टी तुम्ही सर्वांनी गृहीत धरल्या आहेत. पण महाभारत वाचले, म्हणजे तुम्हां सर्वांच्या गोड गोड कल्पना या कवींच्या थापा आहेत,असे स्पष्टपणे दिसून येते. बारा वर्षे तीर्थयात्रा करून आणि त्या तीर्थयात्रेत उलूपीबरोबर एक दिवस आणि चित्रांगदेबरोबर तीन वर्षे विलासात घालवून अर्जुन पुढे द्वारकेला गेला, अशी मूळ कथा आहे. तो तिथे गेला, तेव्हा रैवतक पर्वतावर एक महोत्सव सुरू झाला होता. या उत्सवात सुभद्रा प्रथम अर्जुनाच्या दृष्टीला पडली. त्यापुढचे महाभारतातले वर्णन असे आहे:

'तिला पाहताच अर्जुनाच्या मनात मदनाचा प्रादुर्भाव झाला व तो तिच्याकडे टक लावून पाहू लागला. हे कृष्णाच्या ध्यानात आले आणि तो अर्जुनास हसत हसत म्हणाला, 'पार्था, वनवास करणाराचे मन कामाने असे व्याप्त व्हावे, हे मोठे आश्चर्य आहे, रे! ही सारणाची भगिनी-माझी बहीण सुभद्रा ना? ही बाबांची फार लाडकी आहे. हिच्यावर जर तुझे मन जात असेल, तर मी स्वतः त्याविषयी पित्याजवळ गोष्ट काढीन.' मदनपीडित अर्जुन सुभद्रेचा स्वीकार करायला एका पायावर तयार होताच. पण कृष्ण त्याला म्हणतो, 'अर्जुना, क्षत्रियांनी स्वयंवर विधीने विवाह करावा, हा उत्तम पक्ष होय. परंतु स्त्री स्वभावतःच चंचल असल्यामुळे तसे केल्यास आपला कार्यभाग होईलच, असा नियम नाही. आता बलात्काराने स्त्रीस हरण करावे, हेही क्षत्रियास प्रशस्त होय. शूरांनी याच प्रकारे विवाह करावा, असे धर्मशास्त्रज्ञ सांगतात.यास्तव, अर्जुना, तू माझ्या बहिणीस बलात्कारानेच हरण कर. कारण स्वयंवर केल्यास ती कोणास माळ घालील, कोण जाणे!'

कवींच्या पलटणीने ही प्रेमकथा रंगविताना पदरचा मालमसाला वापरून आणि काव्यमय संकेताची फोडणी देऊन तिचे स्वरूप किती बदलले आहे, हे लक्षात आणले, म्हणजे कवीइतके लबाड लोक उभ्या दुनियेत दुसरे कोणीही नसतील, असे वाटू लागते. प्लेटोने आपल्या राज्यातून कवींना हद्दपार करण्याचे ठरविले होते ना? त्याचे कारण कवींचा असला कल्पनाविलास हेच असावे ! कलादृष्टीने लेखकाला मूळ कथेत बदल करावा लागणे अपरिहार्य आहे. अशा फेरफाराकडे वाचकाने रसिकतेच्या दृष्टीने पाहिले पाहिजे, हे मी मान्य करतो. पण स्त्री-पुरुषांच्या प्रेमाचे चित्रण करताना आमचे कवी प्रीतीच्या क्वचित प्रतीत होणाऱ्या आत्मिक भागांवरच वेळी अवेळी भर देतात! प्रीती जितकी आत्मिक, तितकीच शारीरिक असते, हे ते सोयिस्करपणाने विसरतात. परंपरागत संकेतांची आणि समाजाच्या अंध निषेधाची त्यांना बहुधा भीती वाटत असावी ! पण यामुळे प्रीतीचे खरेखुरे चित्रण करून तिच्यातल्या बिकट समस्यांवर प्रकाश टाकणे आणि मानवी स्वभावाचे रम्य, गूढ, उदात्त, विकृत असे जे निरनिराळे भाग असतात, त्यांच्या प्रीतीशी होणाऱ्या विविध संघर्षातूनच जीवनातली अनंत लहानमोठी सुखदुःखे निर्माण होतात, हे दाखविणे त्यांना अशक्य होऊन बसते. त्यांच्या संकेतनिष्ठ साहित्याने वाचकांच्या वरवरच्या भावना संतुष्ट होत असल्या, तरी जीवनमूल्यांची यथार्थ जाणीव करून देणे हे कार्य त्याच्या प्रीतिकथांतून सहसा पार पडत नाही.

'जळलेला मोहर' मी प्रथमच वाचले, तेव्हा तुम्ही या कोंडीतून बाहेर पडण्याची धडपड करीत आहात, असे मला दिसून आले. सर्वसामान्य वाचकांच्या मनात शृंगारविषयक सुप्त आसक्ती स्वाभाविकच असते. ती चाळविणे हे काही मोठ्या कुशलतेचे काम नाही. रेखीव शारीरिक वर्णनांनी सांकेतिक नीतीच्या मर्यादेत बसणाऱ्या चुंबनालिंगनाच्या सूचक उल्लेखांनी आणि साहचर्यामुळे शृंगारपोषक वाटणाऱ्या काव्यमय वातावरणाने वाचकांच्या मनातल्या प्रीतिभावनेला गुदगुल्या करण्याचे कार्य बहुतेक लेखक करीत असतात. पण संकेतांच्या पकडीतून सुटण्याचे धैर्य नसल्यामुळे म्हणा, अथवा सत्य सांगण्याचे धाडस केल्यास आपली लोकप्रियता जाईल, या भीतीने म्हणा, त्यांच्या नायक-नायिका एकीकडून शारीरिक मीलनाकरिता धडपडत असल्या, तरी दुसरीकडून प्रीतीच्या उदात्त, उज्ज्वल आणि उत्कट स्वरूपाचा आपल्याला पदोपदी साक्षात्कार होत आहे, असा त्या आव आणीत असतात. लग्नपूर्व प्रणयातच नव्हे, तर लग्नोत्तर जीवनातही स्त्री-पुरुषांमधले शारीरिक आकर्षण ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. या आकर्षणाचे स्वरूप प्रामाणिकपणे समजावून घेण्याच्या प्रयत्न न केल्यामुळे लाखो जोडपी नेहमी दुःखी होतात. 'बापहो, संयम पाळा, ब्रह्मचर्य सांभाळा.' किंवा 'खा, पी, मजा कर. आयुष्य हा दोन घडींचा डाव आहे.' या दोन्ही घोषणा जीवनाचे अज्ञानच दर्शवितात.

प्रीती हे नुसते काव्य नाही; ते शास्त्रही आहे, हे कटु सत्य 'जळलेला मोहर' मध्ये सूचित करण्याचा तुम्ही जो प्रयत्न केला आहे, तो अनेकांना आवडला नाही, हे मला ठाऊक आहे. पण वाचकांच्या आवडीनिवडीची कारणे प्रत्येक पुस्तकांच्या बाबतीत भिन्न भिन्न असू शकतात. या कादंबरीसंबंधी तुम्हांला आलेली काही निवडक पत्रे तुम्ही मला पाठवून दिली आहेत. ती मी लक्षपूर्वक वाचली. त्या पत्रांवरून ज्यांच्यासाठी ही कादंबरी तुम्ही लिहिली होती, त्यांना ती आवडली, असे मला वाटते. सर्व प्रौढ पत्र-लेखक तुमच्या बाजूचे आहेत. आता एखाद्या सतरा-अठरा वर्षांच्या मुलीने 'तुमच्या कादंबऱ्यांपैकी 'जळलेला मोहर' तेवढी मला आवडत नाही. बाकीच्या सर्व आवडतात.' असे लिहिले, तर ते एक प्रकारे तुम्हांला दिलेले शिफारसपत्रच नाही का? तुमच्या जागी मी असतो, तर त्या मुलीला मी सरळ उत्तर पाठविले असते, 'बाई, चाकू-कात्र्या ही जशी लहान मुलांची खेळणी नव्हत, तशी असल्या कादंबऱ्या ही अल्लड मुलांमुलींची करमणूक करणारी पुस्तके नव्हत. एखाद्या कथेतले काव्य-सौंदर्य कळणे निराळे आणि तिच्यातली जीवनसत्ये जाणवणे निराळे ! तीस-पस्तीस

वर्षांपूर्वी मी कॉलेजात गेलो, तेव्हा मला पहिल्या वर्षी संस्कृतला शाकुंतल होते. त्यातला चौथा अंक वाचताना कालिदासाच्या सुंदर कल्पनाचे मला कौतुक वाटले. पण पतिगृही जायला निघालेल्या शकुंतलेचे दुःख पाहून माझ्या डोळ्यांत तेव्हा काही पाणी उभे राहिले नाही. पण गतवर्षी माझ्या वडील मुलीचे लग्न झाले. कन्यादान करताना मी मोठ्या आनंदात होतो. तेव्हा उत्सवाची धुंदी नाचत होती माझ्या डोळ्यांवर! पण जेव्हा वरात निघाली आणि माझ्या मुलीने सासरी जाण्याकरिता मला नमस्कार केला, तेव्हा मला एकदम भडभडून आले. तिला पोटाशी धरून मी एखाद्या लहान मुलासारखा रडलो. दुसरे दिवशी मला शाकुंतलाची आठवण झाली. मी मुद्दाम ते पैदा करून चौथा अंक पुन्हा वाचला. बरेच दिवस संस्कृत वाचण्याचा सराव नसल्यामुळे काही काही ठिकाणी मला अडखळल्यासारखे झाले, नाही, असे नाही. पण ते वाचताना कॉलेजात न चाखलेल्या एका नव्या अपूर्व रसाचा आस्वाद मला मिळाला. कण्व, शकुंतला, तिच्या सख्या, गौतमी किंबहुना शकुंतलेची आवडती हरिणी आणि लाडकी नवमल्लिका या सर्वांच्या विरहदुःखांशी मी समरस होऊन गेलो. 'बाबा, पुन्हा केव्हा मला या तपोवनाचे दर्शन घडेल?' या शकुंतलेच्या वाक्याने तर माझ्या पापण्या ओलावल्या. अनुभूतीशिवाय काव्य खरेखुरे समजत नाही, हेच खरे! 'जळलेला मोहर' या कादंबरीच्या बाबतीत थोडेसे असेच म्हणता येईल. आज तुला ती न आवडणंच स्वाभाविक आहे. पण उद्या तिशी-चाळिशीत तू ही कादंबरी वाचलीस, तर तिचे मर्म समजून ती कदाचित तुला आवडेलही! नाही कुणी म्हणावं?'

कला, वाङ्मय वगैरे दृष्टींनी या कादंबरीची योग्यता ठरविण्याची लायकी माझ्या अंगी नाही. ते काम मी तुमच्या टीकाकारांकडे सोपवितो. पण जीवनातला एक जिव्हाळ्याचा परंतु नाजूक, वास्तवाशी अत्यंत निकट संबंध असूनही बुद्ध्या उपेक्षिला गेलेला असा विषय समतोलपणाने हाताळण्याचा तुम्ही या कादंबरीत जो प्रयत्न केला आहे, तो माझ्यासारख्या प्रौढ वाचकांना निःसंशय महत्त्वाचा वाटतो. असे अनेक उपेक्षित विषय, लोक काय म्हणतील, या भीतीने आपले कलावंत बहुधा हाती घेत नाहीत. पण मला वाटते, कलावंत हा लोकांचा गुलाम नाही. तो स्वतंत्र आहे. तो सत्याचा साथी आहे, स्वतःच्या आत्म्याचा प्रामाणिक साक्षीदार आहे. लोकांच्या लहरींच्या तालावर तो नाचू लागला की, त्याच्या कलेचा अधःपात होतो. हळूहळू जीवनाकडे भेदक आणि प्रामाणिक दृष्टीने पाहण्याची त्याची शक्तीच नाहीशी होते. लोकांच्या अंध आवडी-निवडी, त्यांच्या संकुचित कल्पना आणि आकांक्षा, अज्ञानामुळे त्यांना आवडणारी अर्धसत्ये, इत्यादिकांची कळत न कळत तो पोपटपंची करू लागतो. मानवी जीवनाचा श्रेष्ठ मार्गदर्शक हे जे त्याचे स्वरूप आहे, ते साहजिकच लोप पावते. लोकाराधन हा कलेचा शाप आहे.

शरीर व आत्मा यांचे परस्परसंबंध हा विषय आपल्या वाङ्मयात आजपर्यंत उपेक्षिला गेलेला आहे. समाजातले बहुसंख्य लोक शारीरिक प्रेरणांनाच जीवन समजतात. वासनांच्या तृप्तीतच आनंद मानतात, सात पडद्यांआड लपलेल्या आपल्या आत्म्याचे दर्शन घेण्याइतकी धडपड त्यांच्यापैकी एखाद्याच्याच हातून होते. पण परंपरागत कल्पनांची पोपटपंची करण्यापलीकडे त्यांच्या बुद्धीची उडी जात नसल्यामुळे ते नेहमी शरीरापेक्षा आत्मा श्रेष्ठ आहे, असे तावातावाने सांगत सुटतात. आपल्या जुन्या निवृत्तिपर तत्त्वज्ञानातून आणि गोंधळलेल्या पारमार्थिक कल्पनांतून या विचारसरणीचा उगम झाला आहे, हे उघड आहे. पण शरीरापेक्षा आत्मा मोठा आहे, असे मानणारी ही असंख्य माणसे त्या आत्म्याच्या विकासाकरिता कितीसे कष्ट करतात ? उलट, ज्या शरीराची ते निंदा करतात, त्याचीच ती गुलाम झालेली असतात.एक दंतकथा आहे. रामदासस्वामींना खीर फार आवडत असे, म्हणे! जिभेची ही आसक्ती नाहीशी व्हावी, म्हणून त्यांनी ओकारी येईपर्यंत खीर खाल्ली. या ओकारीच्या रामबाण औषधाने स्वामींचे खिरीवरले अमर्याद प्रेम नाहीसे झाले, असे त्या दंतकथेत वर्णन आहे. पण केवळ उपभोगाच्या अतिरेकाने माणसाच्या मनात कुठल्याही गोष्टीविषयी विरक्ती उत्पन्न होते, ही कल्पना किती चुकीची आहे, हे महाभारतातले ययाति राजाचे चरित्रच सांगत आहे. या दंतकथेचे मर्म माझ्या दृष्टीने निराळेच आहे. एवढे वैराग्यशाली रामदास स्वामी! महाराष्ट्राचे आनंदवनभुवन बनविण्याच्या आपल्या कार्यात व्यत्यय येऊ नये, म्हणून लग्नाची बेडी पायात पडण्याच्या आधीच बोहल्यावरून त्यांनी पळ काढला! पण अशा विरक्त व्यक्तीलाही खिरीचा मोह काही केल्या आवरता आला नाही, हेच या दंतकथेचे सार आहे. समर्थभक्त माझ्या या तर्काला तर्कट म्हणून संबोधतील, माझ्यावर अश्रद्ध, नास्तिक, वगैरे शिक्के मारतील, हे मी जाणून आहे. पण रामदास काय किंवा तुकाराम काय, केवढेही मोठे संत असले, मानवी जीवन उन्नत करण्याचे अमोघ सामर्थ्य त्यांच्या वाणीत असले, तरी तीही माणसेच होती. तुकारामाची पहिली बायको दुष्काळात मेल्यानंतर त्याने दुसरे लग्न केले. ही दुसरी बायको मनाने प्रेमळ, पण जिभेने कठोर होती; तिचा तो विलक्षण तोंडाळपणा पचवून तुकारामाने तिच्याबरोबर संसार केला.त्याला मुलेबाळेही झाली. त्याचा हा सारा चरित्रभाग असामान्य माणसांच्या जीवनातही शरीरसुखाला स्थान असते, नव्हे, असलेच पाहिजे, हेच सिद्ध करीत नाही काय?

शरीर हे मातीने भरलेले साडेतीन हातांचे पोते आहे. शरीरसुख क्षणभंगुर आहे. आत्मसुख हेच काय ते जगातले खरे सुख, वगैरे पोपटपंची आपल्या देशातली अगदी सामान्य माणसे सुद्धा पिढ्यान् पिढ्या करीत आली आहेत. पण त्यांच्यापैकी कितीकांना शरीरसुखाचा मोह आवरता आला आहे? आत्मविकासासाठी 'हे पाहा, माझं शरीर मी फेकून दिलं!' असे प्रामाणिक उद्गार कितीकांच्या तोंडून बाहेर पडले आहेत? इहलोकी शरीरसुख तुच्छ मानणाऱ्या या पोपटांची परलोकातल्या सुखाविषयीची कल्पना कितीशी उच्च असते, ते पाहण्याजोगे आहे. किंबहुना आपल्या समाजातल्या स्वर्गाच्या साऱ्याच कल्पना मला हास्यास्पद वाटतात. तिथे, म्हणे, सुंदर सुंदर अप्सरा असतात. मनुष्य जितका अधिक पुण्यवान, तितकी अधिक वरच्या नंबरची अप्सरा त्याच्या गळ्यात तिथे पडते ! तिथल्या या अप्सरा कुमारिका असतात, असे थोडेच आहे? उर्वशी, मेनका वगैरे त्यांतल्या अनेक प्रमुख सुंदरींची निरनिराळी कुलंगडी आपल्या पुराणकारांनी ठिकठिकाणी नमूद करून ठेवलीच आहेत. स्वर्गात गेल्यावर पुण्यवान माणसे वेश्यागमन करतात, एवढाच या अप्सराप्रकरणाचा अर्थ आहे. जे शरीरसुख इहलोकी निषिद्ध मानावयाचे, तेच स्वर्गात उपभोग्य व उच्च दर्जाचे ठरवायचे, हे अजब तर्कशास्त्र फक्त रूढीच्या आंधळ्या राज्यातच चालू शकते. आमच्या प्रचलित धार्मिक कल्पना जितक्या खुळचट आहेत, तितक्याच शरीर आणि आत्मा त्यांच्या परस्परसंबंधांच्या, शरीरसुखाच्या, क्षुद्रपणाच्या आणि जीवनमूल्यांच्या कल्पना भ्रामक आहेत. अजामिळाने जन्मभर पापे केली, पण मरताना मुलाला हाक मारण्याच्या निमित्ताने त्याच्या तोंडातून 'नारायण, नारायण' असे शब्द बाहेर पडले. विष्णूच्या हजार नावांपैकी नारायण हे एक असल्यामुळे त्याने मरताना देवाचे नाव घेतले, म्हणून त्याच्या खात्यावर चित्रगुप्ताला फार मोठे पुण्य नोंदून ठेवावे लागले! आणि त्या पुण्याईच्या बळावर सदरहू अजामिळमहाशय विमानात बसून वैकुंठाप्रत गमन करते झाले ! पिढ्या न् पिढ्या आमचे हरदास आणि पुराणिक ही गोष्ट लोकांना रंगवून सांगत आले आहेत. या मूर्खपणाच्या तत्त्वज्ञानाचा सामाजिक परिणाम किती विचित्र झाला असेल, याची कुणालाही कल्पना करता येईल. पाप आणि पुण्य, ऐहिक आणि पारलौकिक, सुख आणि दुःख, जीवन आणि मरण, इत्यादी बाबतींत वस्तुनिष्ठ पद्धतीने, बुद्धिवादी दृष्टीने, आणि जीवन जगताना जे अनुभव येतात, त्यांतूनच जीवनाचे सामाजिक तत्त्वज्ञान निर्माण झाले पाहिजे, या श्रद्धेने आम्ही विचार करीत राहिलो असतो, तर आपल्या समाजाला आजची अवनत अवस्था कधीच प्राप्त झाली नसती. आज स्वराज्य प्राप्त होऊनही आपण कुठे उभे आहोत? अज्ञानाच्या चिखलात, दारिद्र्याच्या खातेऱ्यात, धर्मभोळेपणाच्या धुंदीत, निष्क्रियेच्या नशेत-

शरीरसुखाची मनसोक्त निंदा करीत करीत त्याच्या आसपास सदैव घुटमळत राहिल्यामुळे येणाऱ्या मानसिक दुबळेपणाचे, भारतीय जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात आज आढळून येणाऱ्या अगतिकतेचे मूळ आणखी एके ठिकाणी आहे. माझे पत्र मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबत चालले आहे, ही जाणीव असूनही त्याचा उल्लेख केल्यावाचून मला राहवत नाही. आपण असामान्य तत्त्वज्ञानाचे कलम सामान्यांच्या आयुष्यांवर करण्याचा वायफळ खटाटोप करीत आलो. माणसांतले इतर भेद कधी काळी तरी नाहीसे होतील, अशी कल्पना करणे चुकीचे होणार नाही. पण सामान्य आत्मा व असामान्य आत्मा हा भेद मात्र चिरंतन आहे. असामान्य मनुष्य कसा निर्माण होतो, याची मीमांसा करणे फार कठीण आहे. पण तो सामान्यांपेक्षा नेहमीच निराळा असतो. केवळ बुद्धीने हे असामान्यत्व निर्माण होत नाही. त्या आत्म्याच्या ठिकाणी एक स्वयंभू शक्ती असते. तिच्या तेजाने सामान्यांचे डोळे दिपून जातात. त्या तेजाची पूजा करण्याचा मोह त्यांना अनावर होतो. त्यामुळे तो असामान्य आत्मा जे जे म्हणेल, ते ते त्यांना वेदवाक्य वाटू लागते. पण असामान्य माणसे ही धूमकेतूप्रमाणे असतात. त्यांचे उदयास्त जितके आकस्मिक, तितकीच त्यांच्या जीवनांतून सूचित होणारी उच्च तत्त्वेही सामान्यांना सहसा न पेलणारी! एक प्रेत आणि एक रोगी मनुष्य पाहून बुद्धाला उपरती झाली. अभूतपूर्व एश्वर्य, लावण्यवती पत्नी, पितृत्वाचा नवा सुखद अनुभव, इत्यादिकांचा त्याग करून एका मध्यरात्री तो आपल्या अस्वस्थ आत्म्याच्या समाधानाकरिता राजगृहाबाहेर पडला. आत्म्याचा हा जिवंतपणा (एाहेग्नहो) ही काही केवळ प्रयत्नाने मिळविता येणारी, पोपटपंचीने प्राप्त होणारी, धार्मिक ग्रंथांच्या पारायणाने पदरात पडणारी गोष्ट नाही. या कारणामुळे असामान्य व्यक्तीने पुरस्कारलेले तत्त्वज्ञान कितीही उच्च असले, तरी ते संपूर्णपणे सामान्य मनुष्याच्या पचनी पडत नाही. बुद्धाच्या अवसानानंतर त्याच्या धर्माची काय स्थिती झाली, हे इतिहास सांगतच आहे. बुद्ध धर्माचे अनुयायित्व अभिमानाने मान्य करणाऱ्या चीन व जपान या राष्ट्रांत गेल्या दहा-वीस वर्षांत काय काय उत्पात झाले, मानवाचे दुःख कमी व्हावे, म्हणून तळमळणाऱ्या बोधिसत्त्वाच्या तत्त्वाची बिरुदे मिरविणाऱ्या या दोन देशांत मनुष्याला जे जे दुःख होणे शक्य आहे, ते लक्षावधी लोकांच्या कपाळी कायमचे ठाणे देऊन कसे बसले आहे, हे तुम्ही जाणताच. हा सामान्य मानवाने असामान्यावर उगवून घेतलेला सूड आहे.गेल्या पाच हजार वर्षांचा जगाचा इतिहास पाहिला, म्हणजे महात्म्यांची तत्त्वज्ञाने ही महाकवींच्या काव्याप्रमाणेच असतात, असे मनात आल्यावाचून राहत नाही. ती काव्ये वाचून सामान्य मनुष्याला बौद्धिक व भावनात्मक आनंद होतो, त्याच्या मनावर थोडे-फार सुसंस्कार घडतात, पण त्या संस्कारांच्या शक्तीला अनंत मर्यादा आहेत. रामायण वाचणाऱ्या कुटुंबातले भाऊ भाऊ भांडणार नाहीत, ही आशा वेडेपणाची आहे! मोठ्या माणसांच्या तत्त्वज्ञानाचीही अशीच गत होते. गांधीजींची सत्य, अहिंसा, अपरिग्रह, वगैरे वगैरे तत्त्वे त्यांच्यापूर्वी अगदी बावनकशी होती. हिंदुस्थानातल्या सर्वसामान्यांनी त्यांच्या व्यक्तित्वाने दिपून जाऊन या तत्त्वांना माना डोलावल्या. पण एका विशाल देशातल्या पिढीच्या मनावर अपूर्व प्रभुत्व गाजवूनही गांधीजी सामाजिक मनात ही तत्त्वे कितीसे उतरवू शकले? त्यांच्या डोळ्यांदेखत नौखालीचे हत्याकांड झाले. ती आग विझते, न विझते, तोच पंजाबमध्ये वणवा पेटला. कोणत्याही कारणाकरिता मानवी रक्ताचा एक थेंबही या देशात सांडला जाऊ नये, ही गांधींच्या अंतरीची उत्कट इच्छा होती. पण पराभूत हृदयाने आणि विषण्ण मनाने त्यांना आपल्यासमोर निरपराधी रक्ताच्या नद्या वाहत असलेल्या पाहाव्या लागल्या. त्यांच्या अपरिग्रहाच्या तत्त्वाचा खून त्यांचे लहान-मोठे अनुयायी आजकाल किती लीलेने करीत आहेत? एका छोट्या पांढऱ्या टोपीत केवढा मोठा काळाबाजार दडलेला असतो, हे प्रसंगी सहस्त्राक्ष सरकारला सुद्धा उमगत नाही. याचा अर्थ गांधींची तत्त्वे चूक होती, असा मुळीच नाही. ती त्यांच्यापुरती सर्वस्वी बरोबर होती. पण कुशल शस्त्रवैद्याच्या हातात जी शस्त्रे रोग्याला प्राणदान देणारी ठरतात, तीच शस्त्रक्रियेचे ज्ञान नसलेल्या मनुष्याच्या हातात पडली, म्हणजे निरुपयोगी होतात किंवा तो मनुष्य माथेफिरू असला, तर ती हजारांच्या हत्येला कारणीभूत होतात. म्हणूनच असामान्य माणसे आणि सामान्य माणसे यांची जीवनविषयक तत्त्वज्ञाने निश्चितपणे भिन्न असली पाहिजेत, असे मला वाटते. चिमणीचे खरे सामर्थ्य काड्या आणि कापूस जमवून घरातल्या एखाद्या कोपऱ्यात सुंदरसे घरटे बांधण्यात असते. बाहेर कुठेही पडलेले दाणे चटकन् टिपण्यात ती आपली चतुरता दर्शवू शकते. पण गरुडाप्रमाणे उंच अंतराळात जाऊन तिने सूर्याकडे टक लावून पाहावे, किंवा गगनमंडलातून वेगाने खाली येऊन पृथ्वीवर सरपटणाऱ्या सर्पावर झडफ घालावी, अशी अपेक्षा करणे चुकीचे नाही काय? सामान्य माणसाचे जीवन या चिमणीसारखे असते. त्याची सुखदुःखे, त्याचे विचार-विकार किंवा त्याच्या वासना भावना असामान्याच्या मोजमापाने मोजून चालणार नाही. त्याच्या जीवनात शरीरसुखाला फार मोठे स्थान आहे असे, मी म्हणतो, त्याचे कारण हेच आहे. ते सुख त्याला विवेकपूर्ण दृष्टीने भोगून देण्यानेच त्याची उन्नती होण्याचा संभव आहे. तुळस कितीही वाढली, तरी ती काही ताडामाडाइतकी उंच होत नाही. सामान्याच्या आत्म्याचा विकास असाच असतो. ती हळूहळू होतो. एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच तो होण्याची शक्यता असते, हे आदर्शवाद्यांनी क्षणभरही विसरता कामा नये मानवाला बुद्धीच्या रूपाने देवत्वाची देणगी निसगनि दिली आहे, हे काही खोटे नाही. पण त्याच्याकडे पशुत्वाचाही वारसा त्याच निसर्गाच्या कृपेने आला आहे. हेही तितकेच खरे आहे.

प्रख्यात चिनी लेखक लिन् यू टांग याने मनुष्याच्या पहिल्या भुकेविषयी जे लिहिले आहे, ते त्याच्या दुसऱ्या भुकेच्या बाबतीतही तितकेच यथार्थ आहे. तो म्हणतो:

'अगदी जीवश्चकंठश्च असलेले दोन मित्र घ्या. दोघानाही सपाटून भूक लागली आहे, अशी कल्पना करा. अशा वेळी त्यांची गाठ पडून एखाद्या मुद्द्द्यावर त्या दोघांचा वाद सुरु झाला, तर त्याचा शेवट हटकून भांडणात झाल्याशिवाय राहणार नाही. पण पोटभर जेवून स्वस्थ चित्ताने त्यांना त्या मुद्द्द्याचा खल करायला बसवा. मतभेद होण्याऐवजी त्यांचे लवकरच एकमत होते, असे तुम्हांला दिसून येईल आपल्याला घरी जेवायला बोलावून पंचपक्वान्नांचा आग्रह करणाऱ्या मनुष्याच्या पुस्तकांचे परीक्षण करण्याची पाळी आपल्यावर आली, तर त्याच्याविरुद्ध लिहिणे आपल्या जिवावर येते. मनुष्यस्वभावाचे हे मार्मिक ज्ञान असल्यामुळेच सर्व भांडणतंटे आणि वादविवाद यांचा निकाल न्यायमंदिराऐवजी भोजनाच्या पंक्तीत लावण्याचा प्रघात प्राचीन चिनी लोकांनी रूढ केला.'

लिन् यू टांगच्या या लिखाणातला विनोद थोडा बाजूला केला, म्हणजे मी म्हणतो, त्या सत्याचे दर्शन त्यात झाल्यावाचून राहत नाही. जग सुधारू इच्छिणाऱ्यांनी, मानव अधिक अधिक सुखी व्हावा, म्हणून धडपड करणारांनी त्याला वेळी-अवेळी आत्मिक भुकेची औषधे पाजण्यापेक्षा त्याच्या ज्या नैसर्गिक शारीरिक भुका अज्ञानामुळे, विषम समाजरचनेमुळे, अथवा अंध पावित्र्यामुळे अतृप्त राहत आहेत, त्या आधी पूर्ण करण्याची दक्षता घेतली पाहिजे. कबुतरांनाही ज्यांचा कंटाळा येईल, अशा खुराड्यात राहणारा, आठ आठ तास गिरणीच्या भट्टीत शिजून निघणारा, कोणत्याही प्रकारचे शिक्षण नसल्यामुळे बौद्धिक आनंदाला पारखा झालेला आणि आपल्या लाडक्या मुलांबाळांच्या कपाळी हेच जनावराचे जिणे येणार आहे, या कल्पनेने जीवनाला विटलेला मजूर मद्यपानापासून परावृत्त व्हावा, म्हणून पावित्र्यवाद्यांनी प्रयत्न करणे प्रामाणिकपणाचे असले, तरी फारसे शहाणपणाचे ठरणार नाही पावसाळ्यात नदीला महापूर येऊन तिचे पाणी वाट मिळेल तिकडे पसरू लागते.मुंबईसारखी अवाढव्या नगरे सध्या अशीच बेफाम वाढत आहेत. अशा शहरांत लाखो तरुणांना पोटासाठी राहावे लागते, राबावे लागते. त्यांना आपल्या बायकोमुलांना घेऊन तिथे राहता आले, तर ते नको आहे, असे थोडेच आहे? पण जिथे पथारी पसरायला जागा मिळावी, म्हणून पाच-पाचशेची पागडी द्यावी लागते, तिथे कुटुंबवत्सल सामान्य मनुष्याला या साध्या सुखाचा लाभ कुठून होणार? आणि जोपर्यंत अशी पत्नीपासून दीर्घकाल दूर राहावे लागणारी, मुलांबाळांच्या गाढ सहवासात फुलणाऱ्या नाजूक भावनांना पारखी झालेली, कौटुंबिक जीवनामुळे सहजासहजी निर्माण होणाऱ्या संयमाचा संपर्कही नसलेली माणसे बकाली शहरात आपले दारिद्र्यामुळे कंटाळवाणे झालेले जीवन कंठीत आहेत, तोपर्यंत सरकारने वेश्यांनी अमुक ठिकाणी राहू नये आणि तमुक ठिकाणी जाऊ नये, असे कितीही निर्बंध घातले, तरी त्यांचा चिरस्थायी असा सामाजिक फायदा काय होणार आहे?

अंध रूढीच्या आहारी गेलेल्या आपल्या संस्कृतीत धर्माच्या नावाखाली शरीर व आत्मा यांची फारकत करण्यात आली. 'शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्' हे कविवचन अनेक अर्थानी खरे आहे, याची जाणीव आपला समाज विसरत गेला. आत्मविकास शरीरसुखापेक्षा श्रेष्ठ असला, तरी कवित्वाप्रमाणे विशेष व्यक्तीतच प्रकट होणारी ती एक शक्ती आहे.समाजातल्या सर्व लोकांना सक्तीने कवी करण्याचा उपद्व्याप जितका मूर्खपणाचा ठरेल, तितकाच शरीरसुखाकडे दुर्लक्ष करून सर्वसामान्य मनुष्याची आत्मिक उन्नती साधण्याचा प्रयत्न विफल होईल, ही साधी गोष्ट आमच्यांतल्या मोठमोठ्या लोकांच्या ध्यानी क्वचितच आली म्हणूनच माझ्यासारख्याला वारंवार मनात येणारे वरच्यासारखे विचार कुठे तरी व्यक्त केल्यावाचून राहवत नाही. त्यात 'जळलेला मोहर' च्या पहिल्या आवृत्तीला प्रस्तावना लिहिण्याविषयी तुम्ही माझा पाठपुरावा केला होता, त्या वेळी मी तुमच्या तडाक्यातून कसाबसा बचावलो. दुसऱ्या आवृत्तीपर्यंत तुम्ही ती गोष्ट विसरून जाल, अशी माझी कल्पना होती. पण माझ्या दुर्दैवाने तसे घडले नाही. गेले सहा महिने तुम्ही माझा चांगला पिच्छा पुरविला. तेव्हा धंद्याच्या निमित्ताने जे अनेक चित्रविचित्र सामाजिक अनुभव मला मिळाले, माझ्या तपासण्याच्या खोलीत माणसाच्या मनाचे मला जे दर्शन झाले, ते साररूपाने तुमच्यापुढे मांडावे, व तुम्ही माझ्या वर टाकलेल्या जबाबदारीतून मोकळे व्हावे, असे मी ठरविले. लेखणीपेक्षा थर्मामीटरशीच माझा अधिक संबंध आला असल्यामुळे 'मी स्वैर काही तरी लिहीन, त्याचा तुम्हांला फारसा उपयोग होणार नाही.' असे मी एकदा तुम्हांला लिहिले होते. पण उत्तरादाखल तुम्ही लगेच लिहिलेत, 'तुमचे स्वैरालापही वाचकांना मार्गदर्शक होऊ शकतील. अरण्यातल्या वृक्षवेली काही माळ्याने लावलेल्या अथवा जोपासलेल्या नसतात. पण त्यांच्यांतही एक प्रकारचे सौंदर्य असतेच.' बहुधा तुमच्या या स्तुतीला बळी पडूनच मी तुम्हांला चार शब्द लिहून पाठवायचे कबूल केले असावे. ते चार शब्द गप्पागोष्टींच्या पद्धतीनेच लिहिणे मला शक्य होते. त्याप्रमाणे हे लांबलचक पत्र तुम्हांला पाठवीत आहे. त्याचा तुम्हांला योग्य वाटेल तो उपयोग करावा. एक गोष्ट मात्र सांगतो. ज्यांचे स्वैरालाप कथांइतकेच रंजक-बोधक होतात, अशी माणसे जगात नसतात, असे नाही. पण डॉ. सान्यांची मात्र त्यांत गणना करता येणार नाही.

माझ्या या सर्व लिहिण्यावरून मी शरीरसुखालाच फार महत्त्व देतो, असा अनेकांचा ग्रह होण्याचा संभव आहे. म्हणून जाता-जाता माझे एक मत स्पष्टपणे नमूद करतो. अष्टौप्रहर अनिर्बंध शरीरसुखाच्या मागे लागल्यामुळे मनुष्याच्या बुद्धीचा व हृदयाचा विकास कुंठित होतो, हे मलाही मान्य आहे. मानवधर्माचे खरे शत्रू नास्तिक लोक नव्हेत. 'कशाला उद्याची बात? बघ उडुनी चालली रात!' हे मनामध्ये चोवीस तास गुणगुणत चंचल चैनीच्या मागे धावत सुटणारे उथळ सुखवादी लोक हेच मानवतेचे खरे शत्रू होत. चालू घडी हेच त्यांचे युग असते. ती पिळून तिच्यातून शक्य तेवढी मजा लुटणे हेच ते आपले जीवितकार्य मानतात. स्वतःच्या सुखासक्त जीवनापलीकडे दुसरे जग ते जाणतच नाहीत. अंतर्मुखता, सामाजिकता, चिंतनशीलता, वगैरें गोष्टींचा त्यांना सहसा स्पर्श होत नाही. शरीराला जी जी गोष्ट सुखप्रद वाटत जाईल, ती ती पुनः पुन्हा करीत राहावयाचे, एवढेच त्यांना ठाऊक असते. त्यामुळे उथळ उपभोग हाच त्यांचा देव बनतो. गजबजलेल्या शहराबाहेर ज्याला क्षणभर करमत नाही, क्षणोक्षणी शरीरसुखाचा नवा चाळा जवळ केल्याशिवाय ज्याचा वेळ जात नाही, असा बहिर्मुख यांत्रिक मनुष्य विसावे शतक निर्माण करीत आहे; या मनुष्याची जात जगात सर्वत्र झपाट्याने वाढत आहे, हे मी मुळीच नाकारू इच्छीत नाही. या लोकांना ख्रिस्त, बुद्ध, श्रीकृष्ण यांचे जुने धर्म नकोत, मार्क्स, गांधी किंवा विवेकानंद यांची नवी तत्त्वज्ञानेही नकोत! संपत्ती आणि सत्ता यांची सदैव पूजा करणे हाच त्यांचा धर्म !

भारतीय संस्कृतीत आत्म्याच्या गौरवाकरिता शरीराचा बळी देण्याची प्रथा पडली. आता जो नवा यांत्रिक मनुष्य निर्माण होत आहे, तो शरीराच्या क्षुद्र अथवा क्षणभंगुर सुखाकरिता आत्म्याचा बळी देण्यात आनंद मानीत आहे. शारीरिक सुखाच्या अंध आसक्तीतून, उपभोगाच्या अमर्याद लालचीतून, जास्तीत जास्त द्रव्याचा संग्रह करण्याचे वेड मनुष्याला जडते. या हृदयशून्य लोभातून इतरांवर राक्षसी प्रभुत्व गाजविण्याची इच्छा उत्पन्न होते. लाभ आणि मद यांनी मनाचा मृदुपणा मारून टाकल्यामुळे त्याची प्रीती एका व्यक्तीच्या ठिकाणी स्थिर होऊ शकत नाही. कामवासनेची स्वच्छंद आराधना आणि एक स्त्री मिळाली, की दुसरीच्या मागे लागण्याने जो शिकारीतला कैफ चढतो, त्याची उपासना, हीच दुर्दैवाने त्याच्या प्रीतीची व्यक्त स्वरूपे ठरतात.

अशा प्रकारचा चंचल, उथळ आणि समाजविमुख मनुष्य निर्माण होणे हे मानवी संस्कृतीचे दुर्दैव आहे. संयमाचे वावडे असलेला आणि अंतर्मुखतेची उभ्या आयुष्यात ओळख न होणारा सामान्य मनुष्य कधीच सुखी होऊ शकणार नाही. पण संयमाचे जे तत्त्वज्ञान समाजापुढे ठेवावयाचे, ते ढोंगीपणाचे असता कामा नये. अज्ञानातून, विषमतेतून आणि धर्मभोळेपणातून त्याचा उगम होता कामा नये. व्यक्तिविकास व मानवतेची प्रगती या दोन्ही दृष्टींनी आवश्यक असलेल्या संयमाचे मी नेहमीच समर्थन करतो. पण 'जळलेला मोहर' मध्ये तुम्ही चर्चिलेला प्रश्न काय किंवा त्याहून बिकट असलेल्या अनेक सांसर्गिक समस्या काय, त्यांची उत्तरे देण्याची आजपर्यंतची आपली दृष्टी केवळ निषेधाची, कोंडमाऱ्याची, ऐहिक आयुष्य हा तुरुंग असून मनुष्यप्राणी हा त्यात ठेवलेला कैदी आहे, अशा अर्थाची होती. शरीर व आत्मा या दोन्हींचे नैसर्गिक समाधान व विकास कोणत्या मार्गांनी साधता येतील, सामान्य मनुष्याच्या जीवनात असलेले शरीरसुखाचे महत्त्व ओळखून व त्याला योग्य ते स्थान देऊन,त्याला संयमी कसे बनविता येईल, या दृष्टीने आपण काहीच विचार केलेला नाही. आता तो करणे अगत्य आहे. देवधर्माच्या भ्रामक कल्पनांवर आधारलेली जुनी सामाजिक बंधने तटातट तुटून पडत आहेत. बुद्धीला पटणारे उन्नत ऐहिक जीवन हेच माणसाचे ध्येय होत आहे. या ध्येयाशी सुसंगत असणारी आणि शरीर व आत्मा या दोन्हींचा सुंदर समन्वय साधणारी नवी सामाजिक बंधने निर्माण झाली, तरच नवा मानव, नवे जग, इत्यादिकांविषयीची कवीची, शास्त्रज्ञाची, सज्जनांची आणि तत्त्वज्ञांची स्वप्ने अंशतः सत्यसृष्टीत उतरतील. पण त्याकरिता एक गोष्ट आपण कटाक्षाने लक्षात ठेवली पाहिजे. मनुष्य हा नुसता आर्थिक, केवळ कामुक किंवा निव्वळ आध्यात्मिक असा प्राणी नाही. आर्थिक किंवा कामविषयक समाधान हे काही त्याच्या आयुष्यातले एकमेव सुख नाही. नैसर्गिक वासनांचा कोंडमारा करून सामान्य मनुष्याचा आत्मविकास साधण्याची कल्पना ही मृगजळ शिंपून नंदनवन निर्माण करण्याइतकीच मूर्खपणाची आहे. मार्क्स, फ्रॉईड व गांधी हे सर्व आधुनिक मानवसमाजाची चिकित्सा करणारे प्रतिभावान धन्वंतरी आहेत. या प्रत्येकाच्या चिकित्सेत सत्यांश आहे; पण पूर्ण सत्य मात्र एकीतही नाही. हे सर्व सत्यांश जीवनात समरस करून, त्यांच्या साहाय्याने नवे जग निर्माण करण्याचे सामर्थ्य जर सामान्य मनुष्य दाखवील, तरच यापुढे तो सुखी होण्याचा संभव आहे.आणखी पुष्कळ लिहावेसे वाटत आहे. कितीही बडबडले, तरी वेड्यांची तृप्ती होत नाही! तसेच आहे हे, म्हणून आता इथेच थांबतो. तुम्ही माझे हे पत्र छापले, तर तुमच्या कादंबरीचे वाचक तुमची कोणत्या प्रकारची संभावना करतील, याची कल्पना मला नाही. त्यांनी आपली नापसंती दर्शविल्यास पुढल्या आवृत्तीतून तुम्हांला माझे हे लिखाण गाळण्याची परवानगी मी आताच देऊन ठेवतो.

तुमचा स्नेहांकित डॉ. साने

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे

मेळघाटावरील मोहोर - मृणालिनी चितळे (230126) गांधी,विनोबा, गाडगे बाबा याचां डॉ रवी कोल्हेंवर वर प्रभाव आहे. खेड्याकडे चला हा गांधीजींचा संदेश होता. त्यातच डेव्हिड व्हर्नर या स्पॅनिश डॉक्टर ने लिहिलेल where there is no doctor ,रस्किन बॉण्ड लिखित Unto this last ही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. दुर्गम खेड्यात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याचं बीज त्यांच्या मनात रुजल.   एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी असताना त्यांनी मेळघाटातील बैरागड या दुर्गम गावी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 9 फेब्रुवारी 1985 बैरागडला जाणाऱ्या एसटीत ते बसले.दोन वर्षे तिथले अनुभव घेऊन एम डी शिक्षण आवश्यक आहे याची जाणीव त्यांना झाली. एम डी शिक्षण पूर्ण करून ते सपत्नीक बैरागड ला येऊन वैद्यकीय सेवा देऊ लागतात(1989). येणाऱ्या रुग्णांकडून सेवा शुल्क म्हणून केवळ एक रुपया घ्यायचा हा त्यांचा नियम होता. यातून महिना काठी ते केवळ चारशे रुपये कमवायचे. अत्यंत साधी राहणी ठेऊन त्यानीं संसार केला. वैद्यकीय सेवा देतानाच शेतीत प्रयोग करून पहायचे त्यांनी ठरवलं. यासाठी भाडे पट्ट्...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस...

शेतकऱ्यांना मिळालेल बक्षीस... (120126) माझे आजोबा शेतकरी होते. शेतीला जोड म्हणून ते किराणा मालाचे दुकानही चालवायचे. शेतात पेरणी करताना, खुरपताना,पाणी धरताना,भुईमूग काढताना मी त्यांना पाहिलय. दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शेती यामुळे त्यांची आर्थिक ओढाताण कधी झाली नसावी. माझा आज्जा आणि त्याआधीच्या पिढ्या शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच दुःख अस्वस्थ करतं. "खाऊजा" धोरणानंतर शेती शेतकऱ्यांचे प्रश्न अधिक गंभीर झाले. याविषयीचा जसजसा विचार करू तशी निराशा दाटून येते. शेतीचे प्रश्न - 👉🏻 जलसिंचनाच्या सुविधा नाहीत. 👉🏻 नियमित वीज पुरवठा नाही. रात्री अपरात्री वीज येते, तेव्हा पाणी धरायला जावं लागतं. 👉🏻 रानटी जनावर, पाखरं पिकांचे नुकसान करतात. आताशा बिबट्याची असणारी दहशत वेगळीच.. 👉🏻 केंद्र सरकारच आयात निर्यातीचं कोणतेही ठोस धोरण नसतं. 👉🏻 शेतकऱ्यांच्या हितापेक्षा ग्राहकांच्या हिताला सरकारकडून अधिक प्राधान्य दिलं जातं. 👉🏻 पिकाला हमीभाव कमी देणं. त्यानंतरही हमीभावानुसार खरेदी होईलच याची शाश्वती नसणं. त्यामुळे जीव टांगणीला लागून राहणं. 👉🏻 उत्पन्नाची शाश्वती नसल्याने सतत आर...

धर्म - चमत्कार आणि तत्वज्ञान

धर्म- चमत्कार आणि विज्ञान धर्माचे सेवक,गुरु धर्मप्रसार करतात. म्हणजे नेमकं काय करतात? एखाद्याने धर्मांतर केलं म्हणजे नेमकं काय केलं? चमत्कार आणि तत्त्वज्ञान या दोन बाबी धर्मप्रसारात येतात. आमचा देव त्याला शरण येणाऱ्यांच्या शारीरिक व्याधी, आर्थिक अडचणी चुटकीसरशी सोडवू शकतो, सोडवतो. हा भ्रम निर्माण केला जातो. काही धर्मप्रसारक नोकरीचे आमिष, आर्थिक प्रलोभन देतात. धर्म प्रसार करताना वा धर्माचे श्रेष्ठत्व सांगताना तत्त्वज्ञानाचा आधार घेणारं फारसं कोणी दिसत नाही. प्रलोभन दाखवून होणारे धर्मांतर खोगीर भरती आहे. याने संख्याबळ वाढतं आणि त्याचा राजकीय फायदा घेता येतो. गर्व से कहो हम हिंदू है  अल्ला हो अकबर.... यासारख्या घोषणा देऊन सुमारांची माथी भडकावलेली आहेत. परिस्थितीने पिचलेल्या सुमारांना धर्म नावाच्या कळपात सुरक्षित वाटतं आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्यांना अभिमान वाटतो. धर्माचा धंदा करणाऱ्यांनी हे ओळखलय. या दोन्ही वर्गाच्या भावना चेतवून स्वहित साधण्याचं काम धर्माच्या ठेकेदारांनी आजपर्यंत केलं आहे, करत आहेत. धर्म ठेकेदारांच्या भूलथापांना बळी न पडता, लिखित धर्मग्रंथांना अंतिम न मानता, स्वबुद्...