छत्रपती शिवरायांनी रयतेच राज्य, स्वराज्य उभं केलं. ते करताना कित्येक मावळ्यांनी सर्वोच्च त्याग केला, प्राणुहिती दिली. काही नाव इतिहासात नोंदवली गेली काही अनामिक राहिली. पावनखिंडीतील थरार वाचताना या सर्वांच्या त्यागाची जाणीव होते, शेवटी डोळे पाणवतात.
घोडखिंड पावनखिंड कशी झाली?
कृष्णाजी बांदल हे आदिलशाहीच्या बाजूनं देशमुखी सांभाळत होते. बांदल यांच्याकडे बाजीप्रभू देशपांडे प्रधान / दिवाण म्हणून होते. त्यांची हिरडस मावळा या प्रांतात सत्ता होती. शिवाजी राजांनी त्यांना स्वराज्यात सामील होण्याचं आवाहन केल होत. सलूख (समझोता ) होऊ शकला नाही. लढाई झाली त्यात कृष्णाजी बांदल यांना विरमरण आलं. त्यांचा रोहिडा किल्ला स्वराज्यात आला.
शिवरायांनी बांदल व बाजीप्रभू यांचे वतन तसेच त्यांच्याकडे ठेवले. झालं गेलं विसरून त्यांची मनं जिंकण्याला प्राधान्य दिल आणि स्वराज्याशी एकनिष्ठ राहण्यास भाग पाडलं.
बाजीप्रभू शिवरायांचे खास शिलेदार झाले. अफझल खान स्वराज्यवार चालून आला. महाराजांनी त्याचा निक्काल लावला.
(10 नोव्हेंबर 1659) त्यानंतर आदिलशाहीतील किल्ले जिंकून घेण्याचा सपाटा लावला. या प्रत्येक वेळी बाजीप्रभू महाराजांबरोबर होते.
अफझल वधानंतर विजापूर वर आक्रमण होते की काय याने आदिलशाही भयभीत झाली. सिद्धी जौहर ला स्वराज्य वर पाठवण्यात आलं.
महाराज पन्हाळा किल्ल्यावर असताना आदिशाही मधील सरदार सिद्धी जौहर ने किल्ल्या ला वेढा दिला. यांचवेळी शाहिस्तेखान 80 हजाराची फौज घेऊन पुण्यात दाखल झाला होता. पन्हाळ्यावरून निसटणं महाराजांसाठी, स्वराज्यसाठी महत्त्वाचं होतं. बाहेरून वेढा फोडण्याचा प्रयत्न नेताजी पालकर यांनी केला होता पण यश आलं नाही, त्यांना माघार घ्यावी लागली. परिस्थिती बिकट होती. महाराजांनी गनिमी कावा केला. सिद्धी जौहर ला आपण शरण येतोय असा भास निर्माण केला. सलूखा ची बोलणी सुरु झाली. वेढा ढिला पडला. महाराजांच सोंग घेऊन शिवा काशीद सिद्धी जौहर च्या छावणीत गेले. शिवराय विशाळगडाकडे निघाले.
सिद्धी जौहर ला खरं काय ते समजायला वेळ लागला नाही. शिवा काशीद यांना विरमरण देण्यात आलं.आणि मसूद ला महाराजांच्या पाठलागवर पाठवल.
पाठलगावर असणाऱ्या गनिमांचा बंदोबस्त करायला बाजीप्रभू त्यांचा मोठा भाऊ फुलाजी, इतर 300 बांदल मावळ्यांसोबत घोडखिंडीत थांबले.
बाजीप्रभू यांच्यामध्ये वेगळंच चैतन्य संचारलं होत. घनघोर रणसंग्राम झाला. गनिमांना ते राक्षस वाटत होते. जय भवानीचा जयघोष करत 300 (बांदल) मावळे बाजीप्रभू देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली गनिमांवर तुटून पडले.
घोडखिंडीत अक्षरशः रक्ताचे पाट वाहिले.
तोफेचे आवाज आले, महाराज विशालगडावर पोहचल्याची खूण बाजीप्रभूना मिळाली. मोहीम फत्ते केल्याच्या समाधानाने त्यांनी जखमी देह ठेवला, तो कायमचाच....
घोडखिंड पावनखिंड झाली.(13 जुलै 1660)
मनातलं -
👉🏽 महाराजांनी जीवाभावाची माणसं जोडली. शरणार्थी आलेल्यांना उदार होऊन मानाने वागवल.
👉🏽 प्रसंग बाका असेल तर विचारपूर्वक माघार घ्यायला महाराजांची ना नव्हती.
👉🏽महाराज हतबल होऊन निष्क्रिय झालेत असं कधीही झालं नाही.
👉🏽 शिवरायांचं सोंग घेऊन सिद्धी जौहर च्या छावणीत जाणे म्हणजे मृत्यू......याची कल्पना असूनही शिव काशीद यांनी इतकं धैर्य कस दाखवलं? आपली पत्नी, मुलं बाळ, वृद्ध आई-वडील यांचा विचार त्यांच्या मनात आला नसेल का? कुटुंबीयांशी अखेरच निर्वाणीचं ते काय बोलले असतील?
👉🏽 बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे, इतर मावळे यांना शारीरिक वेदना होत नसतील का? तलवारीचे घाव ही माणसं सोसत होती, देत होती. मृत्यू कायम पाठीवर घेऊन मुलुखगिरी करायला यांना कसं जमलं?
👉🏽 छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये असं कोणतं वलयं होत ज्याने आकर्षित होऊन मावळे लढायला सज्ज होते?
हे मावळे आणि त्यांचे बेभान होऊन जगणं पाहिलं की मी अचंबित होतोय. कसली हिंमत आणि जिगर होती यांच्यामध्ये.
संकटाच्या छाताडावर थयाथया नाचायची, संकटाच्या नजरेमध्ये रोखून पाहयची हिम्मत मिळवायची असेल तर शिवराय आणि त्यांचे मावळे समजून घ्या.
"जय शिवराय" असं नुसतं म्हणायचं नाही आहे. शिवरायांचे गुण आत्मसात करायचे आहेत हे लक्षात घ्या.
💡लेखकाविषयीं
मागे मी विद्रोही साहित्य संमेलनाला गेलो होतो. राजन खान वक्ते होते. बरेच लेखक त्यांच्या जातीच्या मर्यादा ओलांडून लेखन करू शकत नाही असं त्यांच्या म्हणण्याचा आशय होता. ते आठवण्याचं कारण म्हणजे रणजीत देसाई सुद्धा त्याला अपवाद नाही असं माझं मत आहे.
👉🏽 अफजलखानाचे सरदार मंबाजीराजे भोसले आहेत.
👉🏽 खानाचा मुलगा फाजलखान याला पळून जाण्यासाठी वाट खंडोजी खोपड्यान दाखवली.
हे सांगणारे रणजित देसाई, कृष्णा भास्कर कुलकर्णी याच्या विषयी चकार शब्द काढत नाहीत.
👉🏽 कृष्णा भास्कर कुलकर्णी हा अफजलखानाचा वकील होता. छत्रपती शिवाजी महाराजांवर वार करणारा हा एकमेव होता. ब्रह्म हत्या पाप आहेत असा समज असूनही कृष्णा भास्कर कुलकर्णी या स्वराज्य द्रोह्याला महाराजांनी स्वतःच्या तलवारीने यमसदनी पाठवला.
" ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा ठेवितो " असे महाराजांचे उद्गार होते.
👉🏽 रणजीत देसाई यांनी शिवा काशिद याचा उल्लेख शिवा न्हावी असा केला आहे. हे दुष्ट बुद्धीने हेतूने केले नसेल का? बहुजनांच्या नायकांविषयी लिहिताना कायम असा खोडसाळपणा केला जातो.
संत गोरा कुंभार, संत सावता माळी, संत नरहरी सोनार..... ही काही उदाहरणं
👉🏽 दादोजी कोंडदेव हा शिवाजी महाराजांचा गुरु आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केलाय.
कथा कादंबऱ्यांमधून किंवा सिनेमांमधून इतिहास समजून घेताना, यांनी cinematic liberty घेतली आहे याच भान सर्वांनी ठेवलं पाहिजे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा